| |

अतिविचार करण्याची सवय मानसिक आरोग्यासाठी घातक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या टेन्शनमध्ये आहेच. मग कारण अगदी लहान असे वा मोठे. टेन्शन घेण्यासाठी कारण आहे हे एवढंच पुरेसा असत. हा जो तणाव आहे तो व्यक्तीला मानसिकरीत्या खचवतो आणि यामुळे माणसाचे मनोधैर्य सक्षम असणे गरजेचे आहे. अगदी लहान गोष्टीचा मुळापासून विचार करणे आणि स्वतःला त्रास करून घेणे हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. अनेकदा व्यक्ती इतर कोणत्या व्यक्ती वा वस्तूवर अवलंबून राहिल्यामुळे प्रत्येक बाबींचा जास्त विचार करण्याची सवय लागते. पण यामुळे काम बिघडते आणि जीवनावर याचा निश्चितच वाईट परिणाम होतो. या प्रकारच्या सवयीमुळे आयुष्यात उदासीनता येते. चला तर मग जाणून घेऊया अति विचार करणे आरोग्यासाठी कश्याप्रकारे घातक ठरू शकते ते खालीलप्रमाणे:-

१) नैराश्य येते – सतत नकारात्मक विचार केल्याने नैराश्यासारख्या गंभीर मानसिक आजाराचे आपण बळी पडू शकता. कारण एखाद्या गोष्टीचा जास्त विचार केल्याने मनातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि त्याजागी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे हळूहळू व्यक्ती मानसिक रोगी होते.

२) एकटेपणा येऊन आत्मविश्वास नष्ट होतो – खूप विचार करण्याच्या सवयीमुळे ती व्यक्ती लोकांपासून दूर होते. त्या व्यक्तीला समाज आणि घोळका दोन्हीही नको वाटते. परिणामी यामुळे अनेक वेळा ती व्यक्ती सामाजिक चिंतेचा बळी ठरते. यामुळे ती व्यक्ती जाणून बुजून लोकांपासून दूर पाळते आणि परिणामी आत्मविश्वास नष्ट होतो.

३) वेळ वाया जातो – जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा खूप विचार करतो तेव्हा आपण आपला मौल्यवान वेळ वाया घालवत असतो. यामुळे आपली विचारशक्ती कमी होते आणि आपण काय करू शकतो हे समजून घेण्याची मानसिकता हिरावली जाते. परिणामी आयुष्यातल्या अनेक चांगल्या संधींनाही अशी माणसं मुकतात.

४) भावनाशून्य होणे – एखादी व्यक्ती एकाच गोष्टीवर सतत विचार करू लागल्यामुळे त्याच त्याच विषयी सतत बोलते. अनेकदा स्वतःच्या चुकांसाठी समोरच्याला दोषी ठरवते. सतत भांडण, आरडा ओरडा आणि दुसऱ्याला पाण्यात पाहण्याची भावना या लोकांमध्ये उपजते. एका विशिष्ट काळानंतर हे लोक भावनाशून्य आणि स्वार्थी तसेच कुत्सित होऊ शकतात. परिणामी लोक अश्या व्यक्तींपासून अंतर राखू लागतात.

४) कामावर दुष्परिणाम होतो – जास्त विचार करण्यामुळे ती व्यक्ती सतत एकाच गोष्टीत अडकून राहते. परिणामी या गोष्टीचा कामावर वाईट परिणाम होतो. तसेच भूक आणि झोप दोन्ही बिघडते. याशिवाय नाती दुरावतात. म्हणूनच जास्त विचार करण्याची सवय सोडणे हेच अत्यंत गरजेचे आहे.

० जास्त विचार करण्याची सवय असेल तर या टिप्स फॉलो करा.

१) भूतकाळ आठवून दुःखी होऊ नका. उलट नव्या संधींचा विचार करा.

२) स्वतःला सतत विविध गोष्टींमध्ये व्यस्त ठेवा. छंद जोपासा. आवडीच्या गोष्टींमध्ये मन रमवा.

३) उत्सव आणि सोहळ्यांना आवर्जून उपस्थित रहा. इतरांसोबत मनसोक्त गप्पा मारा.

४) काहीही बोलण्याआधी विचार करा. सतत हिंसक वृत्ती जोपासू नका.

५) डिजिटल मीडियापेक्षा एखादे सकारात्मक पुस्तक वाचण्यावर भर द्या.

६) नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा. सतत नाही, नको अश्या शब्दांपासून अंतर राखा.

७) स्वतःचे दोष दुसऱ्यांवर ढकलू नका. चुकलात तर मान्य करायला शिका.