|

तान्ह्या बाळाला लागोपाठ शिंका येण्यामागे नेमके कारण काय?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। शिंका येणे हि बाब अतिशय सामान्य आणि नैसर्गिक आहे. पण जेव्हा लहान अगदी तान्ह्या बाळाला सतत लागोपाठ शिंका येतात, तेव्हा मात्र छातीत धडधडू लागते. कारण लहान मुलांना जोपर्यंत बोलता येत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांना नेमकं काय होतंय हे अंदाजाने आणि त्यांच्या हालचालींवरूनच ओळखावे लागते. यामुळे नव्याने आईबाबा झालेल्या पालकांना चिंता ग्रासते. आता बाळाला शिंका आल्या तर त्याला नक्की काय होतंय? सर्दी, ताप वा बाळाच्या श्वासनलिकेत काही अडकलं आहे? बाळाला काही होत असेल का? असे कितीतरी प्रश्न पालकांना पडतात. अश्या सर्व चिंता करणाऱ्या नवमाता आणि पित्यांसाठी आम्ही हि विशेष माहिती घेऊन आलो आहोत. जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तर खालीलप्रमाणे:-

० नवजात बाळाला शिंक का येते?
– मुख्य बाब म्हणजे शिंक ही नैसर्गिक व सर्वसाधारण शारीरिक क्रिया आहे. शिंक आपल्या मेंदूच्या कार्याद्वारे नियंत्रित होते. आपल्या शरीरात एखादा विषाणू शिरण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स म्हणजे प्रतिक्रिया देत बचाव करण्यासाठी शिंक येते. अर्थात आपली संपूर्ण शारीरिक नियंत्रण प्रणाली योग्य पद्धतीने सुरू आहे. एका संशोधनानुसार, बाळाला गर्भात असताना मिळणारी औषधं जन्मानंतर बंद केली जातात. यामुळे देखील नवजात बाळाला शिंक येते. शिवाय एखादी अॅलर्जी वा सर्दीमुळेही बाळाला शिंक येते. यासाठीच बाळाला शिंक येणं कधी साधारण आणि असाधारण आहे हे जाणून घेऊया खालीलप्रमाणे:-

० बाळाला साधारण शिंक येण्याची कारणे :-
१) बाळाने लाळ गिळणे.
२) बाळाच्या नाकाची स्वच्छता करताना होणाऱ्या संवेदना.
३) स्तनपानादरम्यान बाळाचे नाक दाबले जाणे.
४) वातावरणातील हवा खेळती नसल्यास होणारी घुसमट.
५) अंघोळ करताना नाकात पाणी जाणे.
६) झोपून दूध पाजणे.
७) धुळ, मातीचा संपर्क होणे.
८) अस्वच्छता

० बाळाला येणारी शिंक असाधारण वा चिंताजनक असण्याची कारणे :-
१) बाळाला शिंकेसोबत श्वास घेताना त्रास होणे.
२) लागोपाठ १० हुन अधिक शिंका येणे.
३) शिंकेसोबत बाळाला खोकला, ताप वा सर्दी असणे.
४) ठराविक वेळेत सतत शिंकणे.
५) शिक आल्यामुळे बाळ दूध न पिणे.
६) शिंक आल्यामुळे बाळ चिडचिडे होणे.