|

बदलते हवामान त्यात कोरड्या खोकल्याचा त्रास? तर हे घरगुती उपाय नक्की करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सर्वसाधारणपणे हवामानात होणारे सातत्याने बदल हे सर्दी-खोकला यांसारख्या आजरांचे मूळ कारण असते. खोकल्यामुळे घसा दुखणे, घशाला सूज येणे, ताप येणे यांसारखे त्रास साहजिकच संभवतात. त्याशिवाय खोकल्यामुळे शारीरिक थकवा जाणवतो आणि दैनंदिन कामात खंड पडतो.
मग यासाठी लोक विविध औषधं घेतात. पण यांचा परिणाम अगदी तात्पुरता होतो आणि खोकल्याची समस्या पुन्हा उद्भवते. मग अश्या वेळी काही घरगुती आणि दीर्घ काळापासून वापरात असलेले उपाय कामी येतात. मुळात या घरगुती उपायांचा वापर अनेको वर्षांपासून आयुर्वेदातही केला जात आहे. यामुळे ही औषधे अत्यंत गुणकारी ठरतात आणि शरीरास अपाय देखील करीत नाहीत. चला तर जाणून घेऊयात हे घरगुती उपाय नेमके कोणते आहेत ते.

१) मिठाच्या पाण्याच्या गुळण्या – एका मोठ्या ग्लासमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात १ चमचा मीठ मिसळून घ्या आणि त्या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून किमान दोन वेळा हा उपाय करा. यामुळे खोकला आणि घशातील खवखव बघता बघता नाहीशी होते. शिवाय खाऱ्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे श्वसन नलिकेतील संसर्ग दूर होण्यास मदत होते आणि खोकल्यामुळे घशामध्ये होणाऱ्या वेदनादेखील कमी होतात.

२) गरम पाण्याचे वाफारे – सर्दी खोकल्यामुळे श्वास घेणे कठीण होते. अशा वेळी गरम पाण्याची वाफ घेतली असता घशातील कफ बाहेर पडतो. यामुळे श्वासोच्छवास करताना होणाऱ्या अडचणी दूर होतात. शिवाय चेहऱ्यावरील रोम छिद्रांमध्ये जमा झालेली धूळ आणि माती देखील बाहेर फेकली जाते. पण आठवड्यातून फक्त २ वेळाच हा उपाय करा. अन्यथा चेहऱ्याच्या त्वचेला इजा होऊ शकते.

३) आले आणि मीठ – खोकला कमी करण्यासाठी नैसर्गिक उपायांचा अवलंब अत्यंत लाभदायक आहे. याकरिता आल्याचा छोटा तुकडा कुटून त्यामध्ये चिमूटभर मीठ मिसळा. हे मिश्रण दाढेखाली ठेवून त्याचा रस हळूहळू घशामध्ये उतरू द्या. पुढील पाच मिनिटांनी हे मिश्रण तोंडाबाहेर फेका आणि कोमट वा साध्या पाण्याने गुळण्या करा. हे मिश्रण पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ तोंडात ठेवू नका. अन्यथा तोंड पोळण्याची समस्या होऊ शकते.

४) गूळ – गुळातील पोषक घटकांमुळे कफ बाहेर पडण्यास मदत मिळते. सर्दी खोकल्याव्यतिरिक्त गुळामुळे पचनक्रियेशी संबंधित समस्या देखील दूर होतात. यासाठी कोमट पाण्यामध्ये गूळ पावडर मिश्रित करून प्या. हा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्रमाण आणि वेळा ठरवून घेणे आवश्यक आहे.

५) ज्येष्ठमधाचा चहा – ज्येष्ठमधाचा चहा प्यायल्याने कोरडा खोकला कमी होतो. यासाठी कपभर पाण्यामध्ये २ मोठे चमचे ज्येष्ठमधाची पावडर घालून ते पाणी १० ते १५ मिनिटे उकळू द्या. यानंतर कपामध्ये हा चहा गाळून घ्या आणि प्या. इच्छेनुसार चहामध्ये मध किंवा गूळ मिसळू शकता. दिवसातून दोनदा हा चहा प्यायल्याने आराम मिळतो.

६) मध – कोरड्या खोकल्यावर मधाचे सेवन म्हणजे रामबाण उपाय. कारण मधामुळे घशातील खवखव कमी होते. शिवाय घशामधील संसर्गही दूर होतो. कोरडा खोकला कमी करण्यासाठी छोट्या ग्लासमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात २ चमचे मध मिसळा. मध आणि पाणी व्यवस्थित मिसळल्यानंतर प्या. नियमित हा उपाय केला असता कोरड्या खोकल्यापासून आराम मिळतो.

७) हळदीचे दूध – हळदीचे दूध प्यायल्याने खोकलाच नव्हे तर कित्येक आजारांपासून सुटका होण्यास मदत मिळते. यासाठी १ ग्लास दुधामध्ये लहान अर्धा चमचा हळद मिसळून नियमित प्या. यामुळे कोरड्या खोकल्याचा त्रास काही दिवसात कमी होतो. शिवाय हळदीमध्ये कर्रक्युमिन नावाचे घटक असते. या घटकामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी संबंधित आजारांपासून होणारा त्रास कमी होतो.