| |

शेविंग करताना अशी काळजी घ्या; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गतवर्षी कोरोना नामक विषाणूने नुसता कहर केला होता. यामुळे संपूर्ण राज्यभरातील पार्लर आणि सलून बंद होते. परिणामी स्त्रियांना आणि पुरुषांना घरातच आपल्या ब्युटीची काळजी घ्यावी लागत होती. अनेक पुरुषांना घरामध्ये शेविंग करणे जमत नाही. यामुळे असे पुरुष सलूनमध्ये जातात. पण सलून बंद असल्यामुळे यांची चांगलीच गोची झाली. आठवड्यातून एकदातरी शेविंग करणारे पुरुष महिनाभर गोसाव्यासारखे फिरताना दिसले. पण आता राज्यातील सलून खोलण्यात आली असून फक्त केस कापण्यासाठीच परवानगी दिल्यामुळे पुरुषांची काही या समस्येतून सुटका झाली नाही. त्यामुळे अनेकांना घरच्याघरीच दाढी करावी लागतेय. पण झालंय असं, सलूनमध्ये दाढी केल्यानंतर मसाज आणि दाढी करण्याची क्रिया घरामध्ये योग्य रीतीने होत नसल्यामुळे त्वचेत जळजळ, केसांची अयोग्य वाढ, त्वचेला सूज, त्वचा लाल होणे, पिंपल्स येणे अशा समस्या निर्माण होतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला शेविंग करताना नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत काही खास गोष्टी सांगणार आहोत.

१) सतत एकच ब्लेड वापरू नका.
– अनेकांना शेविंग करताना प्रत्येकवेळी तोच तोच ब्लेड वापरण्याची सवय असते. पण मित्रांनो, यामुळे त्वचा खराब होते. त्यात अनेकांना असे वाटते कि, जर ब्लेडला धार असेल तर वारंवार वापरायला काय हरकत आहे. पण तरीही त्वचेच्या आरोग्यासाठी ४-५ वेळा शेविंग केल्यानंतर ब्लेड बदलाच. नाहीतर त्वचेचं नुकसान होऊ शकतं.

२) जुना वा गंज आलेला ब्लेड वापरू नका.
– अनेकदा शेविंग करताना मिळेल तो ब्लेड वापरला जातो. मग तो जुना आहे का? गंज लागली आहे का? हे पहिले जात नाही आणि याचा परिणाम काही वेळाने दिसून येतो. मुळात जुन्या ब्लेडचा वापर केल्यामुळे त्वचा कापली जाण्याची शक्यता असते. तर गंज लागलेल्या ब्लेडच्या वापरामुळे त्वचेवर रक्त येणं, पु तयार होणं, पुटकुळ्या येणं असे त्रास जाणवतात.

३) एकमेकांचे शेविंग किट वापरु नका.
– अनेक घरात वडील आणि मुलगा असे दोघेही खर्च कशाला? असा विचार करूनच एकच शेविंग किट म्हणजेच – ब्लेड, कात्री, ब्रश वापरतात. पण प्रत्येकाची त्वचा हि वेगळी असते. यामुळे एकच ब्लेड दोघांत किंवा दोघांपेक्षा जास्त लोकांमध्ये वापरले असता त्वचेचे मोठ्या प्रमाणावर खोलपर्यंत नुकसान होऊ शकते.

४) योग्य शेविंग क्रीमचा वापर करा.
– अलिकडे त्वचेच्या पोतानुसार शेविंग क्रीम बाजारात उपलब्ध असतात. अश्यात शेविंग क्रीमचा वापर केल्यामुळे जर त्वचेवर डाग येत असतील तर शेविंग फोमचा वापर करा.

५) रोज शेविंग करू नका.
– आजकालच्या तरुण मुलांना सतत क्लीन शेव ठेवणे आवडते. यामुळे आपण चॉकलेट बॉय वाटतो असा एक गैरसमज मुलांमध्ये आहे. पण क्लिन शेव ठेवण्यासाठी रोज शेविंग करणं गरजेचं नसतं. यामुळे त्वचेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकत. यामुळे आधी केस पूर्ण वाढू द्या आणि मगच शेविंग करा.

६) ब्लेड किंवा रेजर फिरवताना जोर काढू नका.
– शेविंग करताना हलक्या हाताने ब्लेड वा रेजर फिरवा. यासाठी ताकद लावू नका. कारण ब्लेडला धार असल्याने रेजर हलक्या हाताने फिरवलं तरी काम होते. जोरात रेजर फिरवल्यामुळे खाज सुटण्याची शक्यता असते.

७) शेविंग करताना थंड पाणी वापरू नका.
– शेविंग करताना शक्यतो थंड पाण्याचा वापर करु नका. कारण थंड पाणी वापरल्यामुळे त्वचा कडक होते आणि शेविंग करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. म्हणून शेविंग करताना कोमट पाण्याचा वापर करा.