|

कोरोनाला होणार पळता भुई थोडी! सुपर व्हॅक्सिन करणार विषाणूचा खात्मा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण जगाला सळो कि पळो करून सोडले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये तर या विष्णूने असे काही थैमान घातले होते कि दररोज अगदी लाखोच्या संख्येने नवीन रुग्णांची भर पडत होती. दरम्यान आता कुठे कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत होती तोच डेल्टा प्लस व्हेरियंटने पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढवली आहे. आधीच यात लाखो लोकांचा कोरोना संक्रमणाने जीव गेला आहे. त्यामुळे जगभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमही वेगाने राबविण्यात येत आहे. मात्र कोरोना विषाणूचे हे नवनवीन व्हॅरियंट मात्र लोकांचे जगणे मुश्किल करू पाहत आहेत. अश्यात आता एक दिलासा देणारी बातमी मिळत आहे कि, या विषाणूंवर मात करण्यासाठी शास्त्रज्ञ सुपर व्हॅक्सिनवर कार्यरत आहेत.

सध्या कोरोनाचे डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंट आपल्या डोक्यावर थयथय करत आहेत. कोरोनामुळे मृत्य झालेल्यांची संख्या मोठी असल्यामुळे हे व्हेरियंट लोकांच्या काळजीचा विषय ठरत आहेत. शिवाय या व्हेरियंटवर कोरोना प्रतिबंधक लसदेखील प्रभावशाली नाही, असा दावा तज्ज्ञांनि केला आहे. शिवाय कोरोना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आल्याने हि लस घेऊन काही उपयोग होईल का? असा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित झाला आहे. मात्र यावर तोड म्हणून, अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एक लस तयार केली आहे. जी कोरोनाच्या प्रत्येक व्हेरियंटला टक्कर देऊ शकेल. अशी युनिव्हर्सल वॅक्सिन अद्याप तयार होत आहे. या लशीला सुपर वॅक्सिन असेही म्हणता येईल.

मिळालेल्या माहितीनुसार या लशीवर सध्या तज्ञांकडून अभ्यास सुरू आहे. दरम्यान हे निदर्शनास येत ते कि, कोरोनाच्या प्रत्येक व्हेरियंट्सवर ही लस प्रभावी ठरत आहे. मुळात या लशीचे सर्वात आधी उंदरांवर ट्रायल घेण्यात आले आहे. दरम्यान ज्या उंदरांवर या लशीचा प्रयोग करण्यात आला होता त्याच्यामध्ये कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट्स होते. या ट्रायलमध्ये लसीने अशा काही अँटिबॉडी विकसित केल्या आहेत, ज्या कित्येक स्पाइक प्रोटिनचा सामना एकाच वेळी करू शकतात. त्यामुळे आता लवकरच या लसीची मानवी चाचणी केली जाणार आहे. या चाचणीदरम्यान हि लस मानवी शरीरासाठी कितपत फायदेशीर आहे आणि ती कशी कार्यरत राहील हे समोर येईल.

या लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या तर जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गावर सहजोगत्या मात करणे शक्य होणार आहे. मात्र अद्याप या लसीवर अभ्यास सुरु असल्यामुळे तूर्तास तरी आपल्याला स्वतःच स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. मुख्य म्हणजे मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे, सामाजिक अंतर राखणे, अनावश्यक घराबाहेर जाणे टाळणे, अनावश्यक प्रवास या सर्व गोष्टींचे काटेकोर पालन करणे आजच्या काळाची गरज आहे. कारण मस्त राहायचं असेल तर स्वस्थ असायला हवे.