|

‘हे’ आहेत मातीच्या माठातील पाणी पिण्याचे गुणवर्धक फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन : उन्हाची काहिली सध्या वाढतच चालली आहे. उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी अनेकजण फ्रिजचे थंडगार पाणी पितात. मात्र फ्रिजमधील थंड पाणी आरोग्यासाठी मुळीच चांगले नसते. फ्रिजमधील थंड पाणी पिण्याचे अनेक दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. शिवाय अनेक ठिकाणी उन्हाळ्यात लोडशेडींग केली जाते. त्यामुळे वीजे अभावी फ्रिजचा वापर करणं शक्य होत नाही. पूर्वीपासून पाणी थंड करण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर केला जात असे. मातीच्या भांड्यात नैसर्गिक पद्धतीने पाणी थंड होते. सजीवांचे शरीर हे पंचमहाभूतांपासून तयार झालेले असते आणि विलीन पण पंचतत्वात होते. थोडक्यात काय तर शेवटी जायचे आहे मातीतच ! तर मग अश्या मातीची ओढ आपल्याला लहानपणापासून असते. आणि सर्व चराचर सृष्टीला अन्न निर्माण करणारी माती किंवा मृदा हि अनेक जीवनसत्वांनी काठोकाठ बहरलेली असते.
मातीच्या भांड्यातील पाण्याला एक विशिष्ठ प्रकारची चव आणि गंध असतो. शिवाय मातीच्या भांड्यातील थंड पाण्याचे शरीरावर दुष्परिणामदेखील होत नाहीत. कारण मातीचे भांडे हे अनेक मिनरल्स आणि पोषकतत्वांचा खजिनाच असते. मातीच्या भांड्यातील पाण्यात हे गुणधर्म असतात. ज्यामुळे माठातील पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम असू शकते. छोटे- मोठे माठ, सुरई, रांजण, मडकी, मातीच्या बाटल्या, मातीचे जग अशी अनेक भांडी पाणी आजही बाजारात उपलब्ध असतात.
तुम्ही तुमच्या सोयीनुसार यातील मातीचे भांडे घेऊ शकता. मातीच्या भांड्याला एखादे सुती कापड गुंडाळून ठेवल्यास पाणी लवकर गार होते. शिवाय मातीच्या भांड्यात वाळा घालून ठेवल्यामुळे तुमच्या आरोग्यावर चांगले फायदे होतात. वास्तविक मातीच्या भांड्यात पाणी साठवणे, अन्नाचा साठा करणे, स्वयंपाक करणे ही आपली परंपराच आहे. मात्र सोयीनुसार या इतर प्रकारच्या भांड्यांचा वापर सुरू झाला. आजकाल मातीच्या भांड्याचे महत्त्व पटू लागल्याने मातीच्या भांड्याचा वापर पुन्हा केला जाऊ लागला आहे. मातीच्या भांड्यात दही लावल्यास ते चांगले लागते. मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नाला एक छान सुंगध असतो. उन्हाळ्यात प्राणी-पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी मातीच्या भांड्यातून पाणी ठेवावे.
मातीच्या भांड्यात पाणी नैसर्गिक पद्धतीने थंड कसे होते-
मातीच्या भांड्याला अनेक सूक्ष्म छिद्रे असतात. या छिद्रांतून भांड्यातील पाणी पाझरते. पाझरलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होते ज्यामुळे मातीचे भाडे आणि पाणी नैसर्गिक पद्धतीने थंड होते. माठातील पाणी नैसर्गिक पद्धतीने थंड झालेले असल्यामुळे ते पाणी पिण्याने कोणत्याही आरोग्यसमस्या होत नाहीत.
मातीच्या भांडयातील थंड पाणी पिण्यामुळे सर्दी,खोकला, घशाचे इनफेक्शन, ताप असे विकार होत नाहीत. उन्हाळ्यात मातीच्या भांड्यातील पाण्याने तुमची तहान लवकर भागते. मात्र फ्रिजमधील पाणी वारंवार प्यावेसे वाटते. माठातील पाणी पिण्याने डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.
मातीच्या भांड्यातील पाणी अल्काईनयुक्त असते. ज्यामुळे शरीरप्रकृती उत्तम राहण्यास मदत होते. मातीच्या भांड्यातील पाण्यामुळे ऍसिडिटीचा त्रास कमी होतो.
जेवण झाल्यानंतर थंडगार फ्रिजचे पाणी पिण्यामुळे तुमच्या पचनसंस्था मंदावते ज्याचा चुकीचा परिणाम तुमच्या मेटाबॉलिजमवर होतो. यामुळे पुढे अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठीच मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याची सवय लावणे नेहमीच योग्य ठरू शकते.
फ्रिजमधील पाणी हे प्लास्टिक अथवा इतर घटकांपासून बनविलेल्या बाटल्यांमध्ये साठवून ठेवावे लागतात. ज्यामुळे त्या पाण्यात प्लास्टिक अथवा इतर घटक मिसळतात. मात्र माठातील पाण्यात कोणतेही केमिकल्स नसतात. माठातील पाण्यामुळे उष्माघातापासून संरक्षण होते.
काय आहेत फायदे:-
नैसर्गिक थंडावा मिळतो
मातीच्या माठाला लहान लहान छिद्र असतात, त्यामुळे त्याच्यातील पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. अशावेळी तुमची तहान भागवण्यासाठी तुम्ही फ्रिजमधील थंड पाण्यावर अवलंबून राहू शकत नाही. शिवाय फ्रिजमधील अतिथंड पाण्याच्या सेवनाने अनेक व्याधी निर्माण होतात. यासाठी माठातले पाणी स्वस्त, पर्यावरण पूरक आणि आरोग्यदायी आहे.
माती नैसर्गिकरित्या अल्कलाईन:-
शरीरातील ऍसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणून जर तुमचं शरीराच्या आतील वातावरण ऍसिडिक असण्यापेक्षा अल्कलाईन असेल तर तुमचे आरोग्य उत्तम राहील. माती ही नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते. त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाईन होते.
केमिकल्स रहीत:-
बऱ्याच प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये ‘बीपीए’ नावाचे हानिकारक केमिकल असते, ज्याचा परिणाम आरोग्यावर विपरित होतो. म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते. तसंच पाणी दूषित होत नाही.