| | |

दातांचा पिवळेपणा दूर करायचा आहे; ‘हि’ आहेत पिवळ्या दातांची कारणे आणि त्यावरील उपाय (पूर्वार्ध)

हॅलो आरोग्य ऑनलाईन: आपण रोजचं सकाळी दात स्वच्छ करतो. अनेकजण रात्री झोपतानाही दात स्वच्छ करून मगच झोपतात.  तरी सुद्धा अनेकांच्या दातांवर नेहमी काळे, पिवळे डाग दिसून येतात. साधारणपणे जे लोक पान, गुटखा, तंबाखू खातात किंवा चहा जास्त ..पितात त्यांच्या दातांवर काळे, पिवळे डाग पडतात. वैद्यकिय परिभाषेत या पिवळ्या डागांना प्लाक म्हणतात. काळ्या डागांना टार्टर म्हणतात.

प्लाक आणि टार्टर म्हणजे काय?

प्लाकमुळे दात पिवळे दिसून येतात. प्लाक एक चिकट पदार्थ आहे. ज्यामुळे दातांवर एक थर तयार होतो. तोंडात असलेल्या बॅक्टेरियांमुळे प्लाक वाढत जातात. जेव्हा तुम्ही घास चावून खाता तेव्हा अन्न लाळेसोबत मिक्स होते. त्यानंतर बॅक्टेरियांद्वारे अन्नपचनाचे काम केले जाते. त्यामुळे दातांच्यामध्ये अन्नकण अडकल्याने प्लाक तयार होतात. जे लोक रोज दोन ते तीन वेळा दात स्वच्छता करतात त्यांच्या दातांवर प्लाक जमा होत नाही. जे लोक नियमित, व्यवस्थित दात घासत नाही त्यांचे दात प्लाकमुळे खराब होतात. जेव्हा दीर्घकाळ दातांमध्ये प्लाक जमा होतं तेव्हा त्याचा रंग जास्त पिवळा किंवा काळा होत जातो. त्याला टार्टर असं म्हणतात. ज्या व्यक्तीच्या दातांमध्ये पिळवे डाग दिसून येतात तेव्हा दातांमध्ये प्लाक जमा झालेले असतात. त्यामुळे हिरड्यांना नुकसान पोहोचते. सतत हिरड्यांवर परिणाम झाल्याने गंभीर आजारांचा धोका उद्भवतो. प्लाक आणि टार्टरमुळे श्वासांना दुर्गंधी येण्याची समस्या उद्भवते. कॅविटीज येणं, तोंडातून दुर्गंधी येणं, हिरड्या खराब होणं, पेरिओडोन्टल समस्या, जिंजीवा म्हणजेच हिरड्यांना सूज येणं अशा समस्या उद्भवतात.

 

दात पिवळे पडण्याची ही आहेत कारणं (Causes of Yellow Teeth)

प्रत्येकाच्या दातांचा शेड हा जरी वेगवेगळा असला तरी पिवळे पडलेले दात नेहमीच वेगळे दिसतात.तुमच्या दातांचा रंग तुम्हाला पिवळा वाटत असेल तर ही काही कारणं आहेत ज्यामुळे तुमचे दात पिवळे पडत आहेत. नेमकी काय आहेत कारणे ते पहिल्यांदा जाणून घेऊयात.

दात वेळच्या वेळी न घासणे किंवा चुकीच्या पद्धतीने दात घासणे:

काही जणांना दात घासण्याचा फारच कंटाळा असतो. सकाळी आणि रात्री झोपताना ब्रश करण्याची सवय ही नेहमीच चांगली असते. पण काहींना दोन वेळा ब्रश करणेही जीवावर येते. तुम्ही दिवसभर खाल्लेलं अन्न तुमच्या दातांवर तसेच राहिले की, आपसुकच तुमचे दात पिवळे दिसू लागतात. दातांवर हळद किंवा तुम्ही खाल्लेल्या खाद्यपदार्थांचे डाग राहतात. त्यामुळे तुमचे दात न घासणे किंवा चुकीच्या पद्धतीने घासणे तुमच्या दातांचा शुभ्रपणा घालवू शकते.

दात किडणे

दात स्वच्छ केले नाहीत तर तुमच्या दातांना किड लागणे स्वाभाविक आहे. किडलेले दात कधीच शुभ्र दिसत नाही. ते दात हळुहळु कमकुमव होतात. त्यांचा रंग बदलत जातो. जर तुमचे दात किडले असतील तर तुम्हाला त्यांचा रंगही बदलेला जाणवेल. त्यामुळे दात किडणे हे देखील तुमच्या दातांच्या रंगावर परिणाम करत असते. तसेच ते आतून पोकळ होऊन नाजूक होत जातात. असे दात कधीही जोराच्या चाव्यामुळे पडू शकतात.

चहाचे, कॉफीचे अतिसेवन

काही जणांना सतत चहा, कॉफी पिण्याची सवय असते. कॉफीमध्ये असलेले कॅफेन तुमच्या दातांचा रंग बदलत असते. जर तुम्ही जास्त कॉफी पित असाल तर तुम्हाला तुमच्या दातांवर आलेला पिवळा थर नक्कीच दिसेल. त्यामुळे तुमचे दात पिवळे करण्यामागे हे आणखी एक महत्वाचे कारण आहे.

दारु आणि धूम्रपानाची सवय

वारंवार धूम्रपान आणि दारु पिण्याची सवयही तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी चांगली नाही. त्यामुळे दारुमध्ये असलेले इतर घटक व अल्कोहल आणि सिगारेटमध्ये असलेले तंबाखू तुमच्या दातांना पिवळे करु शकते. जर तुम्ही दारु पिणे आणि सिगारेट पिणाऱ्यांचे दात पाहाल तर तुम्हाला त्यांचे दात पिवळे झालेले दिसतील.

कोल्ड्रींक्स किंवा ऍसिडिक पेये

अनेक जणांना जेवणासोबत कोल्ड्रींक किंवा जेवल्यानंतर सोडा पिण्याची सवय असते.  कोल्ड्रींक्स सतत पिणे तुमच्या दातांसाठी घातक आहे. कारण कोल्ड्रींकमध्ये असलेले अॅसिडीक घटक तुमच्या दातांचा रंग हळुहळु पिवळा करतात. तुम्ही अगदी कोला पासून ते पांढऱ्यारंगाचे असे कोणतेही कोल्ड्रींक तुमच्या दातांना पिवळे करु शकते. तुमच्या दातांना नाजूक करण्याचे कामही कोल्ड्रींक्स करते.

हि आहेत महत्वाची कारणे, कि ज्यामुळे तुमचे दात पिवळे होऊ शकतात. पुढील भागात आपण घरगुती उपायांनी दातांचा पिवळेपणा कसा दूर करता येईल ते पाहुयात. (पूर्वार्ध)