| | |

बहुगुणी आवळ्याचे ‘हे’ आरोग्यवर्धक फायदे ठेवतील अनेक रोगापासून दूर 

हॅलो आरोग्य ऑनलाईन : आवळा हे फळ गुणवत्तेमध्ये सर्व फळांमध्ये श्रेष्ठ आहे. आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहार आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करता येतो. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. हिंदीमध्ये आँवला, संस्कृतमध्ये आमलकी, इंग्रजीमध्ये ‘एम्ब्लिका मायरोबेलान’ या नावाने परिचित आहे.आवळा पोषणाचं काम करतो. म्हणून आयुर्वेदात त्याला धात्री असंही म्हणतात. वार्धक्य अवस्था टाळून चिरतरुण राहण्यासाठी मदत करतो. म्हणून त्याला वयस्थाही म्हटले जाते. चरकाचार्य, वाग्भट, सुश्रूत या सर्व श्रेष्ठ ऋषींनी औषधामध्ये आवळ्याचा वापर करावयास सांगितलं आहे. उत्तर व दक्षिण भारतात आवळ्याचं उत्पादन घेतलं जातं. गुजरातमध्ये पावागड, डांग आणि सापुतारा येथील जंगलात आवळ्याचे वृक्ष मोठय़ा प्रमाणात दिसून येतात. आवळ्याचे पांढरे आवळे व रान आवळे असे दोन प्रमुख प्रकार आहेत. सुकलेल्या आवळ्यापेक्षा हिरवा ताजा आवळा आधिक गुणकारी असतो. आवळ्याचा छुंदा, मुरंबा, लोणचे, चटणी, अवलेह, कँडी, सरबत, सुपारी करून वर्षभर आवळा सेवन करता येतो.

गंभीर आजारांविरोधात लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं आवश्यक आहे. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी नियमित व्यायामासह आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश असावा. शरीरास पोषक असणाऱ्या तसंच मोसमाप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या फळ-भाज्यांचे सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. यापैकीच एक आरोग्यवर्धक फळ म्हणजे आवळा. आकारानं छोट्या असलेल्या या फळामुळे शरीर शुद्ध (Detox) होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. या फळापासून तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद आपण प्रत्येक मोसमामध्ये करू शकतो. आवळ्यातील पोषकतत्त्वांमुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात. आवळ्याची आबंट तुरट चव तुम्हालाही आवडत असल्यास यापासून तयार केलेल्या आवळा कँडी, मुरांबा, आवळ्याची चटणी अशा पदार्थांचे सेवन करू शकता. या पदार्थांपासून तुम्हाला भरपूर लाभ मिळतील. पण हे पदार्थ प्रक्रिया केलेले नसावे. जाणून घेऊया आवळ्याचे सेवनामुळे मिळणाऱ्या लाभांची माहिती.

आवळा हे फळ प्रक्रिया केल्यास आपल्याला वर्षभर औषध म्हणून वापरता येऊ शकते. आवळ्यापासून लोणचे, मुरंबा, ज्यूस, सुपारी, चूर्ण आदी पदार्थ तयार केले जातात. त्याचा विविध प्रकारच्या आजारांवर उपयोग होतो. आवळा शरीरासाठी अतिशय उत्तम मानला जातो. आवळा जीवनसत्त्व क चा उत्तम स्रोत आहे. आवळ्यात कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, तंतुमय पदार्थ, कार्बोहायड्रेट,अँटी-ऑक्सिडन्ट असतात. रोज आवळा खाल्ल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळू शकते. आयुर्वेदानुसार रोज सकाळी एक ग्लास पाण्यात १० मि.लि. आवळ्याचा ज्यूस मिसळून प्यायल्यास शरीरातील सर्व विषारी द्रव्ये बाहेर जाण्यास मदत होते.

आवळा हा म्हातारपण दूर करणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, स्फूर्तिवर्धक, पचनक्रिया सुधारणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा, हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेत पदर आदी आजारांवर गुणकारी आहे. आबालवृद्धांसाठी आवळा हे अति उत्तम औषध आहे. या फळामुळे शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.

आवळा हे फळ प्रक्रिया केल्यास आपल्याला वर्षभर औषध म्हणून वापरता येऊ शकते. लोणचे, मुरंबा, ज्यूस, सुपारी, चूर्ण आदी तयार करून त्याचा विविध प्रकारच्या आजारांवर औषध म्हणून वापर करू शकतो. आवळा तुरट-आंबट असल्याने पित्त, कफ , वात या आजारांवर जालीम औषध आहे. त्यामुळे त्याला त्रिदोषनाशकही म्हटले जाते.

आवळ्यातील पोषण मूल्ये (प्रति १०० ग्रॅम)

पोषक तत्त्वे    प्रमाण
प्रथिने ०.५ ग्रॅम
स्निग्ध पदार्थ ०.१ ग्रॅम
तंतुमय पदार्थ ३.५ ग्रॅम
जीवनसत्त्व ‘क’ ६०० मिलिग्रॅम
कर्बोदके १३.७ ग्रॅम
खनिजे  ०.५ ग्रॅम
ऊर्जा  ५८ किलो कॅलरी
कॅल्शिअम ५० मिलिग्रॅम
फॉस्फरस  २० मिलिग्रॅम
कॅरोटीन ९ म्यु ग्रॅम

औषधी गुणधर्म –
आवळा रक्तदोषहारक, पित्तशामक, सारक व रुचकर आहे. आवळा हा आम्ल-मधुर रसाचा, शीत-वीर्यात्मक व मधुर विपाकी असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो. यामध्ये शोधनाचा गुण असल्याने रक्तात साचलेली विषद्रव्ये दूर करून रक्त शुद्ध करतो. अशाच प्रकारे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सप्तधातूंमध्ये जाऊन प्रत्येक धातूतील विषद्रव्ये दूर करून सर्वच धातूंना शुद्ध बनवतो. या त्याच्या गुणांमुळेच शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणूनच नियमितपणे आवळा सेवन करणे आवश्यक आहे. ताजा आवळा उपलब्ध नसेल तर वाळलेल्या आवळ्याची पूड म्हणजेच आवळा चूर्ण औषधामध्ये वापरावे. आवळा चूर्णमध्येही ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.

