Raw Papaya
| | |

चवीला बेचव असला तरीही कच्चा पपई आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि फळे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. त्यामुळे अगदी आजारपणातही फलाहार केला जातो. याचे कारण म्हणजे फळांमधून आपल्या शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषणदायी घटक प्राप्त होतात. ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि शारीरिक ऊर्जेत वाढ होते. या अत्यंत आरोग्यदायी फळांमध्ये समावेश होतो तो कच्च्या पपईचा. हो हो कच्चा पपई. चवीला बेचव असला तरीही कच्चा पपई आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतो.

कच्चा पपई आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभकारी मानला जातो कारण यातील असे अनेक घटक आहेत जे शरीराला उत्साही आणि निरोगी बनविण्यासाठी सहाय्यक आहेत. त्यामुळे कच्चा पपई खाणे केव्हाही चांगले. पण कच्चा पपई चवीला फारसा बरा लागत नाही आणि त्यामुळे अनेकदाजं तो खाणे टाळतात. यासाठी तुम्ही कच्च्या पपईचे सेवन चटणी, भाजी किंवा दह्यातील कोशिंबीर वा सॅलड स्वरूपामध्ये करु शकता. चला तर जाणून घेऊया कच्चा पपई खाण्याचे फायदे आहेत तरी काय..?

कच्चा पपई खाण्याचे फायदे:-

1. कच्च्या पपईमध्ये भरपूर जीवनसत्वे असतात. हि जीवनसत्वे आपल्या शरीराचे अनेक रोगांपासून रक्षण करतात. यामुळे रोग प्रतिकार शक्ती मजबूत होण्यास सहाय्य मिळते

2. कच्च्या पपईचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढविण्यासाठी कच्ची पपई मदत करते. यामुळे मधुमेह आटोक्यात ठेवता येतो.

3. कच्च्या पपईचे सेवन नियमित केल्यामुळे कोलन वा प्रोस्टेट कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.

4. कच्ची पपई खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे असेल, त्यांनी दररोज जेवणासोबत कच्च्या पपईचे सेवन करावे. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

5. युरीन इन्फेक्शनची समस्या रोखण्यासाठी कच्चा पपई खा. यामुळे हे इन्फेक्शन रोखले जाऊन ते निर्माण करणाऱ्या बॅक्टेरीयांना आळा बसतो.

6. कच्चा पपई खाल्ल्यामुळे सांधेदुखी सारखे त्रास दूर होतात. यासाठी कच्चा पपई ज्यूस पिणेदेखील फायदेशीर आहे.

7. कच्च्या पपईच्या सेवनाने किडनी निरोगी राहते. यामुळे मूत्रपिंडाचा रोग असलेल्या रुग्णांनाही कच्चा पपई खाणे फायदेशीर ठरते.

8. स्तनदा मातांसाठी कच्च्या पपईचे सेवन आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक सर्व पोषक तत्वे मिळतात. परिणामी मातांचे दूध वाढविण्यासाठी कच्ची पपई उपयोगी ठरते.