WHO
| |

निर्बंध शिथिल करणे ठरू शकते धोकादायक; कोरोनाविषयी WHO’कडून गंभीर इशारा

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गेल्या दोन ते तीन वर्षांपासून संपूर्ण जगभरात कोविड- 19 या विषाणूने थैमान घातल्याचे आपण सारेच जाणतो. दरम्यान प्रत्येक स्तरावरील व्यक्ती आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या आरोग्याबाबत चिंताग्रस्त आहे. एकीकडे कोरोनाची उसळलेली भयावह लाट अनेक लोकांना गिळंकृत करून गेल्यानंतर आता कुठे हा प्रकोप ओसरतो असे वाटू लागले होते. इतक्यात कोरोनाच्या नवनव्या व्हेरियंटने आपले हातपाय पसरत पुन्हा मृत्यूचे तांडव सुरु केले. अशा कठीण प्रसंगी सरकारकडून वारंवार लोकांना निर्बंधांचे पालन करण्याचे आदेश दिले जात होते. पण आता आधीपेक्षा विषाणूची तीव्रता कमी झाल्याचे निदर्शनास येताच सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र चिंतेची बाब अशी कि, नुकताच जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO – World Health Organisation) विषाणूबाबत देशवासियांना गंभीर इशारा देण्यात आला आहे.

० काय म्हणाले WHO’चे अधिकारी?

जागतिक आरोग्य संघटनेचे उच्च अधिकारी यांनी केलेल्या संशोधनानुसार, विषाणूचा धोका अद्याप संपलेला नाही. शिवाय जगातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनच्या लाटेचा उच्चांक येणं बाकी आहे. त्यामुळे एकाचवेळी कोरोना निर्बंध शिथिल करण्यापेक्षा ते हळूहळू शिथिल केले पाहिजेत. मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड-१९ वर बनलेल्या टेक्निकल लिडकडून हा सल्ला देण्यात आला असल्याचे समजत आहे. याशिवाय अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणाचा दर खूपच कमी आहे. इतकेच नव्हे तर या देशांतील असुरक्षित लोकसंख्येला कोविड- १९ लस अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे अशावेळी सर्व बंधने आणि नियम एकाचवेळी हटवू नयेत. असे केल्यास देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या लाटेचा उद्रेक होईल, असे WHO अधिकारी मारिया वेन यांनी सांगितले.

WHO Leads

WHO अधिकारी मारिया वेन यांनी असेही सांगितले की, आम्ही नेहमीच सर्व देशांना कोविड-१९ शी संबंधित निर्बंध हळूहळू शिथिल करण्याचचे आवाहन केले आहे. कारण हा विषाणू शक्तिशाली आहे. आम्ही असं म्हणत नाही की देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करायला हवं किंवा कराच. पण आम्ही सर्व देशांना केवळ एकच आवाहन करत आहोत कि, त्यांनी त्यांच्या नागरिकांना कोरोनाशी संबंधित नियमांचं पालन करण्यास वारंवार सांगितले पाहिजे. या महामारीशी लढण्यासाठी केवळ लस हे एकमेव शस्त्र आहे असं नाही. यासाठी आपण स्वतः स्वतःची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

मात्र अनेक देशांमध्ये कोरोना महामारीविरुद्धचे युद्ध आपण जिंकलो आहोत असा विचार भिनला आहे. जो पूर्णपणे चुकीचा आहे. यामुळे त्या देशांसह इतर देशांच्या समस्येतही वाढ होऊ शकते. तर काही देशांमध्ये असा विश्वास वाढत आहे की लसीकरणाचे चांगले दर आणि ओमिक्रॉनच्या कमी प्राणघातकतेमुळे धोका टळला आहे. पण आम्ही तुम्हाला खात्रीशीररित्या एकच गोष्ट सांगू इच्छितो कि, या विषाणूचा प्रकार हा निश्चितपणे अत्यंत सांसर्गिक आहे. परंतु खूप घातक नाही, त्यामुळे अधिक घाबरण्याची गरज नाही. मात्र निर्बंधांचे पालन न करणे हि समस्या मोठी आणि गंभीर करू शकते हे लक्षात असणे गरजेचे आहे.