| |

अधिक काळ एका जागी बसून राहणे आरोग्यासाठी हानिकारक; जाणून घ्या दुष्परिणाम आणि उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण ऑफिसच्या कामात व्यग्र असलो कि आपल्याला अगदी भूक, तहान आणि इतर काम दिसतही नाहीत आणि कळतही नाहीत. इतकंच तर आपण एकाच जागी गेल्या किती तासांपासून विराजमान आहोत हे देखील कळत नाही. मात्र सलग असे तासनतास एकाच ठिकाणी बसून राहिल्‍याने उच्‍च रक्‍तदाब होऊ शकतो. शिवाय कार्डियोव्‍हॅस्‍कुलर आजार व कर्करोगामुळे मृत्‍यू होण्‍याचादेखील धोका वाढतो. त्यामुळे डेस्‍कसमोर, दुचाकीवर, स्क्रिनसमोर अगदी कुठेही असे तासनतास बसून राहणे घातक ठरू शकते. कारण आपण बसतो तेव्‍हा उभे राहणे किंवा चालण्‍याच्या तुलनेत अत्यंत कमी ऊर्जेचा वापर होतो. परिणामी लठ्ठपणासह, हाय ब्‍लड शुगर, कमरेच्‍या भोवती जादा चरबी आणि असामान्‍य कोलेस्‍ट्रॉलच्या पातळ्या वाढतात याचा शरीराला त्रास होतो.

0 चला तर जाणून घेऊयात एका ठिकाणी बराच काळ बसून राहण्याचे दुष्परिणाम कोणकोणते आहेत ते.

१) पाय आणि ग्‍लुटेल्‍स – बराच वेळ एकाजागी बसल्‍याने पाय व ग्‍लुटेलमधील मोठे स्‍नायू कमकुवत होतात. हे मोठे स्‍नायू चालण्‍यासाठी आणि स्थिर उभे राहण्‍यासाठी महत्त्वाचे असतात. हे स्‍नायू कमकुवत झाल्यास पायांची क्रियाशीलता शमते. यामुळे आपल्याला पडल्‍यामुळे किंवा व्‍यायामामुळेसुद्धा दुखापत होऊ शकते.

२) नितंब आणि सांध्‍याच्‍या समस्‍या – बराच वेळ बसल्‍यामुळे हिप फ्लेक्‍झर स्‍नायू कमकुवत होतो. परिणामी नितंबाच्‍या सांध्‍यांमध्‍ये समस्‍या निर्माण होतात. विशेषत: अयोग्‍य बसण्याची स्थिती किंवा योग्‍यरित्‍या आराम न देणारी खुर्ची किंवा वर्कस्‍टेशनमध्ये बसल्‍याने पाठीसंबंधित समस्‍या होतात.

३) चयापचय बिघाड परिणामी हृदय आजार/ हृदयाघात – स्‍नायूंच्‍या हालचालीमुळे आपण सेवन करत असलेले मेद व शर्करांचे पचन होते. मात्र बराच वेळ बसून राहिल्‍याने पचनशक्‍तीवर परिणाम होतो. ज्‍यामुळे शरीरामध्‍ये मेद व शर्करा तसेच राहतात.

४) कर्करोगाचा धोका – एका संशोधनानुसार, बराच वेळ बसून राहिल्‍याने कर्करोगाचे काही प्रकार जसे फुफ्फुसाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग व कोलन कर्करोग होण्‍याचा धोका वाढतो.

० उपाय –

१) खूप व्यस्त असलात तरी, शक्‍य असेल तेव्हा काही वेळ उभे राहा किंवा काम करताना चालण्‍याचा प्रयत्‍न करा.

२) दर ३० मिनिटांनी बसण्‍याच्‍या स्थितीमधून थोडा शॉर्ट ब्रेक घ्‍या.

३) फोनवर बोलताना किंवा टेलिव्हिजन अधे मध्ये पाय मोकळे करा.

४) डेस्‍कवर काम करताना स्‍टॅण्डिंग डेस्‍क निवडा किंवा उंच टेबल किंवा काऊंटर असेल अशी जागा निवडा.

५) कामातून थोडा थोडा वेळ घेऊन मोकळ्या हवेत चालून या किंवा पाय लांब ताणून स्नायू मोकळे करा.