मधुमेह
मधुमेहाच्या समस्येवर आवळा गुणकारी आहे. आवळ्यामध्ये क्रोमियम तत्त्व मोठ्या प्रमाणावर असतात. यामुळे शरीरातील इन्शुलिन पेशी मजबूत होऊन शरीरातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते. आयुर्वेदानुसार मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आवळ्याच्या रसात मध मिसळून खाल्याने फायदा होतो.

हृदयाची समस्या
आवळ्यामध्ये असणारे औषधी गुणधर्म बीटा ब्लॉकरच्या प्रभावाला कमी करतात. यामुळे व्यक्तीचे हृदय तंदुरुस्त राहते. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे कामही आवळा करतो.

पचनक्रिया सुधारणा
अन्न पचवण्यासाठी आवळा फायद्याचा ठरतो. नेहमीच अपचनाचा त्रास होत असल्यास २ ते ३ आवळ्याचे तुकडे खावेत. डायजेस्ट गोळ्या किंवा अॅन्टी अॅसिड औषधांपेक्षा आवळा सेवन करणे हा उत्तम पर्याय आहे. आवळा पचनतंत्रामध्ये गॅस्ट्रिक लिक्विड उत्पन्न करण्यास मदत करतो. हे लिक्विड पचन प्रक्रिया वाढवण्यास मदत करते. बद्धकोष्ठता, गॅस,ऍसिडिटी, अपचन, पोटासंबंधी अनेक समस्यांमध्ये आवळा फायदेशीर ठरतो. आवळ्याचे लोणचे, ज्यूस, चूर्ण यांसारख्या पदार्थांचा समावेश जेवणात करणे फायदेशीर ठरते.

वजन नियंत्रण
आवळा शरीरातील पचनक्रिया मजबूत करतो. यामुळे वजन नियंत्रण करण्यास मदत होते.

हाडांसाठी उपयुक्त
आवळ्यात मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम असते. आवळा सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. यामुळे ऑस्ट्रोपोरोसिस, अर्थराईटीस आणि हाडांचे आजार यांपासून मुक्ती मिळण्यासाठी आवळ्याचे सेवन करणे अत्यंत आवश्यक असते.

डोळ्यांसाठी गुणकारी
आवळ्यामध्ये कॅरॉटीन असल्यामुळे आवळ्याच्या रस नियमितपणे सेवन केल्यास याचा फायदा डोळ्यांना होऊ शकतो. मोतीबिंदू, दृष्टी कमी होणे, ब्लाइंडनेस यांसारख्या आजारापासून दूर राहता येते.

मासिक पाळीत गुणकारी
आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्त्व आणि खनिजे असतात. महिलांना मासिक पाळीच्या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पोटदुखी, कंबरदुखी, अनियमितता व इतर समस्यांवर आवळा गुणकारी ठरतो.

प्रादुर्भाव नियंत्रण
आवळ्यामध्ये जिवाणू आणि बुरशीचा प्रादुर्भाव नियंत्रणाची ताकद असते. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने प्रादुर्भाव होत नाही असे आयुर्वेद शास्त्र मानते. आवळा शरीरातील नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो. यामुळे पोट स्वच्छ राहते आणि आणि पर्यायाने मनही एकदम फ्रेश राहते.

उच्च रक्तदाब
आवळा, आवळ्याचा ज्यूस उच्च रक्तदाब, मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी आहे. अनेक डॉक्टर हाय ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आवळा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात.

मॉर्निंग सिकनेस
गर्भवती महिलांना सकाळी झोपून उठल्यावर अनेकदा मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो. आवळा स्फूर्तिदायक असल्यामुळे मॉर्निंग सिकनेसपासून बचाव करण्यासाठी आवळा उत्तम उपाय आहे. सकाळी उठल्यावर चक्कर किंवा उलटीसारखं होत असल्यास कच्चा किंवा सुकवलेल्या आवळ्याचा एक तुकडा खाल्याने फरक जाणवतो.

तोंडाच्या दुर्गंधीवर उपाय
ज्या लोकांना सतत तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्या असते, त्यांच्यासाठी आवळा अतिशय फायदेशीर आहे. ज्या वेळी दुर्गंधी जाणवेल त्या वेळी आवळ्याचे २ ते ३ तुकडे खाल्ल्यास फायदा होतो. अॅन्टी-इन्फ्लेमेटरी तत्त्व असलेला आवळा दुर्गंधीचे कारण बनणाऱ्या जिवाणूंना नष्ट करतो.

सावधानता –
हिवाळ्यामध्ये सर्दी, खोकला, ताप हे आजार झाले असतील तर फ्रिजमध्ये ठेवलेले थंड आवळे सेवन करू नयेत. तसंच कच्चे आवळे खाऊ नयेत. यामुळे वरील आजार वाढतो. याशिवाय आवळा कुठल्याही स्वरूपात शरीरास रसायनाप्रमाणे उपयुक्तच आहे.  नियमितपणे रोज आवळा किंवा त्याचे पदार्थ सेवन केले तर तुम्हाला डॉक्टरांची गरज भासणार नाही.