| | |

एखादा पदार्थ तळल्यावर उरणारे तेल पुन्हा पुन्हा वापरताय? तर सावधान; जाणून घ्या कारणे आणि परिणाम

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जेवणाच्या पानात टम्म फुगलेली पुरी दिसली का मग खवय्यांचा जणू तोल जातो. मग ती पुरी कधी एका पोटात जाते हे इतकेच त्यांचे ध्येय उरते. चवीला एकदम भारी वाटणारे तळलेले पदार्थ आरोग्यासाठी फारसे चांगले नसतात हे आपण सारेच जाणतो. त्यामुळे तळलेले पदार्थ खाण्यावर एक विशेष मर्यादा असणे बंधनकारक आहे. तसेच पुरीसारखे अन्य कोणतेही तळणीचे पदार्थ टाळून झाल्यावर कढईमध्ये बरेच तेल शिल्लक राहते. आता तेलाचा दर पाहता, हे तेल फेकून दाणे साहजिकच कोणत्याही गृहिणीला पटण्याजोगे नाही. त्यामुळे उरलेले तेल पुन्हा कसे वापरता येईल याचा विचार ती अख्खा दिवस करत असते. मग यावर पर्याय म्हणून हे तेल वाया जाण्याऐवजी दुसऱ्या दिवशीच्या भाजी, वरण किंवा आणखी एखाद्या पदार्थासाठी वापर करण्याला ती प्राधान्य देते. निश्चितच यात गृहिणीचा काटकसर करण्याचा मानस असतो. पण तुम्हाला माहितीये का, हि आर्थिक काटकसर आरोग्याला कात्री लावण्यास कारणीभूत ठरते. कारण वापरून उरलेल्या तेलाचा पुनर्वापर थेट आरोग्यावर परिणाम करीत असतो.

जेवणासाठी वापरण्यात येणारे तेल आधी वापरून उरलेले असेल तर हे तेल पुन्हा गरम केल्यास त्यातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीरात फ्री रेडिकल्स बनतात. ज्यामुळे आतड्यात सूज येण्याची शक्यता असते. इतकेच नव्हे तर इतर जुने आजारदेखील ओढले जाण्याचा धोका असतो. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एकदा वापरलेले तेल पुन्हा गरम करणे टाळावे. इतकेच नव्हे तर हे तेल केवळ ३ वेळा वापरता येऊ शकते. पण, आहार तज्ज्ञांच्या मते ही बाब टाळावी, असे नमूद केले जाते.

० एकदा वापरलेले तेल परत वापरणे आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते. कारण, उच्च तापमानावर तापवण्यात आलेले तेल विषारी धूर सोडते. त्यामुळे वापरलेलं तेल हे गरम होण्याआधीच धूर सोडते. याशिवाय तेलातील फॅट मोलेक्युल्स काही अंशी तुटू लागतात. यामुळे जेव्हा हे तेल स्मोक पॉईंटच्या टोकाशी जाते, तेव्हा प्रत्येकवेळी त्याचा वापर उग्र वास येतो. अशा वेळी या तेलातील उग्र आणि आरोग्यास हानी पोहोचविणारे घटक हवेत आणि अन्नात मिसळतात. परिणामी आपण शिजवलेल्या अन्नातील पोषकता समूळ नाहीशी होते आणि असे अन्न पचायला जड जाते.

० शिवाय तळलेल्या तेलाचा वारंवार वापर केल्यामूळे आरोग्याची गंभीर हानी होते. कारण हे तेल पुन्हा पुन्हा वापरणे अर्थात हृदयरोग, अॅसिडीटी, कॅन्सर, अल्झायमर, पार्किंसंस, गळ्यात जळजळ अशा रोगांना स्वतःहून आमंत्रण देण्यासारखे आहे. इतकेच नव्हे तर, ऑक्सीडेटिव तणाव, उच्च रक्तदाब यासाठीदेखील दुसऱ्यांदा वापरलेले तेल कारणीभूत असू शकते.