| |

कलिंगडाचे जेल चेहऱ्याला देई नैसर्गिक चमक; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दिवसभराच्या दगदगीमुळे आपल्या चेहऱ्यावर घाम, माती, धूळ आणि प्रदूषण हे घटक वाईट परिणाम करीत असतात. मग यासाठी पर्याय म्हणून चेहरा स्वच्छ करताना आपण न जाणे कित्येक महागडे फेसवॉश वापरात असतो. यामुळे निश्चितच तात्पुरता फरक पडतो पण त्वचेचे आतून पोषण होत नाही. त्यात घाम आणि उष्णता आपल्या त्वचेला निर्जीव करीत असतात. तर प्रदूषणामुळे आपली त्वचा निस्तेज आणि कोरडी होते. त्यामुळे आपल्या शरीराला नेहमी हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर यासोबत आपल्या त्वचेची योग्य काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हला चेहरा आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी अत्यंत लाभदायक असणारा एक घरगुती उपाय सांगणार आहोत.

कलिंगड हे हंगामी फळ आहे. सर्वसाधारणपण उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड बाजारात सहज उपलब्ध असते. कलिंगड खाण्याचे आपल्या शरीराला खूप लाभ होतात. याशिवाय कलिंगड चेहऱ्यासाठीदेखील लाभदायक आहे. कारण कलिंगड आपला चेहरा फ्रेश, टवटवीत आणि चमकदार करण्यासाठी मदत करते. परंतु कलिंगड हंगामी फळ असल्यामुळे अन्य ऋतूंमध्ये याचा वापर कसा करणार? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि बाजारात कलिंगड पावडर आणि फ्रोजन फळं शिवाय, जेली आणि ज्यूस उपलब्ध असते. या व्यतिरिक्त बाजारात अशी अनेक उत्पादने आहेत जी कलिंगडसारख्या फळांचा फेशियल जेलमध्ये वापर करतात. चला तर मग जाणून घेऊया चेहऱ्यासाठी कलिंगड फेशियल जेल बनवण्याची घरगुती पद्धत खालीलप्रमाणे :-

० साहित्य
– कलिंगड ज्यूस ३ चमचे

– काकडीचा ज्यूस १ चमचे

– कोरफड जेल ३ चमचे

– व्हिटॅमिन ई कॅप्‍सूल १

० कृती – कलिंगडापासून फेशियल जेल बनवण्यासाठी कलिंगडाचा गर आणि बिया वेगवेगळ्या करा. यानंतर कलिंगडाचा रस मिक्सरच्या साहाय्याने तयार करा. यानंतर तयार रस वस्त्रगाळ करून घ्या. त्यानंतर यात कोरफड जेल, व्हिटॅमिन-ई कॅप्‍सूल आणि थोडं पाणी घाला. हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या. यानंतर तयार मिश्रणात काकडीचा रस मिसळा. आता हे मिश्रण अगदी जेलसारखे घट्ट होऊन लाल रंगाचे होताना दिसेल. झालं तुमचं कलिंगड फेशिअल जेल तयार. हे जेल तुम्ही ५ दिवस असेच स्टोअर करून ठेवा. यानंतर वापर करा.

० वापर – स्टोअर केलेले कलिंगड फेशियल जेल दररोज रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा आणि चांगली ५ मिनिटं मसाज करा. यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करून निवांत झोपी जा. अगदी काही दिवसातच तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकेल आणि हाइड्रेटसुद्धा होईल. ज्यामुळे त्वचा कोरडी किंवा निस्तेज दिसणार नाही.

० कलिंगड फेशियल जेल लावण्याचे फायदे –

१) घाम आणि उष्णतेमुळे आपली त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. अश्यावेळी त्वचेची समस्या दूर करण्यासाठी कलिंगड फेशियल जेलचा वापर केल्याने त्वचा नैसर्गिकरित्या चमकते आणि चेहरा सुंदर होतो.

२) कलिंगड फेशियल जेल वापरल्याने त्वचा हाइड्रेट राहते.

३) ज्या लोकांची त्वचा ऑईली अर्थात तेलकट असेल त्यांनी हे जेल जरूर वापरावे. यामुळे चेहऱ्यावर दिसणारे तेल नाहीसे होते आणि त्वचा नितळ दिसते.

४) कलिंगड जेल डेड स्किन हटवण्याचे काम करते. यासाठी दररोज कलिंगडाच्या जेलने चेहऱ्यावर मसाज करावा.

५) कलिंगड जेलमध्ये लायकोपीन असते. जे चेहऱ्यावर येणारे पुरळ आणि मुरूम यांवर प्रभावीरीत्या काम करते.