Breast Cancer
| |

आरोग्यविषयक साध्या वाटणाऱ्या तक्रारी असू शकतात ब्रेस्ट कॅन्सरची गंभीर लक्षणं; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। घरातील स्त्रिया आपल्या आरोग्यापेक्षा जास्त कुटुंबातील इतर प्रत्येकाच्या आरोग्याबाबत सजग असतात. यामुळे आपल्या आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या त्यांना लहान कुरबुरी वाटतात. परिणामी त्या जाणून बुजून दुर्लक्ष करतात. यानंतर लहान वाटणाऱ्या समस्या कधी गंभीर होतात आणि मोठ्या आजारांना स्त्रिया बळी पडतात ते त्यांच त्यांनाच कळत नाही. अशाच लक्षणांपैकी काही लक्षणे हि स्तनाच्या कर्करोगाचे निदान करून देणारी असतात. मात्र वेळीच त्याकडे लक्ष न दिल्यामुळे हा आजार बळावतो. हा रोग जितक्या लवकर समजतो तितक्या लवकर बरा होण्याची शक्यता जास्त असते. मात्र वेळीच लक्षणे न समजल्यामुळे स्त्रिया या रोगाला पूर्ण बळी जातात.

स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीच्या अवस्थेतील लक्षणे ठळकपणे दिसून येत नाहीत. मात्र दिसून येतात ज्याकडे आपण लहान तक्रार म्हणून दुर्लक्ष करतो. या कर्करोगाची स्तनामधील गाठ न जाणवण्याइतपत लहान असते. मात्र स्तनांमध्ये जडपणा येतो जो आपल्याला समजू शकतो. कालांतराने, स्तनामध्ये तीव्र वेदना आणि दुखरेपणाचा अनुभव येऊ लागला तर डॉक्टरांशी त्वरित सल्ला मसलत करून योग्य त्या चाचण्या करणे आवश्यक असते. पण यासाठी सुरुवातीची लक्षणे आपण समजून घ्यायला हवी. म्हणूनच आज आपण ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे जाणून घेणार आहोत. कारण हा रोग सुरुवातीच्या टप्प्यात समजला तर जगण्याची संधी आहे, असे मानता येते.

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं

१. स्तनांचा आकार वा पोत यांमध्ये बदल होणे.

तुमच्या स्तनांपैकी एकात गाठ असेल तर त्या स्तनाच्या आकारात लक्षणीय बदल होतो. जसे कि, एक स्तन ओघळलेला असू शकतो. तसेच दुसऱ्यापेक्षा मोठा असू शकतो. तसेच स्तनाच्या त्वचेवर सुरकुत्या असतील वा लालसर चट्टे, वाढीव फुगीरपणा दिसल्यास त्वरित तपासणी करून घ्या. हि सर्व ब्रेस्ट कॅन्सरची लक्षण आहेत.

२. स्तनांच्या वजनात वाढ होणे.

जर तुमच्या स्तनांपैकी एक किंवा दोन्ही नेहमीपेक्षा जड वाटत असतील तर डॉक्टरांकडून त्वरित तपासणी करून घ्या. याचबरोबर, त्वचेवरील खडबडीतपणा आणि खाज याकडे दुर्लक्ष करू नका.

३. काखेत गाठ तयार होणे.

ब्रेस्ट कॅन्सरची गाठ हि केवळ स्तनांमध्ये आढळते असे नाही. तर कॉलरबोन किंवा काखेच्या आसपासदेखील अनेकदा सुज येते. याकडे दुर्लक्ष करू नये. कारण काहीवेळा स्तनामध्ये गाठ येण्याअगोदर कॉलरबोन किंवा काखेत छोट्या छोट्या गाठी येतात. हे लक्षण दिसताच त्वरित तपासणी आवश्यक आहे.

४. स्तनांमधून सतत स्त्राव होणे.

स्तनांमधून स्त्राव होण्याची विविध कारणे असू शकतात. बहुतेकदा हि बाब काळजी करण्यासारखी नसते. मात्र न पिळता स्तनांतून स्त्राव होत असेल वा दोन्हीपैकी कोणत्याही एकाच स्तनातून स्त्राव होत असेल तर हे ब्रेस्ट कॅन्सरचे गंभीर लक्षण असू शकते.

५. काहीही न खाता पोट फुगणे.

महिलांमध्ये पोटफुगी फार साहजिक आहे. पण म्हणून याकडे दुर्लक्ष करू नये. कारण यासोबत वजन कमी होऊन रक्तस्त्राव होत असेल त्याची विशेष काळजी घ्यावी. दरम्यान सतत पोटफुगी हे कर्करोगाचे लक्षण असू शकते हे समजून घ्या.

० महत्वाचे – ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे काही विशेष वय नसते. त्यामुळे सर्व वयोगटातील महिलांनी त्यांच्या स्तनांची नियमित तपासणी करून घेणे अनिवार्य आहे.