| |

पोट फुगीने त्रस्त आहात? तर करा हे उपाय; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल पोटफुगीच्या समस्येने त्रस्त असणाऱ्या लोकांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. एखाद्या दिवशी भरपूर जेवण झाले किंवा मग जेवणामध्ये गोड पदार्थ जास्त खाल्ले गेल्यानेसुद्धा पोटफुगी आणि पोटदुखीचा त्रास संभवतो. अशाप्रकारे उद्भवणाऱ्या पोटफुगीमुळे साहजिकच शरीर जड वाटायला लागते. यामुळे अस्थिरता येते आणि कामात मन लागेनासे होते. शिवाय अपचन, ऍसिडिटी आणि अगदी चिडचिड, तणाव या समस्यांमध्ये भर पडते. मुळात पोटाची कोणतीही तक्रार अतिशय सतावणारी आणि त्रासदायी असते. त्यामुळे या समस्येवर आपण काही सोपे उपाय पाहणार आहोत. खालीलप्रमाणे:-

१) व्यायाम व शरीराची हालचाल करणे – जेवण झाल्यानंतर सुस्ती येणे अतिशय साहजिक बाब आहे. मात्र या कंटाळ्यामुळे आपण सर्रास व्यायाम आणि शारीरिक हालचालींकडे दुर्लक्ष करतो आणि वारंवार आरामाचा शोध घेतो. मात्र असे न करता आपण जास्त शारीरिक हालचाली होतील अशी कामे निवडा. शिवाय ऑफिसमध्ये किंवा खरेदीला पायी जा. शक्यतो लिफ्टचा वापर न करता जिन्यांवरून चढत जा, बागकाम करा, घराची साफसफाई करा. या हालचालींमुळे शरीराला आवश्यक तो व्यायाम मिळून अन्नपचन सुरळीत होते आणि पोट फुगण्याची समस्या हळू हळू का होईना पण कमी होते.

२) सकाळचा नाश्ता न टाळता फायबरयुक्त पदार्थ घ्या – अनेकांना सकाळी नाश्ता करणे नकोसे वाटते. किंवा मग वेळेअभावी टाळाटाळ केली जाते. पण मग दुपारपर्यंत भूक अनावर झाल्याने दुपारच्या जेवणामध्ये भरपूर प्रमाणात अन्न ग्रहण केले जाते. त्यात रात्रीच्या जेवणात जड पदार्थांचे सेवन केले कि मग परिणामी ‘ब्लोटींग’ अर्थात पोट फुगू लागते. त्यामुळे सकाळी फायबरयुक्त पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करून तो टाळाटाळ न करता सेवन करणे गरजेचे आहे. कारण फायबरयुक्त पदार्थांच्या सेवनाने पोट बराच वेळ भरलेले राहते. त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये अन्न मर्यादित होते आणि पोटफुगी होत नाही.

३) पुदिन्याचा चहा किंवा काढा प्या – जर जास्त मसालेदार, तेलकट पदार्थ खाण्याने गॅसेस आणि अपचन या समस्या निर्माण होतात परिणामी पोट फुगु लागते. अश्या वेळी पुदिन्याची पाने घालून केलेला काढा किंवा मग पुदिन्याचा फक्कड चहा प्यायल्याने पोटफुगी कमी करण्यास मदत होते. परंतु या चहामध्ये साखर घेणे टाळावे.

४) भरपूर पाणी प्या – आपल्या आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांच्या सेवनासोबतच भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. शिवाय पाणी पिताना एकाचवेळी भरपूर पाणी पिणे टाळा. पाणी पिताना थोडे थोडे पाणी दिवसातून अनेकदा प्यावे अर्थात पाणी पिण्याच्या वेळेचे भाग करावे. आपल्या शरीराला सामान्यपणे ३ ते ४ लिटर पाण्याची रोज आवश्यकता असते. त्यानुसार दररोज तुम्ही न चुकता १० ते १५ ग्लास पाणी पिणे शरीराची मूलभूत गरज आहे.

५) पोटॅशियमयुक्त अन्नपदार्थांचे सेवन करा – आपल्या आहारामध्ये पोटॅशियमयुक्त अन्नपदार्थ समाविष्ट करा. यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त ‘फ्लुइड्स’ किंवा द्रव बाहेर पडून पोटफुगी कमी होते. म्हणून आहारात केळी, रताळी, पालक अशा पदार्थांचा समावेश करावा.

६) आहारात मिठाचे प्रमाण कमी करा – आपल्या आहारातील मिठाच्या प्रमाणावर नियंत्रण असणे अत्यंत गरजेचे. एकवेळ कमी मिठाचे सेवन फलदायी ठरते मात्र मिठाच्या अतिसेवनाने शरीरामध्ये फ्लुईड्स साठत राहतात आणि परिणामी पोट फुगते. शिवाय अन्य आजारांनाही जोर येतो.