| |

पावसाळ्यातील आजार; ‘अशी’ घ्या काळजी आणि उपचार

हॅलो आरोग्य ऑनलाईन : ‘आला पावसाळा, पहिल्यांदा तब्बेत सांभाळा’ असे म्हणण्याचे कारण म्हणजे सर्वात जास्त आजार हे पावसाळ्यातच उद्भवतात. रोगराईचा प्रसार पावसाळयात मोठ्या प्रमाणात होतो. एकीकडे पावसाळा म्हणजेच मान्सून आपल्या जगण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे,  सर्व जीवांचा जगण्याचा आधार आहे. उन्हाळ्यात अतिउष्णते मुळे अंगाची लाही-लाही होत असते. त्यामुळे सर्वजणच पावसाची वाट बघत असतात.  साधारणपणे मे महिन्याच्या मध्यात मान्सूनची चाहूल लागते. बातम्या येऊ लागतात कि अंदमान मध्ये मान्सून सक्रिय झाला आहे.  ०१ जून ला नेहमीप्रमाणे तो केरळ मध्ये दाखल होतो आणि ०७ जून पर्यंत महाराष्ट्रात.  पहिला पाऊस पडतो, चराचरामध्ये आनंद पसरतो. चैतन्याचे वातावरण निर्माण होते.  पाऊस मात्र त्याच्या मर्जीप्रमाणे बरसात असतो.  नव्याची नवलाई लवकरात लवकर संपते कारण सगळीकडे चिखल, रोगराई सुरु होते.  म्हणजेच पावसाळा म्हणजे अनेक विकार होण्याचा ऋतू असे समीकरण होऊ लागते. थोडक्यात सांगायचे झाले तर डॉक्टरांच्या च्या कमाईचा सिजन सुरु होतो. आता यातील  विनोदाचा भाग सोडा आणि पाहुयात पावसाळ्यातील विकार कसे टाळता येतील.

पावसाळयात अनेक विकार व आजार माणसाला होतात.पहिला पाऊस पडला की तो सर्वांनाच तृप्त करणारा असतो,पण जसे जसे आभाळ येईल तसे तसे अनेकांचे सांधे जखडायला सुरवात होते. दमा असलेल्या रुग्णांची तर पहाटेची झोपच पळून जाते. पावसाळ्यात अपचनाचे त्रास उद्भवतात, तसेच सर्दी,खोकला,व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप,कावीळ इ.च्या साथी पसरतात. गुडघे दुखी,पाठ दुखी,सांधे दुखी सायटिका वगैरे वातविकार ही डोके वर काढतात. तसेच काही पावसाळ्यातील पहिल्या काही दिवसानंतर मात्र सूर्यमहाराजांचे दर्शन न झाल्यामुळे सगळीकडे निरुत्साह,थकवा,मरगळ दाटू लागते.
असे होण्याचे नेमके कारण तरी काय पावसाळ्यात दमटपणा त्यामुळे इन्फेकॅशनला मिळणारा वाव दूषित पाणी ही सगळी कारणे तर असतातच पण बरोबरीने पावसाळ्यात पचनशक्ती खालावते, शरीर शक्ती सर्वात कमी होते आणि उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीतून निघणाऱ्या गरम वाफामुळे शरीरात पित्तदोष साठण्यास सुरुवात होते.

या सर्वांचा प्रतिबंध करायचा असेल तर पुढील उपाय करायलाच हवेत.

 • प्यायचे पाणी उकळून घ्यावे.  किमान दहा मिनिट तरी पाणी उकळावे आणि त्यामध्ये एक लहान सुंठेचा तुकडा टाकला तर उत्तमच.
 • रोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये धूप करावा,जंतूंच्या प्रतिकारासाठी हा चांगला उपाय आहे.म्हणून तर पूर्वीच्या काळी यज्ञ करत असत.
 • सकाळी चहा करताना शक्यतो लवंग, दालचिनी, लिंबू, गवती चहा याचा चहामध्ये वापर करावा.
 • मंद झालेल्या पचन शक्ती साठी भुकेचा विचार करून सहज पचेल असेच अन्न खावे. अन्न ताजे शक्यतो गरम असतानाच खावे.
 • रात्री मुगाची खिचडी,भात,पालकाचे सूप,रव्याचा पातळ शिरा असा सहज पचेल असा आहार घ्यावा.
 • भजी,समोसा,बटाटावडा असे जास्त तेल असलेले पदार्थ टाळावेत.
 • पचायला जड असलेल्या वस्तू खाणे टाळावे.
 • जेवणात आले खोबरे या पासून बनलेली चटणी असू द्या.
 • जेवणाच्या अगोदर आल्याचा छोटासा तुकडा सैंधव मिठासोबत चोखुन खा.
 • घशामध्ये इन्फेक्शन झाले असेल तर कपभर गरम पाण्यात दोन तीन चिमूट हळद व दोन चिमूट मीठ टाकून गुळण्या कराव्या.
 • जुलाब होत असल्यास सकाळ संध्याकाळ आल्या-लिंबाचा रस घ्यावा.
 • गुडघे दुखी कंबर दुखी असणाऱ्यांनी वातशामक अशा आयुर्वेदिक तेलाने मालिश करावी.

अशा प्रकारे आहार, आचरणात आवश्यक बदल, घरच्या घरी किंवा बागेत सहज उपलब्ध असणाऱ्या औषधी वनस्पती चा वापर करावा.यावरून आपण पावसाळयासारख्या ऋतूतील आजारावर सहज मात करू शकतो.