| | | |

निरोगी राहायचे आहे पण वेळ नाही! मग सूर्यनमस्कार करा होतील ‘हे’ जबरदस्त फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन । सूर्य नसता तर पृथ्वीवर जीवन शक्य झाले नसते. सूर्यनमस्कार हे प्राचीन तंत्र आहे ज्याद्वारे सूर्यदेवाच्या प्रती  कृतज्ञता व्यक्त केली जाते. कारण सूर्य हा पृथ्वीवरील समस्त जीवसृष्टीचा स्रोत आहे. आता केवळ सूर्यनमस्कार कसे करावे हे माहित असणे पुरेसे नाही. या अतिशय प्राचीन तंत्रामागील विज्ञान समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे, कारण खोलवर समजून घेण्याने या अतिशय पवित्र आणि शक्तिशाली तंत्राकरिता योग्य दृष्टीकोन आणि पद्धत प्राप्त होईल. पालकांनी त्यांच्या मुलांना वयाच्या आठव्या वर्षापासून नियमित सूर्यनमस्कार घालण्याची सवय लावावी. मुलांना चांगलं आरोग्य दिल्यास तुमची मुले हवे ते मिळवण्याची क्षमता निर्माण करतील.

डोळ्यातील चमक, चेहऱ्यावरचं तेज हे आंतरिक ऊर्जेवर अवलंबून असतं. वेट ट्रेनिंग, फंक्शनल ट्रेनिंग, स्ट्रेचिंग, कार्डियो या सर्वांचे फायदे सूर्यनमस्काराने मिळतात. पृथ्वीवरच्या सगळ्या जीवांना जगवणारी, शरीर-मन-बुद्धीला विकसित करणारी सौर शक्ती हा आपला प्राण आहे. सूर्य आपल्या शरीरातील असंख्य स्थानांमध्ये चैतन्य स्वरूपात अखंड कार्यरत असतो. रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे, त्या दिवशी सर्वत्र सूर्यनमस्कार केले जातात. वैज्ञानिक दृष्टिकोनात पाहिल्यास सूर्य किरणांपासून मिळणारे व्हिटॅमिन ‘डी’ आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते. आपल्या प्रत्येक पेशीचे पोषण करण्यासाठी आणि आपल्या व्यक्तिमत्त्वात उत्साह, शौर्य, वीर्य, साहस, तेज, ओज ज्वलंत ठेवण्यासाठी दररोज हा आरोग्याचा दहा आकडी खजिना लुटा!

आपण जर पुढील समस्येने ग्रस्त असाल तर नक्कीच सूर्यनमस्काराबद्दल विचार केला पाहिजे

तुम्हाला जाडी कमी करायची आहे?

पोश्चर सुधारायचंय?

ढेरी सुटली आहे?

स्टॅमिना कमी पडतोय?

मनाचा ताजेपणा, एकाग्रता हवी आहे?

शरीराच्या काही ना काही कुरबुरी सुरू आहेत?

दीर्घकाळ तरुण दिसायचंय?

शारीरिक ऊर्जा कमी पडते?

व्यक्तिमत्त्वाची छाप पडत नाही?

ध्येयहीन वाटतंय?

सूर्यनमस्कारातील दहा कृती व आसने :

उर्ध्वहस्तासन

पादहस्तासन

अश्वसंचालनासन

दंडासन

अष्टांगनमनासन

भुजंगासन

अधोमुखश्वानासन

अश्वसंचालनासन

पादहस्तासन

उर्ध्वहस्तासन

अनेक पुस्तकांमध्ये या आसनांना वेगवेगळी नावे दिली आहेत. नावाने गोंधळून न जाता ही आसने करण्याची योग्य पद्धत समजून घ्या. अनेक जण सूर्यनमस्कार बारा आकड्यांतही करतात. सूर्य नमस्कारात योग्य पद्धतीने श्‍वास घेणे व सोडणे महत्त्वाचे आहे. या श्वासोच्छ्वासाच्या पद्धतीही अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे करतात. समजून घेण्यासाठी हे लक्षात ठेवा की शरीर जमिनीपासून वर उचलताना किंवा प्रसरण (Expansion) करताना श्वास आत घ्या व शरीर आकुंचन (Contraction) करताना श्वास बाहेर सोडा. पहिल्यांदा करत असाल तर शास्त्रशुद्ध प्रकारे योग शिक्षकांकडून शिकून घ्या.

सूर्य नमस्काराचे फायदे 

– शरीराच्या सर्व भागांचा मजबूतपणा, लवचिकता वाढतो.

– स्टॅमिना वाढतो.

– स्थूलत्व कमी करण्यासाठी उत्तम व्यायाम.

– सर्व आंतरिक अवयवांचे व संस्थांचे कार्य सुरळीत होते, ज्याने अनेक रोग नाहीसे होतात.

– मनाची एकाग्रता, ताजेपणा वाढतो.

– थकवा नाहीसा होतो.

– चयापचय (Metabolism) सुधारते.

– लहान मुलांमध्ये उंची वाढवण्यासाठी उत्तम व्यायाम.

– बद्धकोष्ठता (Constipation) कमी होते.

– सूक्ष्म रक्ताभिसरण (Micro-Circulation) वाढते.

– पाठीचे स्नायू तंदुरुस्त होतात व कणा लवचिक होतो.

– अनेक आजारांवर उत्तम उपाय.

– स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्यायाम, मासिक पाळीसंबंधीचे त्रास कमी होतात.

– डिप्रेशन, ब्रेन फॉग वर गुणकारी.

– दीर्घकाळ तारुण्य टिकवण्यासाठी सूर्यनमस्कार मदत करतात.

 

सूर्यनमस्काराचे याशिवाय आणखीही अनेक फायदे आहेत.

हात-पाय-पाठ व सर्व स्नायूंना बळकट करणारे, आंतर इंद्रियांना निरोगी ठेवणारे, मन-बुद्धीला ऊर्जा देणारे असे सूर्यनमस्कार हा आबालवृद्ध-स्त्री-पुरुष सर्वांसाठी ‘ऑलराउंड’ असा व्यायाम आहे. आपल्या निरोगी शरीराचे सूत्र तीन मुख्य प्रणालींवर अवलंबून असते – पचनसंस्था, हृदय व श्वसन संस्था आणि मज्जासंस्था. या सर्वांचे कार्य सूर्यनमस्काराने सुधारते. पालकांनी त्यांच्या मुलांना वयाच्या आठव्या वर्षापासून नियमित सूर्यनमस्कार घालण्याची सवय लावावी. मुलांना चांगलं आरोग्य दिल्यास तुमची मुले हवे ते मिळवण्याची क्षमता निर्माण करतील. सुरुवात करताना पहिले चार सूर्यनमस्कार घाला, मग हळूहळू वाढवा. घाई न करता, आपल्या क्षमतेनुसार करा. वारशाने तुमच्यापर्यंत आलेल्या आजारांना तुम्हाला व तुमच्या पुढच्या पिढीला कवटाळू देऊ नका, त्यांना धुडकावून लावा. सूर्यनमस्कार आजच सुरू करा!