| |

मधमाशी चावल्यास काय होते?; जाणून घ्या लक्षणे आणि घरगुती उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मधमाशीला काही भागांमध्ये गांधील माशी म्हणून देखील ओळखले जाते. हि माशी विविध फुलांवर विहार करते आणि फुलांच्या रसकणांमधून मध जमा करते. हे मध आपण दैनंदिन आहारात वापरात असतो. पण मित्रांनो या मधाची चव जितकी मधुर असते तितकाच वेदनादायी असा मधमाशीचा डंख असतो. अनेकदा आपण पहिले असाल कि, मधाचं पोळ काढताना लोकांना मधमाशी चावते आणि यानंतर ती व्यक्ती वेदनेने कळवळते. कारण मधमाशी चावल्यानंतर होणाऱ्या वेदना खरोखरच फार तीव्र असतात. शिवाय चावलेल्या भागावर सूज येणे आणि ताप येणे अशी लक्षणे दिसतात.

० मधमाशी का चावते?
– मधमाशा कोणाला मुद्दाम चावत नाहीत. मधमाशी हि नेहमी आपले आत्मरक्षण करण्यास सक्षम असते. त्यामुळे आत्मरक्षणासाठी मधमाशी डंख मारते आणि आपला बचाव करते. मधमाशीच्या चावण्यामुळे शरीरात विष पसरू शकते. त्यामुळे वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊयात काही विशेष माहिती खालीलप्रमाणे:-

० मधमाशी चावली तर काय होते?
– आयुर्वेदात सांगितल्यानुसार मधमाशी चावल्यावर सूज येते. शिवाय तापही येतो आणि डंख मारलेल्या जागी असह्य वेदना होतात. पण मधमाशी चावल्यानंतर मधमाशीचा काटा शरीरात तसाच राहिला तर त्यामुळे इन्फेक्शन होते. अशावेळी तो काटा काढण्यासाठी कोणत्याही टोकदार वस्तूचा उपयोग करू नये. यामुळे इन्फेक्शन जास्त पसरते.

० मधमाशी चावल्यास दिसणारी प्रमुख लक्षणे – मधमाशी चावल्यावर सूज येणे आणि ताप येणे हि सामान्य लक्षणे दिसतात. मात्र याशिवायदेखील काही लक्षणे असू शकतात. जाणून घेऊ खालीलप्रमाणे :-

१) मधमाशी चावलेला भाग लाल होणे.

२) पुरळ येणे.

३) त्या भागाची आग होणे.

४) ताप येणे

५) उलटी, चक्कर आल्यासारखे वाटणे

६) अशक्तपणा

७) त्या भागाला खाज सुटणे

८) डोकेदुखी, पोटदुखी, जुलाब

 

० मधमाशा चावू नयेत म्हणून घ्यावयाची काळजी

१) पोळे उतरवण्यास प्रोफेशनल लोकांची मदत घ्या. स्वतः कुठलेही प्रयत्न करू नये.

२) पोळे उतरवण्याआधी जाताना संपूर्ण अंग झाकतील असे कपडे वापरा.

३) पायात बूट आणि पायमोजे घाला.

४) घरातील खाण्यापिण्याची जागा, डायनिंग टेबल नेहमी स्वच्छ ठेवा. कारण, खरकट्याकडे माशा आकर्षित होतात.

५) व्यक्तिगत आणि घराची स्वच्छता राखा.

 

० मधमाशी चावल्यावर करावयाचे घरगुती उपाय:-

१) मध – मधमाशी चावलेल्या जागेवर लगेच मध लावा. यामुळे वेदनेपासून आराम मिळतो.

२) दही – मधमाशी चावलेल्या जागेवर दही लावा. शिवाय थोडेसे दही खा. यामुळे सूज आणि वेदनेपासून आराम मिळतो.

३) बर्फ – मधमाशी चावलेल्या जागेवर बर्फ चोळून लावा. त्यामुळे होणाऱ्या वेदना थांबतात. तसेच आगआग कमी होते. त्वचेवर पुरळ येत नाही आणि सूज कमी होते.

४) कोरफडीचा गर – कोरफड स्वभावाने थंड असते. म्हणून मधमाशी चावलेल्या जागी कोरफडीचा गर लावावा. दरम्यान मधमाशी चावलेल्या जागेवर थंड वाटते आणि होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो.

५) बेकिंग सोडा – बेकिंग सोडा अल्कलाइन असतो. यामुळे मधमाशी चावलेल्या जागी बेकिंग सोडा लावल्यास मधमाशीचे विष पसरत नाही. तसेच सूज, वेदना आणि खाज कमी होते.

६) ऍपल साइडर विनेगर – मधमाशीने दंश केलेल्या जागी अॅपल साइडर विनेगर लावा. यामुळे त्या भागावर सूज, वेदना आणि खाज येणे कमी होते.

७) चुना – मधमाशी चावलेल्या जागेवर चुना लावल्यास वेदना आणि खाज कमी होते.

८) झेंडूच्या फुलांचा रस – मधमाशी चावलेल्या जागेवर झेंडूच्या फुलांचा रस लावल्यास वेदना कमी होतात. शिवाय शरीरक्त विष पसरत नाही.

९) टूथपेस्ट – मधमाशी चावलेल्या जागेवर टूथपेस्ट लावावी. यामुळे वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते. शिवाय जळजळ आणि आग आग होत नाही.

 

महत्वाचे

– हे उपाय करूनही फरक पडत नसल्यास तज्ञ डॉक्टरांना त्वरित दाखवावे. दुखणे अंगावर काढू नये. मधमाशीचा काटा शरीरात मोडला आणि तिथेच राहिला तर विषबाधा होऊन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्याबाबत काळजी घ्यावी.