| | | |

मुलांच्या मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी ‘हे’ पदार्थ करतील मदत; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। या संपूर्ण जगात सगळ्यात वेगाने कुणी धावत असेल तर ते आहे आपलं मन. हो. कारण आपल्या वेगाच्या चौपट वेगाने ते पळत असतं. सारखं काही ना काही विचार करत असतं. त्याला एका क्षणाचीही उसंत नसते. सतत आपलं इथून तिथे आणि तिथून इथे. तुम्हाला माहित आहे का? बसल्या जागी आपलं मन अख्ख जग फिरून येऊ शकतं. याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे एकवेळ आपण आपल्या मनावर ताबा मिळवू शकतो. पण लहान मुलांचं तस नसतं. त्यांचं मन त्यांना जिथे नेईल तिथे ते खुश असतात. पण त्यामुळॆ अनेकदा मुलं अस्थिर होतात. त्यांना एकाच कामात रस राहत नाही. सतत चलबिचल करतात. यामुळे मुलांमधील एकाग्रतेची क्षमता लोप पावते. जर तुमचीही मुलं मनाचा पाठलाग करीत असतील तर त्यांना स्थिर करणे हि तुमची जबाबदारी आहे. यासाठी मुलांच्या आहारात काही महत्वाचे बदल करा. कोणते? ते जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) ब्रेकफास्टमध्ये धान्यांचा समावेश करा.
– मुलांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यास त्यांच्या शरीरातील ऊर्जा कमी होते. परिणामी त्यांचे लक्ष विचलित होते. चिडचिड वाढते. एकलकोंडेपणा येतो. त्यांच्या या समस्येवर नियंत्रण येण्यासाठी मुलांच्या नाश्त्यामध्ये कडधान्यांचा समावेश करा. यामुळे मुलांचे पोट भरलेले राहील आणि मुलं उत्साही, तितकीच क्रियाशील राहतील.

२) आहारात ब्राऊन राईस आणि बाजरीचा समावेश करा.
– तुमची मुलं सतत इकडे तिकडे पळत असतील आणि एखादे काम अर्धवट सोडत असतील. तर मुलांचे मन विचलित आहे. मुलांच्या शरीरातील पोषक घटकांची मात्रा कमी झाल्यास मन एकाग्र करणे त्यांच्या आवाक्याबाहेर जाते. यासाठी मुलांच्या आहारात विशेषतः ब्राऊन राईस आणि बाजरीचा समावेश करा. यामुळे त्यांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होईल आणि त्यांना वारंवार भूक लागणार नाही. यामुळे लक्ष केंद्रित राहण्यास मदत होईल.

३) अति साखर हानिकारक
– साखर चवीला गोड असली तरी आरोग्याचे नुकसान करू शकते. त्यामुळे तुमची मुलं फार साखर खात असतील तर आधी यावर नियंत्रण आणा. कारण यामुळे मुलांच्या मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो. मुलांना गोड खायची इच्छा झालीच तर मध, गुळाचा खडा किंवा खजूर त्यांना खायला द्या.

४) भूक भागवणारे कंदमुळ
– मुलांच्या आहारात कंदमुळांचा समावेश जरूर करा. यामुळे मुलांची अस्थिरता दूर होईल. त्यांचे पोट भरलेले राहील आणि यामुळे ते एका ठिकाणी मन एकाग्र करू शकतील. यात रताळी, अरबी, शिंगाडा या कंदमुळांचा समावेश असावा.

५) पिष्टमय पदार्थ
– मुलांच्या आहारात त्यांच्या शरीरासाठी पूरक असणारे पिष्टमय पदार्थ समाविष्ट करा. यातून त्यांच्या शरीराला सेरटोनिन नावाचे पोषकतत्त्व मिळते. या घटकामुळे मुलांच्या शरीराला सेरटोनिनचा योग्य पुरवठा होतो आणि त्यांचा मूड व्यवस्थित राहतो. यात चपाती, भाकरी, पोहे, भोपळा, भात आणि उपमा या पदार्थांचा समावेश आहे.