| | |

तिळाचे तेल देई निरोगी आरोग्य आणि कोमल त्वचा; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। संक्रांत आली कि आपल्याला तिळाचे लाडू, तिळाची भाकरी, तिळाची चिक्की आणि तिळाचे तेल असे पदार्थ आठवतात. कारण त्या त्या हंगामात या पदार्थांचे विशेष महत्व आणि शरीराला गरज असते. पण मित्रांनो तिळाचे तेल मर्यादित हंगामात नव्हे तर कोणत्याही ऋतूमध्ये शरीराची काळजी घेण्यास सक्षम असते. मुख्य म्हणजे, या तिळाचं तेल फक्त शरीराच्या आरोग्यासाठी नाही तर त्वचेच्या आरोग्यासाठीसुद्धा खूपच फायदेशीर आहे. कारण तिळामध्ये मिनरल्स, ओमेगा फॅटी अ‍ॅसिड आणि अनेक पोषक तत्त्व समाविष्ट असतात. जी आपल्या शरीराला अनेक रोगांपासून सुरक्षित ठेवण्यास सक्षम आहे. त्यामुळे ऋतू कोणताही असो तीळ खाणे फायदेशीर आहे. आता प्रत्येकवेळी तिळाचे लाडू किंवा अन्य पदार्थ बनविणे कामाच्या व्यापात शक्य नसते. अशावेळी तुम्ही तिळाच्या तेलाचा आहारात वापर करू शकता. याशिवाय तिळाचे तेल थेट त्वचेवर लावणेदेखील फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊयात तिळाच्या तेलाचे आश्चर्यकारक फायदे खालीलप्रमाणे:-

१) शरीरातील दाह कमी होतो – शरीरात उष्णता वाढल्यास पित्ताचा त्रास हमखास होतो. यामुळे आठवड्यातून किमान २ वेळा तीळाच्या तेलाने बॉडी मसाज करा. यामुळे शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी होते. मात्र वारंवार असा त्रास होत असल्याचं तीळाच्या तेलाचा अतिवापर करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

२) रक्तदाबावर नियंत्रण – तीळामध्ये ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी करणारे घटक असतात. यामुळे रक्तदाबावर नियंत्रण मिळवणे सोप्पे होते. यासाठी राईस ब्रान आणि तीळाचे तेल उत्तम आहे. कारण हे तेल रक्तदाब कमी करण्यास सहाय्यक आहे.

३) हृद्याचे आरोग्य – तीळाच्या तेलात लिनोलेइक अ‍ॅसिड हे ओमेगा ६ फॅटी अ‍ॅसिड असते. यामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रेरॉल कमी होते. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलवर चाप बसतो आणि आवश्यक कोलेस्ट्रेरॉल वाढते. शिवाय यातील मॅग्नेशियम, सेलेनियम आणि कॅल्शियम हृद्याचे स्नायू बळकट करतात.

४) हाडांची मजबुती – लहान बाळांची हाडं मजबूत करण्यासाठी तीळाच्या तेलाने मसाज करा. याबाबत आयुर्वेदातही उल्लेख केलेला आहे. याचे कारण म्हणजे तीळाच्या तेलाने हाडं मजबूत होतात आणि हाडांचे आरोग्य सुधारते. यामुळे वाढत्या वयानुसार हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी ऑस्ट्रोपोरायसिसचा धोका कमी होतो.

५) तोंडाचे निरोगी आरोग्य – तोंडाचे आरोग्य सुव्यवस्थित असेल तर अनेक आजार दूर होण्यास मदत होते. यासाठी तिळाचे तेल सहाय्यक आहे. दातांमधील प्लाग काढण्यासाठी तीळाचे तेल वापरावे. शिवाय यामुळे दात नैसर्गिकरित्या शुभ्र होतात. तसेच बॅक्टेरियाचा नाश झाल्याने टुथ इनॅमलचेदेखील संरक्षण होते.

६) गरोदर स्त्रियांच्या आरोग्यासाठी फायदेशीर – गरोदर स्त्रियांनी आहारात तीळाच्या तेलाचा समावेश करावा. यामुळे तिळाच्या तेलातील फोलिक अ‍ॅसिड गर्भाच्या सुदृढ वाढीसाठी मदत करते. परिणामी डीएनएचे सिंथेसाईज तसेच बाळाची वाढ निरोगी आणि योग्य पद्धतीने होते.

७) स्ट्रेचमार्क निघून जातात – गरोदरपणाच्या काळात किंवा वजन वाढल्यानंतर जिथे शरीरावर मांस गळू लागते तिथे आपोआपच स्ट्रेचमार्क्स येतात. हे स्ट्रेचमार्क कमी करण्यासाठी आपण तीळाच्या तेलाने मसाज करणे फायदेशीर आहे. यामुळे हळूहळू स्ट्रेचमार्क्स निघून जातात.

८) मेंदूवरील तणावावर प्रभावी – तिळाच्या कोमट तेलाने डोक्याचा मसाज करा आणि यानंतर गरम पाण्याने अंघोळ करा. असे केल्यास मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शिवाय शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि ताण कमी होतो.

९) कोमल त्वचा – नैसर्गिकरित्या त्वचेला पोषण आणि मुलायमता देण्यासाठी तीळाचे तेल फायदेशीर ठरते. यासाठी आठवड्यातून एकदा त्वचेला तिळाच्या तेलाने माडज करा.

१०) योनीमार्गातील शुष्कतेवर परिणामकारक – योनीमार्गातील शुष्कता कमी करण्यासाठी आहारात तीळाचे तेल जरूर वापरा. कारण तीळाचे तेल नॅचरल ल्युब्ररीकंट आहे. यामुळे योनीमार्गातील कोरडेपणा कमी होण्यासाठी मदत होते.