Raw Rice
| | |

कच्चा भात करू शकतो आरोग्याचा घात; चुकूनही करू नका हि चूक

हॅलो आरोग्य ऑनलाईन। समुद्र किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या लोकांचे तांदूळ हेच प्रमुख पीक आणि अन्न आहे. यामुळे चपाती भाकरीपेक्षा त्यांचा जास्त जोर डाळ-भात, कढी- भात, खिचडी, मसाला पुलाव अर्थात तांदळाच्या विविध पदार्थांवर असतो. तर काही लोक नेहमीच्या साध्या पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस खाणे पसंत करतात. तांदळात व्हिटॅमीन डी, कॅल्शियम, फायबर, आयर्न, थायमिन आणि रायबोफ्लोविन मोठ्या प्रमाणात असते. तर, ब्राउन राईसमध्ये भरपूर मात्रेत प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमीन असतात. त्यामुळे भाताचा एकंदर शरीरासाठी फायदाच आहे. पण, काही लोकांना न शिजलेला तांदूळ खायची आवड असते किंवा गडबडीत कित्येकदा भात बनवतेवेळी तांदूळ कच्चाच राहतो. असा कच्चा तांदूळ खाणं आरोग्यासाठी अतिशय अपायकारक आहे. कसा ते जाणून घ्या.

आपल्या रोजच्या वापरातील कोणत्याही कच्च्या तांदळात काही असे घटक असतात ज्यामुळे पचनाक्रियेशी संबंधीत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. बऱ्याचदा पिकांना कीड लागू नये, म्हणून अनेक रसायनांचा वापर केला जातो. तसेच तांदळाची नासाडी टाळण्यासाठी आणि त्याला पॉलिशिंग करून त्याचा दर्जा वाढवण्यासाठी काही रसायनांचा वापर होतो. यामध्ये लेक्टीन नावाचे प्रोटीन मोठ्या प्रमाणात आढळते. हे प्रोटीन नैसर्गिक कीटकनाशक आणि ऍन्टी न्यूट्रियन्ट म्हणून काम करते. त्यामुळे कच्चे तांदूळ खाताना आपसूकच याचेही सेवन होते आणि त्याचा थेट परिणाम अन्न नलिकेवर होऊन पचनसंस्थेत बिघाड होतो. यामुळे पोटदुखी आणि आतड्यांचे त्रास संभवतात.

तसेच कच्चे तांदूळ खाल्ल्याने किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्यांच्या समस्येत वाढ होते. त्यांच्या तब्येतीसाठी कच्चे तांदूळ खाणे नुकसानदायक असते. कच्चा तांदूळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने स्टोन वाढण्याची शक्यता असते. इतकेच नव्हे तर कच्चे तांदूळ खाल्ल्याने फूड पॉयझनदेखील होते. होय. तांदळामध्ये बेसिलस सिरस नावाचा बॅक्टेरिया असतो. ज्यामुळे शरीराला फूड पॉयझनिंगचा त्रास होण्याची शक्यता बळावते. तसेच कच्चे तांदूळ खाल्यामुळे शरीरातील आळस वाढीस लागतो आणि अगदी दिवसभर शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो. कोणतेही काम करताना कशातच रस वाटत नाही. त्यामुळे जर तुम्हाला कच्चा भात किंवा तांदूळ खायची सवय असेल तर त्वरित बंद करा आणि आपल्या आरोग्याची होणारी हानी टाळा.