हॅलो आरोग्य ऑनलाईन। सकाळी अंथरुणातून उठल्या उठल्या सगळ्यात आधी तुम्हाला कोणत्या गोष्टीची तलफ लागते… अहो अर्थातच.. चहा. सकाळी उठल्यावर जर गरमागरम फक्कड असा चहा मिळाला कि दिवसाची सुरुवात कशी एकदम तरतरीत होते नाही का. त्यात आपल्या देशात चहा प्रेमींची काहीच कमी नाही. त्यामुळे फक्त सकाळीच नाही.. तर दुपारी, संध्याकाळी आणि अगदी मध्य रात्रीसुद्धा आपल्याकडे चहा सर्रास प्यायला जातो. चहा बनविल्यास तो गाळण्यासाठी आपण गाळणी वापरत असतो. खरंतर आधीच्या काळात मांजरपाट या कापडाचा वापर चहा गाळण्यासाठी केला जायचा. पण जसजसे आपण आधुनिक झालो तसतशा आपल्या वापरातील वस्तूदेखील आधुनिक झाल्या. त्यामुळे आतातरी चहा गाळण्यासाठी गाळणीच वापरतात.
तुम्ही अनेक घरात पाहिलं असेल कुठे प्लॅस्टिकची गाळण तर कुठे स्टीलची गाळण वापरली जाते … सांगायचं मुद्दा काय कि प्रत्येक घरात चहा गाळण्यासाठी गाळण वापरली जातेच. पण हि गाळणी बरेच दिवस वापरल्यानंतर यात चहा पावडरचे सूक्ष्म असे कण अडकून राहतात. यामुळे अनेकदा चहा व्यवस्थित गाळला जात नाही. शिवाय चहामध्ये पावडरचे कण पडतात. याव्यतिरिक्त चहामध्ये गाळणीत अडकलेले सूक्ष्म जंतू देखील मिसळले जाण्याची शक्यता असते. म्हणून चहाची गाळणी हि नेहमी स्वच्छ असणे गरजेचे असते. पण आता माझ्या मैत्रिणींना हा प्रश्न पडला असेल कि चहाची गाळण स्वच्छ कशी करायची? तर काळजी करू नका. आज आपण या लेखातून चहाची गाळण स्वच्छ करण्याच्या सोप्प्या टिप्स जाणून घेणार आहोत. तुम्हालाही या टिप्स जाणून घ्यायच्या आहेत ना? मग हा लेख जरूर पूर्ण वाचा. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) गॅसच्या फ्लेमवर गाळणी धरा – मैत्रिणींनो हा प्रयोग फक्त आणि फक्त धातूच्या गाळणीसाठीच करा. प्लॅस्टिकच्या गाळणीसाठी हा प्रयोग करू नका. आपल्याकडे धातूची गाळणी असेल आणि त्याच्या छिद्रांमध्ये पावडरचे कण अडकले असतील तर हि गाळणी काही मिनिटांसाठी गॅसच्या फ्लेमवर ठेवा. यामुळे गाळणीची छिद्रे मोकळी होतील आणि तुम्ही तुमची गाळणी पुन्हा वापरू शकाल. पण लक्षात ठेवा. गॅसवर तापवलेले गाळणी फ्लेम बंद केल्यानंतर लगेच हाताळायला जाऊ नका. यामुळे हात भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे गाळणी थंड झाल्यावर थेट पाण्याने स्वच्छ करा.
२) बेकिंग पावडर आणि व्हाईट व्हिनेगर – तुमच्या घरी कोणतीही गाळणी असो, अगदी धातूची वा प्लॅस्टिकची यासाठी तुम्ही बेकिंग पावडरचा प्रयोग करू शकता. यासाठी फक्त एका वाटीत १ मोठा चमचा बेकिंग पावडर आणि थोडंस व्हाईट व्हिनेगर व्यवस्थित मिसळून घ्या. आता या मिश्रणात थोडेसे पाणी घाला आणि यात गाळणी ४ ते ५ तास किंवा अगदी रात्रभर बुडवून ठेवा. त्यानंतर भांडी घासण्याच्या ब्रशच्या साहाय्याने किंवा जुन्या टुथब्रशने गाळणी स्वच्छ करा.
३) लिक्वीड साबण वापरा – लिक्विड साबण मिसळलेल्या पाण्यात चहाची गाळणी रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी भांडी घासण्याचा ब्रश वा जुना टुथब्रश यांच्या सहाय्याने गाळण व्यवस्थित स्वच्छ करा. गाळण लिक्विड साबणाच्या पाण्यात भिजत ठेवल्यामुळे गाळणीत अडकलेले कण भिजून मोठे होतात आणि अगदी सहज गाळणीच्या छिद्रातून बाहेर निघतात. अगदी अशाचप्रकारे गाळण महिन्यातून किमान २ ते ३ वेळा स्वच्छ केल्यास गाळण निर्जंतूक राहिल.
४) अल्कोहोलचा करा वापर – चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही अल्कोहोलचाही वापर करू शकता. यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि यात २ ते ३ चमचे अल्कोहोल मिसळायचे आहे. साधारण ८ तास वा रात्रभर गाळणी त्यात बुडवून ठेवा आणि सकाळी साबणाने गाळणी स्वच्छ करा.