| |

हळदीचा फेसपॅक तुमच्या निखळ सौंदर्याला लावेल चार चाँद; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीय लोक स्वयंपाकात करत आहेत. याशिवाय शुभकार्यातदेखील हळदीचा सर्रास वापर केला जातो. हळदीचा वापर हा विविध प्रकारे फायदेशीर आहे. अगदी शारीरिक आरोग्यापासून, त्वचेचे सौंदर्य राखण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. याशिवाय रक्‍त शुद्ध होते. परिणामी त्‍वचेचा रंग उजळतो. यामुळे सौंदर्य प्रसाधनांमध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदीने अंग चोळल्यास अंगावरील मळ, मृत त्वचा निघून जाते व वर्ण उजळतो. कदाचित म्हणूनच हिंदू संस्कुतीत लग्नाच्या वेळी वर, वधूला हळद लावली जाते. हि हळद आपल्या त्वचेची काळजी घेण्यास सर्व बाजूने समर्थ असल्यामुळे हळदीचा वापर घरगुती उपायांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हळदीचे असे काही घरगुती फेसपॅक बनवण्याबाबत सांगणार आहोत जे तुमच्या सौंदर्याला एक वेगळेच तेज देण्यास लाभदायक आहेत. चला तर मग जाणून घेऊयात खालीलप्रमाणे:-

० आपण कोणत्या समस्येसाठी कोणता फेसपॅक वापरायचा हे पाहणार आहोत. यामध्ये तेजस्वी आणि कोमल त्वचा मिळवण्यासाठी कोणता फेसपॅक वापराल आणि ब्लॅकहेड्सची व मुरुमांच्या डागांची समस्या दूर करण्यासाठी तसेच त्वचा सोलपटत असल्यास कोणता फेसपॅक उपयुक्त आहे हे जाणून घेणार आहोत. खालीलप्रमाणे:-

१) तेजस्वी त्वचा – जर तुम्हाला तुमची त्वचा इतरांपेक्षा उजळ आणि तेजस्वी असावी असे वाटत असेल तर यासाठी खालील फेसपॅक वापर.
साधारण १ चमचाभर मधात, १/२ चमचा हळद आणि १ चमचा दूध घालून ओलसर पेस्ट बनवा. यानंतर हि पेस्ट अशीच १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवा. आता हि पेस्ट सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. त्यामुळे त्वचेचा पोत साहजिकच सुधारतो आणि सुरकुत्या कमी होतात. याशिवाय तुमच्या चेहऱ्यावरील मृत त्वचा दूर होते आणि चेहरा निखळ व तेजस्वी दिसू लागतो.

२) कोमल त्वचा – तुमची त्वचा रुक्ष वा राकट झाली असेल तर यासाठी तुम्ही हळदीच्या खालील फेसपॅकचा वापर करा.
यासाठी १ अंड्याच्या सफेद भागात १ चमचाभर हळद घाला आणि यात १ चमचा ऑलिव्ह ऑईल घालून पेस्ट बनवा. यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावून किमान १० ते १५ मिनिटे हे असेच ठेवा. आता फेसपॅक सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. या मास्कमुळे त्वचा उजळेल आणि त्वचेचा पोत सुधारेल. शिवाय त्वचेतील मॉईश्चर टिकून राहील आणि त्वचा कोमल होईल.

३) ब्लॅकहेड्सची समस्या – ब्लॅकहेड्सची समस्या तुम्हाला त्रास देत असेल तर यासाठी खालील फेसपॅक वापरा.
कोथिंबिरीच्या पानात २ चमचे हळद घालून त्याची बारीक पेस्ट बनवा. आता हि पेस्ट चेहरा, नाक, हनुवटी, कपाळ असे पूर्ण चेहऱ्यावर झोपण्यापूर्वी लावा. हा फेसपॅक पूर्णपणे सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. असे आठवड्यातून दोनवेळा करा. यामुळे ब्लॅकहेड्सची समस्या कमी होईल.

४) मुरुमांचे डाग – मुरूम आणि मुरुमांचे डाग फारच हट्टी असतात. ते घालवण्यासाठी तुम्ही खालील फेसपॅकचा वापर करू शकता.
यासाठी २ चमचे चण्याच्या पिठात, १/२ चमचा हळद आणि १ चमचा लिंबाचा रस घाला. हे मिश्रण अगदी मऊसर असे पेस्टसारखे बनवा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर एखाद्या फेसपॅकप्रमाणे लावा. यानंतर १५ मिनिटे ठेऊन थंड पाण्याने चेहरा धुवा. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा लावा. यामुळे मुरुमांचे डाग कितीही हट्टी असूदेत अगदी सहज निघून जातील आणि त्वचा उजळेल.

५) त्वचा सोलपटणे – अनेकदा अति उष्णता आणि अति थंडी यांमुळे त्वचेला भेगा पडतात. शिवाय त्वचा सोलपटते. हि स्थिती त्रासदायक असते. यापासून सुटका मिळवण्यासाठी खालील फेसपॅक वापरा.
-यासाठी १ चमचाभर हळदीमध्ये पाणी, दूध वा दही घालून ओलसर पेस्ट बनवा. हि पेस्ट चेहऱ्याला लावून गोलाकार पद्धतीने हळुवार मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. असे केल्यास ब्लॅकहेड्स निघतील, त्वचा मऊ होईल आणि त्वचेचे पोर्स टाईट होतील. परिणामी त्वचा सोलपटण्याचा त्रासही दूर होईल.