|

डोळे लाल होण्याच्या समस्येपासून ‘हे’ उपाय देतील सुटका; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा अति प्रवास किंवा रात्रभर जागरण यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ होणे, डोळे सुजणे आणि प्रामुख्याने डोळे लाल होण्याची समस्या जाणवते. तसे पाहाल तर हि समस्या अगदीच सर्वसामान्य आहे. मात्र डोळे लाल होण्याची इतरही करणे असू शकतात. जसे कि डोळे लाल होण्याचे मुख्य कारण म्हणजे डोळ्यात असलेल्या रक्तवाहिन्या सुजून प्रसरण पावणे. या एका क्रियेमुळे डोळे अगदी लालबुंद दिसतात. याशिवाय डोळे लाल होण्याची समस्या जास्त करून बाहेरील धूळ, माती वा कचरा डोळ्यात गेल्याने उत्पन्न होते. पण अनेकदा दुर्लक्ष केल्यामुळे हि समस्या गंभीर दिशेकडे वाटचाल करते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत डोळे लाल होण्याची प्रमुख कारणे आणि त्यावर घरच्या घरी कोणते उपाय केल्यास डोळ्यांना आराम मिळेल ते खालीलप्रमाणे:-

० डोळे लाल होण्याची प्रमुख कारणे –
– उन्हात फिरणे
अधिक वेळ उन्हात फिरल्यामुळे डोळ्यांवर उन्हाची तिरीप प्रकर्षाने पडते आणि डोळ्यांसमोर अंधारी येते व डोळे लाल दिसू लागतात.

– धूळ माती/ डोळे चोळणे
धूळ आणि माती डोळ्यात गेल्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ निर्माण होते आणि आपण डोळे चोळतो. परिणामी डोळे लालबुंद होऊन त्यातून पाणी येते.

– डोळ्याला इजा होणे
गर्दीच्या ठिकाणी कुणाचा हात डोळ्याला लागणे असेल किंवा बोट डोळ्यात जाणे यामुळे डोळ्यातील रक्तवाहिन्यांना दुखापत झाल्यास डोळे लाल होतात.

– डोळे येणे (व्हायरस बॅक्टेरिया)
डोळे येणे हा एक साथीचा रोग आहे. यामध्ये डोळ्यात लहान पुटकुळ्या आल्याने डोळे दुखतात आणि लालही दिसतात.

– एलर्जी
एखादी एलर्जी (धुळीची एलर्जी, विशिष्ट वस्तू-पदार्थ-फुल एलर्जी) असल्यास त्याच गोष्टीच्या संपर्कात आल्यामुळे डोळ्यांवर त्याचा परिणाम दिसून येतो.

– कमी झोप
झोप पूर्ण न होणे हि एक सामान्य बाब असली तरीही याचा परिणाम डोळ्यांवर होतो. परिणामी डोळ्याच्या कडा दुखणे, डोळे सुजणे आणि लाल होणे अश्या समस्या दिसून येतात.

– डोळ्यात क्लोरिन जाणे
डोळ्यात केमिकलयुक्त पाणी अर्थात स्विमिंग पुलचे क्लोरीनयुक्त पाणी गेल्याने डोळ्यांत खाज निर्माण होते आणि डोळे सुजतात. परिणामी डोळे लालदेखील होतात.

– धूम्रपान किंवा दारू पिणे
कोणत्याही मादक पदार्थांचे सेवन केल्यास त्याचा परिणाम डोळ्याच्या नसांवर होतो आणि डोळे दुखू लागतात. तसेच लाल दिसतात.

– जास्त वेळ मोबाईल किंवा कॉम्प्युटर वापरणे
कोणत्याही डिजिटल स्क्रीनचा वापर अधिक केल्यास डोळ्याच्या नसांवर ताण येतो आणि डोळे लाल होतात. तसेच डोळे सुजतात, अंधुक दिसू लागते व डोळ्यातून पाणी येते.

० घरगुती उपाय आणि खास टिप्स

१) डोळ्यांना थंड पाण्याने शेक द्या किंवा डोळ्यांवर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा. यामुळे डोळ्यांना थंडावा व आराम मिळतो.

२) मोबाईल फोन, टीव्ही, लॅपटॉप, कॉम्प्युटर अश्या डिजिटल स्क्रीनचा उपयोग कमीत कमी करा.

३) बाहेर जाताना प्रखर ऊन असल्यास सनग्लास वापरा.

४) दिवसभर कॉम्प्युटरवर काम करत असाल तर आपल्या रूममध्ये योग्य आणि पुरेसा प्रकाश ठेवा. शिवाय कॉम्प्युटरवर काम करताना अर्ध्या तासानंतर एक ब्रेक घ्या आणि स्क्रीनवरून डोळे सरकवून बंद करून ५ मिनिटांनी उघडा आणि दूरवर पहा.

५) ब्युटी आणि मेकअप प्रोडक्टचा वापर थांबवा. या प्रॉडक्टमध्ये वापरले जाणारे केमिकल डोळ्यांना नुकसान पोहचवते. प्रामुख्याने काजळ, सुरमा डोळ्यांवर ताण आणते त्यामुळे यांचा उपयोग टाळा.

६) एलोवेरा जेल अर्थात कोरफड जेल डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते. कारण यातील एल्कलाइन आणि एंटीइंफ्लामेटरी गुणधर्म डोळ्यांचा कोरडेपणा दूर करून त्यांना ओलावा प्रदान करतात. यासाठी डोळ्यांवर हे जेल ५-१० मिनिटे लावून नंतर डोळे स्वच्छ पाण्याने धुवा.

७) डोळ्यांची जळजळ थांबविण्यासाठी डोळ्यांत २-३ थेंब गुलाब जल घालावे. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो आणि नसा शांत होतात.

८) धूम्रपान अर्थात स्मोकिंग वा मद्यपान अर्थात दारू पिणे अश्या सवयी असतील तर सोडा. कारण यामुळे डोळे कोरडे होतात आणि नसांवर ताण येतो आणि डोळे लाल होतात.

९) रोजच्या आहारात हिरव्या पाले भाज्यांचा समावेश केल्यास डोळ्यांचे आरोग्य सुधारते. त्यामुळे जंक फूड आणि जड आहार नको. पौष्टिक आणि सात्विक आहार घ्या.

१०) डोळे लाल झाले असतील तर पाणी आणि मीठ हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. यासाठी एका भांड्यात पाणी उकळा आणि थंड करा. पुढे त्यात थोडे मीठ टाकून कापसाच्या सहाय्याने डोळ्यांवर लावा.

११) डोळ्यांच्या नसा शांत करण्यासाठी आणि डोळे लाल झाल्यास काकडी फायदेशीर आहे. कारण काकडीमध्ये Anti-Irritation गुणधर्म असतात. काकडी स्वभावाने थंड असल्याने तिच्या गोलाकार चकत्या कापून डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांतील खाज, सूज, जळजळ दूर होते. शिवाय डोळे लाल होणे या समसयेपासून सुटका होते.

१२) जर वारंवार डोळे लाल होत असतील, सूज चढत असेल यामुळे डोकेदुखी होऊन अंधुक दिसणे अश्या समस्या जाणवत असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार डोळ्यांचे ड्रॉप खरेदी करा. शिवाय डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा नियमित वापर करा.