Happy Stomach
| | |

पोटाच्या निरोगी आरोग्यासाठी प्रोबायोटिक पेय गुणकारी; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जर तुम्ही फुडी असाल आणि तुम्हाला खायला भरपूर आवडत असेल तर तुमच्यासाठी हि माहिती अत्यंत गरजेची आहे. कारण आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. प्रामुख्याने त्या प्रत्येक पदार्थाचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो. जर आहार जड आणि सहज न पचणारा असेल तर अनेकदा आतड्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिभेवर ताबा ठेवणे उत्तम आरोग्याची गरज आहे हे विसरू नका. याशिवाय अशा पद्धतीच्या आहारामुळे आपण खाल्लेले अन्न शरीरासाठी लाभ देत नाहीच सोबत पोटाच्या आरोग्याचे नुकसान करते. यात पोट स्वच्छ होत नाही. अनावश्यक पदार्थ आतड्यांमध्ये अडकून राहतात. परिणामी फूड पॉइझन सारख्या त्रासांना सामोरे जावे लागते.

त्यामुळे जर तुम्ही तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठी चिंतीत असाल तर यासाठी घरगुती उपायांचा अवलंब करा.अगदी तुमच्या माहितीतील अशी काही पेये आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यांच्या सहाय्याने तुम्ही पोटाची काळजी घेऊ शकाल. यांना प्रोबायोटिक पेय असेदेखील म्हणतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि पोट निरोगी ठेवण्यासाठी प्रोबायोटिक पेय उपयुक्त असतात. शरीरातील बहुतेक समस्या पोटापासून सुरू होतात. त्यामुळे पोटाच्या आरोग्यासाठी प्रोबायोटिक पेय जरूर प्या. पचनसंस्थेतील एन्झाईम्सचे संतुलन राखण्यासाठी आणि पोटातील चांगल्या बॅक्टेरियाचे संतुलन राखण्यासाठी हि पेय फायदेशीर आहेत.

पोटाच्या निरोगी आरोग्यासाठी हे प्रोबायोटिक पेय प्या

१. लिंबू पाणी

लिंबू पाणी पिण्याचे बरेच फायदे आहेत हे आपण जाणतोच. पण हे पेय प्रोबायोटिक आहे याबद्दल फार कमी लोक जाणतात. लिंबू पाणी हे पेय पचनसंस्थेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे पोटाचे आरोग्य सुरक्षित राहते.

० साहित्य: लिंबू – १ मोठा, ब्राऊन शुगर – १ कप, पाणी – २ ते ३ कप.

० कृती – लिंबू पाणी बनविण्यासाठी एका भांड्यात ब्राऊन शुगर आणि गरम पाणी व्यवस्थित मिक्स करा. यानंतर त्यात लिंबाचा रस मिसळून हे भांडे फ्रिजमध्ये ठेवा. २ ते ३ दिवस हे पेय व्यवस्थित राहते.

२. ताक

ताक हे एक प्रोबायोटिक पेय आहे. कारण यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया पोटातील आतड्यांसाठी खूप फायदेशीर असतात.

० साहित्य: दही – १ कप, जिरे पावडर – १ टीस्पून, हिरवी मिरची – १ बारीक चिरलेली, पाणी – १ ग्लास, मीठ – चवीनुसार.

० कृती – ताक तयार करण्यासाठी वरील सर्व पदार्थ ब्लेंडरच्या सहाय्याने व्यवस्थित एकत्र करून घ्या. आता तयार मिश्रण एका भांड्यात काढा. या पेयामध्ये चवीनुसार मीठ घाला. आवडीप्रमाणे कोथिंबिरीचा वापरदेखील करू शकता.

३. कांजी

कांजी हे पौष्टिक प्रोबायोटिक पेय आहे. कारण यात शरीरासाठी फायदेशीर चांगले बॅक्टेरिया पुरेशा प्रमाणात असतात. इतकेच नव्हे तर हे पेय पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. कारण हे पेय प्यायल्याने आतडे आणि पचनसंस्था मजबूत होते.

० साहित्य: पाणी – १ लिटर, मोहरी – १.५ टीस्पून, मीठ – चवीनुसार, लाल तिखट – १/४ टीस्पून, गाजर – १ वाटी, बीटरूट – १ वाटी.

० कृती – प्रथम, गाजर आणि बीटरूट सोलून कापून घ्या. यानंतर मोहरी हलकी बारीक करून ठेवावी. आता सर्व वस्तू एका भांड्यात ठेवा आणि झाकून ठेवा. या गोष्टी काचेच्या भांड्यात ठेवा आणि झाकण थोडे उघडे ठेवा. साधारण ५-६ दिवस हे भांडे सूर्यप्रकाशात ठेवा. त्यानंतर गाळून प्या.

४. ऍपल सायडर व्हिनेगर

आंबवलेले कच्चे सफरचंद सायडर व्हिनेगर शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे पोटात साचलेली घाण शरीराबाहेर उत्सर्जित करण्यासाठी मदत होते.

० साहित्य: ऍपल सायडर व्हिनेगर – २ टेस्पून, सफरचंद रस – २ टेस्पून, थंड पाणी – १ ग्लास, दालचिनी – १ चिमूटभर.

० कृती वरील सर्व गोष्टी एका कपात मिसळून थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर काही वेळाने त्यात बर्फ टाकून प्या.