| |

जगातील पहिल्या DNA आधारित कोरोना लसीला देशात मान्यता; पी.एम मोदींनी केला आनंद व्यक्त

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गतवर्षापासून संपूर्ण जगभरात कोरोना नामक विषाणूने आपल्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. अलीकडेच कोरोनाची दुसरी लाट हलकेच ओसरू लागत असली तरीही पूर्ण धोका अद्याप टळलेला नाही. कारण देशात कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका वारंवार वर्तवण्यात येत आहे. या तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी सर्व स्तरावरून सध्या अतोनात प्रयत्न सुरु आहेत. याकरिता सर्व फार्मास्युटीकल कंपन्यादेखील तयारीला लागल्या आहेत. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करता यावे यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न आरोग्य यंत्रणेकडून केले जात आहेत.

यानंतर आता देशवासियांसाठी अत्यंत चांगली बातमी समोर येत आहे. ती म्हणजे, भारतीय औषधी कंपनी झायडस कॅडिलाची लस ‘Zycov-D’ला सरकारकडून आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मुख्य म्हणजे ही जगातील पहिली DNA आधारित लस आहे. भारतीय औषध नियंत्रक जनरल ऑफ इंडियाच्या लसीसाठी शुक्रवारी तयार करण्यात आलेल्या विषय तज्ञ समितीने आपत्कालीन वापरासाठी ‘Zycov-D’च्या लसीची शिफारस केली आहे.

यात प्रामुख्याने सांगायची बाब अशी कि, Zycov-D ही भारत बायोटेकच्या Co-vaccine नंतर थेट दुसरी स्वदेशी लस आहे. शिवाय झायडस कॅडिला लस ही पहिली डीएनए-आधारित लस आहे. त्यामुळे वायरस म्युटेशन झाल्यास डीएनए-आधारित लसचे फॉर्म्युलेशन अगदीच सहजपणे बदलता येते.

या संदर्भात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून हर्ष व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीवर आनंद व्यक्त करीत एक ट्विट केले आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले कि, भारत पूर्ण जोमाने कोविड -१९ शी लढा देत आहे आणि जगातील पहिल्या डीएनए आधारित ‘ZyCov-D’ लसीला मान्यता मिळणे YdZydusUniverse भारताच्या शास्त्रज्ञांच्या नाविन्यपूर्ण उत्साहाची साक्ष आहे. खरंच हा एक महत्त्वाचा पराक्रम आहे. ही कामगिरी देशाला कोरोनाविरोधातील लढण्यास खरोखरीच मदत करणार आहे.