| | | |

मधुर चवीची पपई आरोग्यासाठी गुणकारी; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। पपई हे एक अत्यंत चविष्ट फळ आहे. जितके चवीला उत्तम तितकेच हे फळ औषधी गुणधर्मांची परिपूर्ण आहे. मुख्य म्हणजे, आयुर्वेदामध्ये पपईचे वर्णन मधुर रसाची, कषाय गुणधर्माची व उष्णवीर्यात्मक असे केले आहे. पपईमध्ये प्रथिने, खनिजे, ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आढळते. यातील ‘क’ जीवनसत्त्व पपई जितकी पिकेल तितके वाढते. तसेच यातील पिष्टमय पदार्थ म्हणजे नैसर्गिक शर्करा. शर्करा अर्थात साखर आणि हि साखर रक्तामध्ये लगेच शोषली गेल्याने ऊर्जा व उत्साह वाटतो.

याशिवाय पपईमध्ये आढळणारा पेपेन हा घटक आतडय़ांमधील पाचक रसांची कमतरता, अपायकारक चिकट स्राव व आतडय़ातील दाह कमी करतो. त्यामुळे जेवणानंतर पपई खाल्ली असता अन्नपदार्थ पचण्यास मदत होते. मांसाहारी पदार्थ खाल्ल्यानंतर पिकलेली पपई खाल्यास मांसाहार लवकर पचतो. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. यामुळे बाजारात पपई सहज उपलब्ध होते. याचे कारण म्हणजे पापी उष्ण गुणधर्मयुक्त असते आणि यामुळे पपई खाल्ल्यास थंडीमध्ये शरीराला उष्णता मिळते. चला तर जाणून घेऊयात पपईचे इतर फायदे खालीलप्रमाणे:-

१) रोगप्रतिकारशक्तीत वाढ – कोणत्याही आजाराशी लढायचे असेल तर आधी शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. शरीरातील व्हिटामिन सीच्या गरजेपेक्षा २००% अधिक व्हिटामिन सी केवळ पपईमुळे मिळू शकते. यामुळे पपई खाणे आरोग्यदायी मानले जाते.

२) ताणतणाव दूर – दिवसभराच्या धावपळीनंतर अतिशय थकवा आणि ताण जाणवतो. यासाठी वाटीभर पपईचे काप खा. यामुळे थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच व्हिटामिन सी शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राखते.

३) मधुमेहींसाठी फायदेशीर – पपई चवीला गोड असली तरी नैसर्गिकरित्या यात शर्करा समाविष्ट असते. यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. अगदी कपभर पपईच्या तुकड्यांमध्ये केवळ ८.३ ग्रॅम साखर असते. यामुळे मधुमेहींनी पपई खाणे हितकारी आहे.

४) सांधेदुखीपासून आराम – पपईमध्ये व्हिटामिन सी आणि इतर वेदनाशामक गुणधर्म आहेत. यामुळे सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन हितकारी ठरते. पपईतील व्हिटामीन सी सांध्यांना मजबुती देते आणि सूज कमी करण्यासाठी मदत करते.

५) पचन सुधार – जंक फूड वा सतत बाहेरचे जेवण यामुळे पचनशक्ती बिघडण्याची शक्‍यता असते. अशावेळी पपई खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. याचे कारण म्हणजे, पपईत पपैन नामक एंजाईम असते आणि हेच पचन कार्य सुधारते.

६) कर्करोगापासून बचाव – पपईमधील ऍन्टीऑक्‍सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडीकल्सपासून बचाव करतात. इतकेच काय तर पपईतील बीटा कॅरोटीन आतड्यांच्या कर्करोगापासून बचाव करते. परिणामी कॅन्सरच्या पेशी वाढण्यास रोख बसतो आणि कर्करोगापासून बचाव होतो.

७) दृष्टी आरोग्य – पपईमध्ये व्हिटमिन ए आढळते. हे डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होण्याची शक्‍यता असते. या समस्येपासून बचाव व्हावा यासाठी पपईचा आहारात समावेश करा.

८) मासिक पाळीच्या त्रासात आधार – अनियमित मासिक पाळी तसेच मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. यापासून सुटका मिळवण्यासाठी पपईचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते.

९) शरीरातील कोलेस्टेरॉलवर नियंत्रण – पपईमध्ये व्हिटामिन सी आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे पपई खाल्ल्यास रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्यापासून बचाव होतो.

१०) वजन कमी होते – वजन कमी करायचे असेल तर पपई खाणे फायदेशीर आहे. कारण एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये १२० कॅलेरी असतात. यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळतेच शिवाय वजनही वाढत नाही. शिवाय पपईतील डायटरी फायबर्समुळे वेळी अवेळी लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्‍य होते.