हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या हिंदू धर्मातील पवित्र दिवसांचा मार्गशीर्ष माह सुरु आहे. या दिवसांत अनेकांचे उपवास असतात. प्रामुख्याने यात स्रियांचा मोठा सहभाग असतो. आजकाल प्रत्येकाची जीवनशैली अत्यंत धावपळीची झाली आहे. त्यामुळे उपवासाच्या दिवशी अंगातील त्राण निघून गेला का काय? असेच अनेकांना वाटते. आता अख्खा दिवस काम करायचे असेल तर शरीरात ऊर्जा हवी आणि ऊर्जा हवी असेल तर पोटात भर हवी. मग यासाठी असे काय खालं? ज्यामुळे आरोग्याचे नुकसानदेखील होणार नाही आणि पूर्ण दिवस शरीरात ऊर्जा टिकून राहील. अहो विचार काय करताय? रताळ्याचे कोणतेही पदार्थ खाल्ल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते आणि मुख्य म्हणजे उपवासाला रताळं चालतं बर का.. यात तुम्ही रताळी उकडून खाऊ शकता . पण ज्यांना रताळे खायला आवडत नाही त्यांनी त्याचा किस करून जरूर खा. अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक असा रताळ्याचा किस कसा बनवायचा ते जाणून घेऊया:-
० रताळ्याचा किस (४ जणांसाठी) बनविण्यासाठी लागणारे साहित्य –
रताळी – १/२ किलो
शेंगदाण्याचं कूट – २ चमचे
ठेचलेली हिरवी मिरची – १ चमचा
ताजा खवलेला नारळ – १/२ वाटी
लिंबाचा रस – १/२ चमचा
साजूक तूप – २ चमचे
जिरं – १/४ चमचा
मीठ – चवीनुसार
साखर – चवीनुसार
चिरलेली कोथिंबीर – आवडीनुसार
० कृती – सगळ्यात आधी रताळी स्वच्छ धुवून सालं न काढता किसून घ्या. आता एका कढईत १ चमचा साजूक तूप गरम करून त्यात जिरं आणि हिरवी मिरची घाला. यानंतर कढईत रताळ्याचा कीस घाला. पुढे मंद आचेवर झाकण ठेवून पाणी न घालता ५ – ६ मिनिटं शिजवा. प्रत्येक २ मिनिटांनी व्यवस्थित परता. रताळे फार शिजवू नका. आता रताळी जरा मऊ झाली की मीठ, साखर, लिंबाचा रस, शेंगदाण्याचं कूट, खवलेला नारळ, कोथिंबीर घाला आणि व्यवस्थित मिसळून त्यात उरलेले १ चमचा तूप घाला. आता गरमागरम रताळ्याचा कीस खायला तयार.
० टीप
– रताळी किसल्यानंतर लगेच वापरा. अन्यथा रताळे काळे पडेल. म्हणून शक्यतो रताळी किसून लगेच फोडणीला द्या.
– काही कारणासाठी कीस थोडा वेळ ठेवायला लागला तर तो पाण्यात बुडवून ठेवा आणि फोडणीला टाकताना कीस पिळून पाणी काढून टाका.
० फायदे :-
१) रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन असते. त्यामुळे याचा डोळ्यांना फायदा होतो.
२) शरीर डिटॉक्सिफाई होण्यासाठी रताळे खाणे फायदेशीर आहे. कारण शरीरासाठी घातक असणारे घटक रताळे बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते.
३) रताळ्यातील ऍटीइन्फ्लेमेटी गुणधर्म शरीरावरील सूज कमी करण्यास मदत करते.
४) उपासामुळे ऍसिडिटी, अपचन, पोटदुखी, पोटात जळजळ, जडपणा येतो. यावर पोटात थंड पडण्यासाठी रताळे प्रभावी मानलं जातं.
५) रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रताळ खूप उपयुक्त आहे. त्यामुळे “रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रताळे जरूर खा.
६) रताळ्यातील फायबरमुळे पोट लवकर आणि अधिक काळ भरल्यासारखे राहते. परिणामी भूक कमी होते.
७) रताळ्यात पाण्याचं प्रमाण जास्त असते. यामुळे उपवासामुळे बॉडी डिहायड्रेट होण्यापासून रताळे वाचवते.