| | | |

शरद पवारांवर होऊ घातलेली एन्डोस्कोपी म्हणजे नक्की काय? ती कशी करतात अन् त्याचे धोके काय जाणुन घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन । दोनचं दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा मा. श्री शरद पवार यांना पोटदुखीमुळे तातडीने ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल मध्ये दाखल व्हावे लागले. महाराष्ट्रात एकचं खळबळ उडाली. हॉस्पिटलच्या सूत्रांकडून अशी माहिती मिळाली कि पोटदुखीवर इलाज करण्यासाठी त्यांच्यावर एन्डोस्कोपी करण्यात आली आहे. त्यानंतर सर्वत्र चर्चा सुरु झाली ती एन्डोस्कोपीची. तर चला तर आज जाणून घेऊयात हे नक्की काय प्रकरण आहे ते.

Endos म्हणजे आतील आणि Scopy म्हणजे पाहणे. आपल्या पचनसंस्था आणि पचनमार्गातील विकारांचे निदान करण्यासाठी तिचा उपयोग कशा प्रकारे करता येतो ते पाहुयात. मानवी डोळ्यांना अनेक प्रकारच्या मर्यादा असतात. आपण अति दूरचे पाहू शकत नाही तसे स्वतःच्या शरीरात देखील डोकावू शकत नाही. पण या अडचणींवर एन्डोस्कोपीमुळे मात करता आली आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक प्रकारच्या दुर्बिणींचा शोध लागला आणि आधुनिक वैद्यकशास्त्रात हि गोष्ट एक वरदान म्हणून सामील झाली. सोनोग्राफी, एमआरआय, सिटीस्कॅन यांच्याद्वारे उपचारावर पण काही मर्यादा आहेत पण एन्डोस्कोपीने यामधील पोकळी भरून काढली. पचनसंस्थेच्या अनेक जुनाट, असाध्य रोगांवर अचूक उपचार होण्यास मदत झाली आहे.

याद्वारे उपचार करताना तोंडातून किंवा गुदद्वारातून जशी आवश्यकता असेल, त्याप्रमाणे एक लवचिक नळी आत घालून आतील ‘लाईव्ह टेलिकास्ट’ पाहता येते. नळीच्या पुढील टोकाला असणाऱ्या कॅमेरा, दुर्बीण आणि प्रखर क्षमतेच्या विजेच्या दिव्यामुळे हे सर्व शक्य होते. त्याचप्रमाणे योग्य त्या ठिकाणी छायाचित्रे पण घेता येतात. आतील सर्व गोष्टी ह्या मोठ्या पडद्यावर झूम करून दिसत असल्यामुळे रोगाचे निदान करणे अधिक चांगल्या प्रकारे शक्य होते. त्याचप्रमाणे या नळीद्वारे आतड्यातील कोणत्याही भागाचा एखादा छोटा तुकडा काढता येतो. जो कॅन्सर सारख्या रोगावर एक महत्वाची उपचार पद्धती आहे. तसेच पोट न फाडता काही छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया, उपाययोजना करणे पण याद्वारे शक्य आहे. यासाठी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हावे लागत नाही, साधारणपणे तासाभरात आपण यातून रिकामे होता.

जठराची एन्डोस्कोपी (Upper GI Endoscopy) : ही तोंडातून नळी घालून अन्ननलिका, जठर अगदी लहान आतडय़ांपर्यंत आत जाऊन ते अवयव तपासता येतात.

कोलोनोस्कोपी (Colonoscopy) : गुदद्वारातून नळी आत घालून संपूर्ण मोठय़ा आतडय़ाची तपासणी करता येते. यामुळे या आतडय़ाला असलेला त्रास, आजार याचे निदान करता येते. तिथल्या आजारसदृश भागाची biopsy (छोटासा तुकडा काढून घेण्याची क्रिया) करता येते.

एन्डोस्कोपीपूर्वी काय तयारी करावी?
तपासापूर्वी सहा तास काहीही खाऊ नये.
रुग्ण काय औषधांवर आहे हे पाहून त्याप्रमाणे त्याची औषध समायोजित करून घ्यावीत.
ब्लडप्रेशर, मधुमेह व इतर काही आजार आहेत हे जाणून घ्यावे.
कुठल्या औषधाची अ‍ॅलर्जी आहे का हे डॉक्टरांना सांगावे.
कधी कधी एन्डोस्कोपीपूर्वी प्रतिजैविके देण्याची गरज असते, तशी ती औषधे द्यावीत.
कोलोनोस्कोपीपूर्वी रेचके/ औषधे देऊन पोट साफ केले जाते.
जठराच्या एन्डोस्कोपीची प्रक्रिया कशी असते?
प्रथम घशात बधीर करणारा स्प्रे मारून घसा बधीर करून एन्डोस्कोपी लवचीक नळी तोंडामध्ये घातली जाते. काही जणांना झोपेचे इंजेक्शन देणे जरुरीचे असते. नंतर रुग्णाला कुशीवर झोपवतात व तोंडामधून आत ही नळी घातली जाते. ही नळी लवचीक असल्याने आरामात पुढे पुढे जाते. यामुळे श्वसनाला काहीही त्रास होत नाही. काही जणांना थोडेसे अस्वस्थही वाटू शकते. दहा ते १५ मिनिटांमध्ये ही नळी आत जाऊन हवे ते सर्व काही तपासले जाते. या तपासणीच्या वेळी तुकडा काढून तपासणे शक्य असते, परंतु त्यासाठी मात्र सौम्य झोपेचे इंजेक्शन देणे जरुरीचे ठरते.
एन्डोस्कोपी केल्यानंतर कधी कधी घसा थोडावेळ दुखत राहतो, पण यात काळजी वाटण्यासारखे काही नसते. केव्हा केव्हा पोटात हवा शिरल्याने पोट फुगल्यासारखे वाटते, जे नंतर हळूहळू कमी होते. झोपेचे इंजेक्शन जर दिले गेले असेल तर दोन-तीन तास हॉस्पिटलमध्ये राहायला लागते.

एन्डोस्कोपीनंतर काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात का?
सहसा काही गुंतागुंत होत नाही, पण जर biopsy साठी तुकडा काढून घेतला असेल तर त्या जागेतून रक्तस्राव होऊ शकतो, जो काही वेळानंतर थांबतो. यासाठी काही औषधोपचाराची गरज नसते.
केव्हा केव्हा झोपेच्या इंजेक्शनची रिअ‍ॅक्शन होऊ शकते.
क्वचितच पचनमार्गाला इजा होऊ शकते, म्हणून जर या एन्डोस्कोपीनंतर गिळायला त्रास होऊ लागला किंवा घसा, पोट, छाती दुखू लागली तर मात्र लगेच डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे.