| | | |

कोकम का आहे एवढे ‘खास’!!!  जाणून घ्या कोकमचे आरोग्यवर्धक फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन । सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तहान लागत असते. यावेळी अनेकांना कोल्ड्रिंक पिण्याचा मोह आवरत नाही. मात्र त्यात रासायनिक घटक तसेच सोडा असल्यामुळे अशा प्रकारची कोल्ड्रिंक आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात . अशा वेळी घरगुती पेयांना प्राधान्य द्यावे. लिंबाचे सरबत, वाळ्याचे सरबत, कोकमचे सरबत उन्हाळ्यात पिण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबतासोबत कोकमच्या सरबतालाही अधिक पसंती दिली जाते. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी कोकमचे सरबत मदत करते.

कोकमचा उपयोग खूप पूर्वीपासून आहारीय पदार्थाबरोबरच औषधी म्हणूनही करतात. आमटी, भाजीत याचा उपयोग केला जातो. तर अनेक आजार बरे करण्यासाठी औषध म्हणूनही याचा वापर केला जातो. कोकमला मराठीत आमसूल तर संस्कृतमध्ये साराम्ल, इंग्रजीमध्ये कोकम तर शास्त्रीय भाषेत गार्सिनिया इंडिकाया नावाने ओळखले जाऊन कोकम ही वनस्पती गटिफेरी या कुळातील आहे. याची झाडे केरळ, कर्नाटक व कोकणामध्ये पुष्कळ प्रमाणात असतात. याचे फळ जांभळट लाल रंगाचे असते. हे फळ सुकल्यानंतरच त्याचा कोकम किंवा आमसूल म्हणून वापर करतात. याच फळांचा रस काढून त्याचे सरबत, सोलकढी बनविली जाते. कोकमच्या बीमधून तेलही काढले जाते. हेच तेल खाण्यासाठी व औषध म्हणूनही वापरतात. हे एक रसदार फळ आहे जे शरीराच्या उष्णतेला थंडावा देते. या फळांची साले सुकवून ठेवली जातात. कोकमाचा वापर डाळ, भाजीमध्ये प्रामुख्याने केला जातो. कोकम चिंचेप्रमाणे आंबट असते.

कोकममध्ये बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, पण त्याबरोबरच हायड्रॉक्सिसिट्रिक अॅसिड नावाचा अत्यंत महत्त्वाचा आरोग्यदायक घटक असतो. तसेच मँगनीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम अशी खनिजेही असतात.

 

कोकमचे कार्य

आयुर्वेदानुसार ‘कोकम’ ही अत्यंत उपयुक्त वनस्पती सांगितली आहे. आयुर्वेदामध्ये यास ‘वृक्षाम्ला’ किंवा ‘फलाम्ला’ असे नाव आहे. याचे फळ अत्यंत उपयुक्त वर्णिले आहे. मधुर, आम्लरसात्मक कोकम हे रुक्ष गुणात्मक असून पचनास जड असते. पचनानंतर हे आम्ल पाचक रसात परिवर्तित होते, असे आयुर्वेद सांगतो. कच्चे कोकम हे वात व पित्त दोषाचे निवारण करते, तर परिपक्व फळ हे कफ व वातदोषाचे निवारण करते. भूक वाढवणे, अन्नाची रुची वाढवणे, संग्राही (मलनिर्मितीस मदत करणे) ही कोकमची प्रमुख कार्ये आहेत. त्यामुळे पचनासंबंधी व्याधी, अतिसार, irritable bowel syndrome यात अत्यंत उपयुक्त ठरते. रोजच्या आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इ. तक्रारी दूर होतात. पचन चांगले होते.  यातील जीवनसत्त्वे व खनिजांमुळे गर्भिणीची प्रतिकारक्षमता वाढते. त्यामुळे गर्भावस्थेत हे अवश्य घ्यावे.

 

कोकम पचनसंस्था सुधारण्यास मदत करते.  यातील अँटी फंगल व अँटिऑक्सिडंट हे गुणधर्म त्वचा निरोगी ठेवतात.  इन्सुलिनचे नियमन करून मधुमेह आटोक्यात ठेवते.  नवीन संशोधनावरून कोकम हे आंतरिक अल्सरमध्ये उपयुक्त ठरते हे समोर आले आहे.  कोलेस्टेरॉलचे प्रमाण कायम ठेवून हृदयाचे आरोग्य कायम ठेवते. कार्डिओ टॉनिक असते.  शरीराचे तपमान थंड ठेवण्याचा गुणधर्म कोकममध्ये असतो.  त्वचा व केसासाठी उत्तम असते.  यातील हायड्रो-सायट्रिक अॅसिड हा घटक प्रतिकारक्षमता वाढवून वजन कमी करण्यास देखील मदत करतो.

