| | |

आरोग्याची पुकार केवळ संतुलित आहार; कोणत्या वेळी काय खाल? जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या दैनंदिन जीवनात स्वतःच्या आहाराकडे लक्ष देणे कठीण असले तरी अशक्य नाही. केवळ आहाराचे संतुलन देखील आपल्या आरोग्यास फायदेशीर ठरते. आपला आहार संतुलित असण्यासाठी त्यात प्रोटीन जीवनसत्त्व, खनिजद्रव्य, फॅट्स, कॅल्शियम, फायबर या घटकांचा समावेश करावा लागतो. कारण अश्या आहाराने शहरातील अवयव आणि अणू रेणू सुदृढ होऊन त्यांची वाढ होते.

आजकाल थोडे जरी वजन वाढले तरी लगेच रोजच्या आहारातील अधिकतम आहार कमी करण्याची प्रवृत्ती बळावली आहे. यामुळे शरीराला पूरक आहार मिळत नाही व शारीरिक कमकुवतपणा जाणवतो. त्यामुळे आपला आहार समतोल असावा याकडे लक्ष दिले पाहिजे. जेवणात भात, भाजी, आमटी, ताक, ज्वारी किंवा बाजरीची भाकरी आणि अगदी कोशिंबीर यांचा समावेश असावा. शिवाय हे अन्न कमी तेलात तयार केलेले असावे. तसेच कोणत्या वेळेला काय खावे हे देखील ठरलेले असावे. आज आम्ही तुम्हाला याचबाबत माहिती देणार आहोत, कि कोणत्या अन्न पदार्थाचे सेवन संतुलित आहाराचे समर्थन करते.

१) सकाळची न्याहारी – यात शारीरिक गरजेनुसार कॅल्शियम, प्रोटीन आणि लोहयुक्त पदार्थांचा समावेश असावा. यामुळे पोषणाकरिता एक ग्लास दूध, दही, ताक किंवा पनीरपैकी कोणत्याही एका पदार्थाचे सेवन करावे. दरम्यान शारीरिक उर्जेकरिता शिरा, पोहे, पोळी, टोस्ट, ब्रेड, अंडी किंवा फळे यांपैकी काहीही एक पूरक असते.

२) दुपारचे जेवण – यात शारीरिक गरजेनुसार प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स व लोहयुक्त पदार्थांचा समावेश असावा. यामुळे पोषणाकरीता एक मध्यम आकाराची वाटी घट्ट डाळ, उसळ व मांसाहारात १ मासळी किंवा चिकन वा अंड्याच्या पदार्थाचे सेवन करावे. यासह शारीरिक उर्जेकरीता चपाती, भात, भाकरी, ताक, दही व कोशिंबीर हे पदार्थ पूरक असतात.

३) संध्याकाळची न्याहारी – यात शारीरिक गरजेनुसार कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असावा. यामुळे पोषणासाठी आणि शारीरिक ऊर्जेसाठी भाजलेले चणे, पनीर किंवा लिंबू सरबत पूरक असते.

४) रात्रीचे जेवण – यात शारीरिक गरजेनुसार व्हिटॅमिन आणि सत्वयुक्त पदार्थांचा समावेश असावा. यामुळे पोषणासाठी भाकरी, पोळी, भात, फळभाजी, कोबी, गाजर, दुधी भोपळा व बटाटा या पदार्थांचे सेवन करावे. दरम्यान शारीरिक उर्जेकरीता कढी, सुप व कोशिंबीर ई. पदार्थ पूरक असतात.

– लक्षात ठेवा ⬇️

अ) आजच्या दगदगीच्या आयुष्यात आपल्याला स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळत नाही हे कितीही मान्य असलं तरीही शारीरिक गरजेसाठी वेळ काढणे आवश्यक आहे. बऱ्याचदा आपल्याकडून जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आणि जाहिरात बाजींमुळे फास्ट फूडचे अधिक सेवन केले जाते. जे आरोग्यावर दुष्परिणाम करतात यामुळे शक्यतो फास्ट फूड खाणे टाळावे.

ब) आपल्या शरीराची योग्यरीत्या काळजी घेण्यासाठी उत्तम प्रतीचा आणि संतुलित व सकस आहार यासोबत पुरेशी झोप आणि जोडीला व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे.