| |

कोरोनाची लस न घेतलेल्यांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सर्वत्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर रोख बसविण्यासाठी लसीकरण मोहिमेला जोर आला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. यामुळे पुन्हा राज्यात गेल्या दोन वर्षांसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. असे असतानाही अनेक जण असे आहेत ज्यांना ना स्वतःची काळजी आहे ना आपल्या कुटुंबाची. असे म्हणण्याचे कारण म्हणजे अद्याप अनेक लोकांनी निव्वळ टाळाटाळ करीत लस घेतलेली नाही. यामुळे आता अखेर शासनाने देखील कडक कारवाईचा सूर धरायचे योजिले आहे.

दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी संबंधित नियम कठोर करण्यात आले आहेत. सध्या एक लस घेऊन तारीख उलटूनही दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळॆ जे नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत त्यांनी नियोजित तारखेनुसार डोस न घेतल्यास त्या व्यक्तीला ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तर वसुल करण्यात आलेल्या दंडाची ५०% रक्कम ही पोलीस प्रशासन तर उर्वरित ५०% रक्कम मनपा फंडात जमा होईल. हा नियम उद्यापासून अर्थात १५ डिसेंबर २०२१ पासून लागू करण्यात येणार आहे.

वृत्तानुसार, याआधी औरंगाबादमध्ये लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी पेट्रोल, गॅस, किराणा आणि अगदी कपडे खरेदीसाठी लसीकरण सक्तीचं केलं होतं. याशिवाय लसीचा किमान एक डोस असेल तरच दारू नाहीतर लस घेतली नाही तर दारू मिळणार नाही असे निर्बंध लावण्यात आले होते. इतकंच नव्हे तर बारमध्ये बसूनही दारु पिता येणार नाही असे आदेश काढण्यात आले होते. माहितीनुसार, फक्त औरंगाबादच नव्हे तर मराठवाड्यात कोरोना लसीकरणाचा टक्का मोठ्या प्रमाणात घसरला आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.