| | |

मस्त आणि स्वस्थ आरोग्यासाठी भोपळ्याचा ज्यूस एकदम बेस्ट; जाणून घ्या साहित्य आणि कृती

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दिवसभर धावपळ, दगदग आणि कामाचा ताण यामुळे आपले शरीर इतके थकून जाते कि काही करण्याचा उत्साह व ताकद दोन्ही उरात नाही. हळूहळू आपला सगळ्याच गोष्टींमधला रस नाहीसा होतो आणि आयुष्य एकदम कंटाळवाणे वाटू लागते. मित्रांनो, दिवसभर फ्रेश आणि उत्साही राहायचं असेल ना तर आपले शरीर योग्य प्रमाणात हायड्रेट राहणं गरजेचं आहे. पण आपल्यापैकी अनेकांना सकाळी उठल्या उठल्या रीफ्रेश होण्यासाठी चहा, कॉफी पिण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का? हि सवय आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही. कारण यामुळे आपल्या शरीराला सकाळी गरजेचे असलेले कोणतेही पोषण मिळत नाही. यासाठीच सकाळच्या नाश्त्यामध्ये व्हेजिटेबल ज्युसचा समावेश करणे आरोग्यदायी आहे. जसे कि भोपळ्याचा ज्यूस.

भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅंटि ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे भोपळ्याचा वापर आहारात करणं फायदेशीर ठरू शकतं. भोपळ्याचा ज्युस पिण्यामुळे दिवसभर उत्साहित वाटतेच शिवाय यामध्ये कॅलरिज कमी प्रमाणात असल्यामुळे तुमचे वजनही वाढत नाही. याशिवाय नैसर्गिक रित्या त्वचेला चमकदार बनवायचे असेल आणि सुदृढ आरोग्य हवे असेल हा एक उत्तम पर्याय आहे. हा ज्यूस प्यायल्यामुळे तुम्हाला त्वरीत फ्रेश तर वाटेल आणि तुमचा दिवस एकदम मस्त उत्साहित राहील. चला तर जाणून घेऊयात भोपळ्याचा ज्यूस कसा बनवायचा आणि त्यासाठी काय साहित्य लागते ते खालीलप्रमाणे:-

० भोपळ्याचा ज्युस बनविण्यासाठी लागणारे साहित्य –
एक वाटी भोपळ्याच्या फोडी
एक मध्यम आकाराचं सफरचंद
एका लिंबाचा रस
एक इंच किसलेले आले
अर्धा चमचा दालचिनी पावडर
चवीपुरते मीठ

० कृती – भोपळा व्यवस्थित धुवून स्वच्छ करून घ्या. यानंतर त्याच्या बारीक फोडी करून शिजवून घ्या. पुढे या फोडी शिजल्यानंतर थंड करून घ्या. यानंतर सफरचंदाची साल काढून तेदेखील बारीक चिरून घ्या. यानंतर ज्युसरमध्ये भोपळा, आल्याचा किस आणि सफरचंद टाका. व्यवस्थित ग्राइंड करून त्याचा रस काढा. हा रस गाळून घ्या आणि एका ग्लासात ओता. यानंतर वरून दालचिनी पावडर, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिसळा. झाला तुमचा हेल्थी भोपळ्याचा ज्यूस तयार.