|

मशरुमचा फेसपॅक वापरालं तर त्वचेचे आरोग्य सुधारेल; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। छत्रीसारखे दिसणारे मशरुम आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते. शिवाय मशरुम चवीला स्वादिष्ट असते. त्यामुळे मशरुम खाण्याची बातचं काही और आहे. मशरुमचा वापर करून भाजी, भजी, पुलाव, भुर्जी, पराठा याशिवाय पिझ्झा, बर्गर यासारखे पदार्थ देखील बनवता येतात. पण तुम्हाला माहित आहे का? मशरुम खाण्यासोबत आपल्या त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कसं काय? तर याच उत्तर जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

मशरुममध्ये कॉपर, सेलेनियम आणि पोटॅशियम यासारखे घटक समाविष्ट असतात. जे आपल्या त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे मशरुम खाण्याशिवाय त्याचा फेस पॅक बनवून चेहऱ्याला लावणे फायद्याचे ठरते. मशरुमच्या फेस पॅकमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. ज्यांमुळे चेहऱ्यावरील मुरुम आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मशरुमच्या फेस पॅकबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया मशरुम फेसपॅक बनविण्याचे साहित्य, करावयाची कृती आणि मिळणारे फायदे.

० मशरुम फेसपॅक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –
– मशरुम पावडर १ चमचा
– कप ओट्स १ चतुर्थांश
– चहा पातीचे तेल ३ थेंब
– लिंबाचा रस २ चमचे
– व्हिटॅमिन ‘ई’ ची कॅप्सूल १

० कृती – सर्वात आधी मिक्सरच्या साहाय्याने ओट्स आणि मशरुम पावडर घालून त्यात थोडे पाणी टाकून त्याची जाडसर पेस्ट तयार करुन घ्या. यानंतर या मिश्रणात चहा पातीच्या तेलाचे ३ थेंब, २ चमचे लिंबूचा रस आणि व्हिटॅमिन ‘ई’ची कॅप्सूल घालून हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्या. झाला तयार तुमचा मशरुम फेसपॅक.

० वापर – तयार फेसपॅक हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावर लावा. यानंतर साधारण १५ ते २० मिनिटांपर्यंत त्याला व्यवस्थित सुकू द्या. यानंतर आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. या फेसपॅकचा वापर तुम्ही आठवड्यातून २ वेळा करु शकता.

० फायदे
१) मशरुम फेसपॅक घरच्या घरी बनविणे सोप्पे असल्यामुळे वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात.
२) मशरुम फेसपॅकच्या वापराने चेहऱ्यावर साचलेली धूळ, माती अगदी सहज निघून जाते.
३) हा फेसपॅक योग्य पद्धतीने वापरला असता चेहऱ्यावर येणाऱ्या मुरुमांचे प्रमाण हळू हळू कमी होते आणि आपला चेहरा नैसर्गिकरित्या चमकतो.
४) मशरुममध्ये असणारे टोनर घटक चेहरा डागरहित बनविण्यास मदत करतात.