औषधी गुणधर्म

कोकममध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, तंतूमय पदार्थ व क जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार कोकम हे रक्तपित्तशामक, दीपक, पाचक व ग्राही गुणधर्माचे आहे. कोकमची साल स्तंभन कार्य करते तर बीयांचे तेल स्तंभन व व्रणरोपक आहे.

उपयोग

 • चरकाचार्याच्या मते चिंचेपेक्षा कोकम हे जास्त औषधी गुणधर्मयुक्त व शरीरास गुणकारी आहे.
 • कोकम पाण्यात टाकून त्याचा काढा करून प्यायल्यास अपचन दूर होते.
 • कोकममध्ये पाणी घालून त्याचा कल्क बनवावा व हा कल्क पाण्यात टाकून त्यात वेलची, खडीसाखर घालून सरबत बनवावे. हे सरबत प्यायल्याने आम्लपित्त, दाह, तृष्णा, उष्णतेचे विकार दूर होतात.
 • कोकमचा कल्क, नारळाचे दूध, कोिथबीर व थोडे ताक एकत्र करून त्याची सोलकढी बनवून जेवणासोबत प्यावी. यामुळे घेतलेल्या अन्नांचे पचन व्यवस्थित होते.
 • अतिसार, संग्रहिणी आणि रक्ताचे जुलाब हे पोटात मुरडा येऊन होत असतील तर कोकमच्या कुस्करुन गाळलेले पाणी प्यावे.
 • अंगावर पित्त उठले असल्यास कोकमचा कोळ संपूर्ण अंगास लावावा.
 • पोटात कळ येऊन आव पडत असल्यास कोकमचे तेल भातावर घालून तो भात खावा.
 • हातापायांची उष्णतेमुळे आग होत असेल तर कोकमचे तेल संपूर्ण अंगाला चोळावे. यामुळे उष्णता कमी होऊन दाह कमी होतो.
 • हिवाळ्यात थंडीमुळे जर ओठ फुटत असतील तर कोकमचे तेल कोमट करून ओठांवर लावावे. ओठ मऊ होतात.
 • हिवाळ्यामध्ये शरीराची त्वचा कोरडी होऊन भेगा पडत असतील तर कोकमचे तेल गरम करून शरीरावर चोळल्यास भेगा नाहीशा होतात.
 • रोजच्या आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इ. तक्रारी दूर होऊन आहाराचे पचन चांगले होते.
 • कोकम तेलाचा उपयोग हा विविध प्रकारचे मलमे बनविण्यासाठी केला जातो.
 • कोकमचा उपयोग नियमितपणे आहारात केल्याने आतडे कार्यक्षम होऊन पोट साफ होण्यास मदत होते.
 • १० तोळे कोकम पाण्यात भिजत घालावे. नंतर ते कोकम पाण्यात कुस्करून ते पाणी गाळून घ्यावे व त्यात जिरेपूड, साखर घालून ते पाणी प्यायले असता शरीरावर आलेले शीतपित्त दूर होते.
 • मूळव्याधीचा त्रास होत असेल व त्यातून रक्त पडत असेल तर कोकमचा कल्क दह्य़ावरच्या निवळीत कालवून ती निवळी प्यावी. यामुळे रक्त पडणे बंद होते.

 

जाणून घ्या याचे फायदे

 • कोकम सरबताच्या सेवनाने चयापचय क्रिया चांगल्या पद्धतीने काम करते. यामुळे वजन घटवण्यास मदत होते.
 • कोकमच्या फळामध्ये व्हिटामिन सी, सायट्रिक अॅसिडयासोबतच अनेक पोषकतत्वे असतात. यामुळे इम्युनिटी सिस्टीम मजबूत होते.
 • कोकमच्या फळात आढळणारे अँटीऑक्सिडंट्स सूज कमी करण्यात मदत करतात. याशिवाय तुम्हाला हेल्दी बनवतात.
 • कोकमामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. तसेच कॅलरीजचे प्रमाण कमी असते.
 • कोकमामध्ये कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅट्स अजिबात नसते.
 • कोकममध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि मँगनीज असते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहतो.