|

अल्झायमर(स्मृतिभ्रंश) म्हणजे काय? ‘या’ प्रकारे घ्यावी रुग्णांची काळजी (उत्तरार्ध) 

हॅलो आरोग्य ऑनलाईन : पूर्वार्धात आपण पहिले कि, अल्झायमर का होतो? त्याची कारणे, उपचार आणि लक्षणे या संदर्भात चर्चा केली. आता आपण पाहुयात कि  अल्झायमर झालेल्या रुग्णांची काळजी कशी घ्यावी.  अल्झायमरचा रुग्ण गोष्टी विसरतो. त्यामुळे त्याला वारंवार गोष्टी लक्षात आणून द्याव्या लागतात. हे करताना सर्वात महत्त्वाचा ठरतो तो संयम. अल्झायमर रुग्णाला प्रेमाची आणि आपुलकीची गरज असते.

व्यक्ती जेव्हा लहान-लहान गोष्टी विसरायला लागतो त्यावेळी कुटुंबीयांना त्याचा खूप त्रास होतो आणि रुग्णाबरोबरच त्याच्या कुटुंबीयांचीही चिडचिड वाढते. त्यामुळे अल्झायमरचा रुग्ण म्हणजे लहान बाळ हे कायम लक्षात ठेवून शांतपणे प्रत्येक गोष्ट सांगणं गरजेचं असतं. तुम्ही आता काही कामाचे नाहीत, एकच गोष्ट कशी वारंवार सांगावी लागते, असं म्हटल्याने रुग्णाचं मानसिक खच्चीकरण होत असतं. अशा रुग्णांचा तिरस्कार करणे, थट्टा-मस्करी करणे योग्य नाही. त्यांना कुटुंबाच्या आणि एकूणच समाजाच्या पाठिंब्याची गरज असते.

अल्झायमरग्रस्त रुग्ण आणि कुटुंब

आजारपण म्हटलं की रुग्णाबरोबरच त्याच्या कुटुंबालाही त्याचा त्रास होतो. मात्र, अल्झायमर या आजारात रुग्णापेक्षा कुटुंबीयांना जास्त त्रास होतो. अल्झायमर झालेला रुग्ण गोष्टी विसरतो. पण, कपडे घालायला विसरणे, कुठेही नैसर्गिक विधी करणे, वस्तू जागेवर न ठेवणे या सगळ्या गोष्टींचा त्याच्या कुटुंबीयांना अतिशय त्रास होत असतो. रुग्णाची चिडचिड वाढते. अशावेळी कुटुंबीयांचा संयम संपतो.  पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत घरी कुणीतरी सतत असायचं. त्यामुळे म्हाताऱ्या माणसांची, रुग्णांची काळजी घेतली जायची. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. विभक्त कुटुंब झालेली आहेत. स्त्रियासुद्धा घराबाहेर पडल्या आहेत. शहरातली घरं छोटी झाली आहेत. अशावेळी घरात एखादा अल्झायमर झालेली व्यक्ती असेल तर तिचा सांभाळ करणं फार अवघड होतं.

दुसरं म्हणजे हा खूप खर्चिक आजार आहे. डिमेंशियाच्या रुग्णांना सारखे डायपर वापरावे लागतात. वृद्धांचे डायपर महाग असतात. शिवाय, घरात सगळे कामावर जाणारे लोक असतील तर रुग्णासाठी केअर टेकर ठेवावा लागतो, त्याला 8 तासांचे 700 ते 800 रुपये मोजावे लागतात. म्हणजे अशा रुग्णांसाठी महिन्याला 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च येतो.शिवाय, डिमेंशियाच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करता येत नाही. कारण विसरभोळेपणाव्यतिरिक्त इतर कुठलाही शारीरिक त्रास त्यांना नसतो. त्यामुळे ते घरीच असतात. ही सगळी परिस्थिती कुठल्याही कुटुंबासाठी कष्टप्रद असते.

प्रतिबंधात्मक उपाय

डिमेंशिया कधीही होऊ नये, यासाठी खात्रीशीर उपाय नाही. मात्र, जीवनशैलीमध्ये काही बदल करून हा आजार दूर ठेवता येतो.

  • हृदय निरोगी ठेवा
  • चांगली झोप घ्या
  • जीवनशैली उत्तम ठेवा
  • रोज किमान 30 मिनिटं योगा, व्यायाम, सायकलिंग, रनिंग असा एकतरी व्यायाम प्रकार करा
  • दारू, सिगारेट, तंबाखू, अशी व्यसनं टाळा
  • मिनिंगफुल ऍक्टिव्हिटीजमध्ये स्वतःला गुंतवा.
  • सकस आणि ताजं अन्न खा. साखर, मीठ यांचा आहारात कमी प्रमाणात समावेश करा.

इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा म्हातारपणात होणारा आजार असला तरी त्याची सुरुवात 40 ते 50 व्या वर्षापासून होते. एखाद्याचे वय 40 ते 50 च्या घरात असेल आणि तो व्यक्ती खूप व्यसनं करत असेल, सतत पिझ्झा, बर्गर खात असेल, पुरेशी झोप घेत असेल किंवा दिवसातला रिकामा वेळ योग्य बौद्धिक चालना न देणाऱ्या गोष्टींमध्ये न घालवता  तासनतास टिव्ही किंवा मोबाईलसमोर बसत असेल तर अशा प्रकारचे त्रास होण्याचे प्रमाण वाढते.  पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये तर 40-50 वर्षांच्या लोकांमध्येही हे आजार दिसू लागले आहेत. त्यामुळे आपणही यातून शिकवण घेऊन घरात कुणाला विसरभोळेपणा आहे, याची लाज वाटून न घेता त्यावर उपचार घेतले पाहिजे.

डिमेंशिया किंवा अल्झायमर झालेली व्यक्ती स्वतः सगळं विसरत असते. त्यामुळे तिच्या काहीच लक्षात राहत नाही. अशावेळी तुम्ही तिच्यावर योग्य उपचार केले नाही तर तो आपल्या प्रिय व्यक्तीवर अत्याचार ठऱत असतो.