omicron
|

संशोधकांच्या अभ्यासात आढळले ओमिक्रॉनच्या उत्पत्तीचे कारण; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गेल्या दोन वर्षांपासून कोरोना नामक महाभयंकर विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. यामुळे प्रत्येक स्तरावर केवळ नुकसानाची छाया पसरली आहे. या आधी कोरोनाच्या दोन व्हेरियंटने जगभरातील अनेक लोकांना गिळंकृत केले आहे. यानंतर काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा नवा व्हेरियंट म्हणून ओमिक्रॉन चर्चेत आला. हा व्हेरियंट आधीच्या कोणत्याही व्हेरियंटपेक्षा अत्यंत सौम्य असल्याचे समोर आले. यानंतर लोकांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र काही दिवसातच ओमिक्रॉनने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. बघता बघता जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसू लागली. यानंतर महामारीचा प्रलय थांबलेला नाही हे लोकांच्या लक्षात आले आहे. दरम्यान ओमिक्रॉनचा कहर हि कोरोनाची तिसरी लाट असल्याचे सिद्ध झाल्यानंतर शास्त्रज्ञांनी आणखी एक दावा केला आहे. तो म्हणजे, ओमिक्रॉनची उत्पत्ती उंदरांमधून झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोना विषाणूंवर गेल्या अनेक दिवसांपासून अभ्यास करणाऱ्या चिनी संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, कोरोनाचा व्हेरियंट ओमिक्रॉनचा विषाणू हा मानवाकडून उंदरांमध्ये गेला आणि अनेक उत्परिवर्तनानंतर तो पुन्हा उंदराकडून मानवाकडे परतला आहे. या अभ्यासादरम्यान पाच परिवर्तित उंदरांच्या फुफ्फुसात सापडलेल्या विषाणूंचे म्युटेशन एकसारखेच असल्याचे संशोधकांना आढळले आहे. इतकेच नव्हे तर याबद्दलचे पुरावे चिनी शास्त्रज्ञांकडे असल्याचा दावा करण्यात येत आहे. सध्या जगभरात ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. दरम्यान भारतातही ओमिक्रॉनच्या रुपात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. अनेक लोक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्यामुळे संशोधकांनी आपल्या अभ्यासाचा वेग वाढवला आहे. या दरम्यान ओमिक्रॉनबाबत उघड झालेली हि नवी माहिती संशोधकांच्या अभ्यासाला प्रभावित करीत आहे.

ANI रिपोर्टनुसार, भारतात गेल्या २४ तासात १,२७,९५२ कोरोनाची सक्रिय बाधित रुग्णांची संख्या आहे. तर २,३०,८१४ रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले असल्याची माहिती आहे. याशिवाय १०५९ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
० सक्रिय प्रकरणे – १३,३१,६४८
० मृतांची संख्या – ५,०१,११४
० दैनिक सकारात्मकता दर – ७.९८%
० एकूण लसीकरण – १,६८,९८,१७,१९९