| |

हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दिवाळी जवळ आली म्हणजे थंडीचा मौसम सुरु झाला असे म्हणतात. साधारण होळीपर्यंत थंडीचा गारठा हा कायम असतो. थंडीच्या या दिवसात अनेक फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. जसे कि सफरचंद, संत्री आणि स्ट्रॉबेरी. यांपैकी सफरचंद प्रत्येक मौसमात उपलब्ध होते. पण स्ट्रॉबेरी? स्ट्रॉबेरी प्रामुख्याने थंडीच्या दिवसांतच उपलब्ध होते. हे एक मौसमी फळ असून याचा रंग अत्यंत मोहक आणि लक्षवेधक असतो. लाल रंगाच्या स्ट्रॉबेरी चवीला आंबट गोड असतात. आपल्याकडे प्रामुख्याने महाबळेश्वर, पाचगणीमध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. स्ट्रॉबेरी दिसायला जितकी सुंदर, आकर्षक आणि मोहक असते तितकीच ती आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

स्ट्रॉबेरीमध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे. त्याशिवाय पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांसाठी स्ट्रॉबेरी फायदेशीर आहे. म्हणूनच थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरी खाणे अत्यंत फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरीमध्ये सोडियम, चरबी, कोलेस्ट्रॉल नसते आणि कमी कॅलरीयुक्त आहार म्हणून स्ट्रॉबेरी उत्तम पर्याय मानला जातो. तसेच स्ट्रॉबेरीमध्ये मॅंगनीज, व्हिटामिन सी, पोटॅशियम आणि व्हिटामिन बी 9 असते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील स्ट्रॉबेरी फायदेशीर आहे आणि म्हणूनच थंडीच्या हंगामात स्ट्रॉबेरी खाणे आवश्यक आहे. जाणून घ्या स्ट्रॉबेरी खाण्याचे इतर फायदे:-

१) शारीरिक थकवा दूर करते – स्ट्रॉबेरीमध्ये ‘क’ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते. यामुळे दिवसभराच्या कामामुळे येणारा शारीरिक थकवा, ताण आणि अंगदुखी यासाठी स्ट्रॉबेरी खाणे अत्यंत फायदेशीर आहे.

२) कॅन्सरपासून संरक्षण – स्ट्रॉबेरीत अँटी ऑक्‍सीडेंट, फ्लेवोनॉइड, फोलेट आणि केंफेरॉल ही सर्व प्रमुख तत्व समाविष्ट असतात. हि तत्त्व आपल्याला कॅन्सर होण्यास कारणीभूत असणाऱ्या पेशींना मुळातून नष्ट करतात. यामुळे आपले कॅन्सरपासून रक्षण होते.

३) रक्तपेशींमध्ये वाढ – स्ट्रॉबेरी फळामध्ये ‘फोलेट’ हे तत्व मोठ्या प्रमाणात आढळते. फोलेट हे मानवी शरीरातील तांबड्या रक्तपेशींची वाढ करण्यास मदत करतात. त्यामुळे स्ट्रॉबेरी खाणे फायदेशीर आहे.

४) दात आणि हिरड्या मजबूत – स्ट्रॉबेरीमध्ये सायट्रीक आम्ल आणि आरोग्यास आवश्यक आम्ल मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे दातांचा पिवळेपणा कमी होऊन दात अधिक चमकदार होतात. तसेच हिरड्या मजबुत होण्यास मदत होते.

५) हाडांची काळजी – स्ट्रॉबेरीत मँगेनिज हे खनिजद्रव्य समाविष्ट असते. त्यामुळे स्ट्रॉबेरी खाल्ल्यास शरीरातील हाडांचा ठिसूळपणा कमी होतो आणि हाडं दुखण्याचा त्रासही कमी होतो.

६) वजन कमी करण्यासाठी फायदेशीर – स्ट्रॉबेरीमध्ये कोणत्याही बॅड कोलेस्ट्रॉलची समावेश नसतो. यामुळे वजन कमी करायचे असेल तर स्ट्रॉबेरी कोणत्याही प्रकारे खाणे शारीरिकदृष्ट्या फायदेशीर मानले जाते.

७) त्वचा तजेलदार होते – स्ट्रॉबेरी खाल्ल्याने आपली त्वचा आतून फ्रेश होऊ लागते. तसेच चेहऱ्यावर साचलेला मळ दूर लोटून त्वचा तजेलदार होते. तसेच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही कमी होतात.