|

निपाहमूळे घाबरण्याची गरज नाही – वटवाघूळ संशोधक डॉ. महेश गायकवाड

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सर्वात महत्वाचे म्हणजे नाव एक पण प्रकार अनेक. असेच काहीसे निपाहबाबत झालेय. सर्वात जास्त धोकादायक प्रकार मलेशियात असणाऱ्या फलहारी वटवाघळामध्ये आढळतो, आपल्या भारतातील वटवाघळामध्ये नाही, म्हणून घाबरून जाऊ नये, फक्त काळजी घ्यावी लागेल. कुठही फिरताना झाडाखाली असणारी पक्षी, वटवाघूळ यांची उष्टी फळे खाऊ नका बस एवढंच, असे विधान वटवाघूळांवर अभ्यास करणारे संशोधनकर्ते डॉ महेश गायकवाड यांनी सांगितले. नागरिकांमध्ये पसरलेली काळजी पाहता त्यांनी कोरोना वायरस आणि निपाह वायरस यासंदर्भात विशेष माहिती दिली आहे. तर जाणून घेऊयात काय म्हणाले वटवाघूळ संशोधक डॉ महेश गायकवाड.

निपाह व्हायरस मधील हा व्हायरस मानवाला घातक आहे का? याबद्दल अजूनही संशोधकांना माहिती नाही, तोपर्यंत आपल्या मिडीयाने जगासमोर दुसर संकट म्हणून बातमी केली, हा केवढा बालीशपणा आहे. अहो निपाह व्हायरस मध्ये सुद्धा अनेक प्रकारचे व्हायरस आहेत, ज्यामुळे मानव जातीला कुठलाही धोका नाही, पण संशोधन होण्याअगोदरच हा निपाह आणि मलेशिया मधील फळहारी वटवाघूळात असणारा एकच व्हायरस अशी बातमी करणे म्हणजे वन्यजीव कायदा १९७२ नुसार गुन्हाच नव्हे काय. यात संशोधकांनी सुद्धा थांबायला शिकले पाहिजे, उठसूट मिडियाकडे संशोधन देताना काळजी घेणे गरजचे आहे,

वटवाघळे निशाचर प्राणी आहेत, त्यामुळे आपला आणि त्यांचा संबंध येत नाही. ते रात्रभर झाडावरील बिया एका जागेवरून दुसरीकडे टाकण्याचे महत्वाचे काम करीत असतात, अर्थात वर्षभर वृक्षारोपण कार्यक्रम रात्रभर सुरु असतो. शिवाय कीटक खाणारी वटवाघळे कीटक नियंत्रण करीत असतात. आपण फक्त उष्टी फुले,फळे खाऊ नयेत, मग ती कुठल्याही वन्यप्राण्यांची असोत. एवढी काळजी घेतली तर मग भीती कश्याला हवी निपाहची.

महाबळेश्वरमध्ये एकालाही निपाह झाल्याची नोंद नाही. याचा अर्थ आपल्याला घाबरण्याची गरज नाही. NIV ने महाबळेश्वर मधील स्थानिक लोकांवर संशोधन केले कि समजेल निपाह आहे कि अजून दुसरच काय? संशोधन होणे गरजेचे आहे. शिवाय वन विभाग, इतर संशोधकांना सुद्धा NIV ने विश्वासात घेऊन संशोधन करणे गरजेचे आहे. अन्यथा संरक्षण व संवर्धन कसे करावे, हे त्यांना कधीच समजणार नाही. संशोधन हे सर्वांगीण असावे, ते अर्धवट असले कि मग वन्यजीवांचा नाश अटळच आहे

शिवाय निपाह व्हायरसला लोकांनी अजिबात घाबरून जाऊ नये. कारण हे सर्व व्हायरस जगभरात अगोदरपासून आहेत. महाबळेश्वरात काही गुहा खूप मोठ्या आहेत, जिथे मी स्थानिक लोकांबरोबर गेली २० वर्षे काम करतोय. अजून तरी स्थानिक लोक व मी जिवंत आहे, निपाह व्हायरसने मेलो नाही, कारण तो मलेशियामधील वटवाघळासारखा नक्कीच नाही आणि जरी असेल तरी घाबरू नये, कारण आपल आणि वटवाघळामधील सामाजिक अंतर जास्त आहे. शिवाय सर्व वटवाघळामध्ये निपाह व्हायरसने आजारी असतात असे अजिबात नाही, नाहीतर सगळी वटवाघळे मरतील. निसर्गात जो कुमकुवत झाला तो संपला, हा नियमच आहे.

यापुढील काळात जो मातीत, सूर्यप्रकाशात काम करेल, घाम गाळेल. नियमित व्यायाम, चालणे, पोहणे, सकस आहार, डोंगरावरील ट्रेक्स करतील, जीवनशैलीत बदल करून नैसर्गिक जीवनशैलीचा अवलंब करतील तेच टिकतील. – डॉ महेश गायकवाड, वटवाघूळ संशोधक