|

‘ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर’ म्हणजे काय?; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मित्रांनो अनेकदा घरातून बाहेर पडल्यानंतर अचानक लघवी लागते आणि ती रोखता येत नाही. जर असे तुमच्याही बाबतीत घडत असेल तर हा एक मूत्रपिंडाशी संबंधित आजार आहे. याला वैद्यकीय भाषेत ‘ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर’ (ओएबी) असे म्हटले जाते. निश्चितच हि बाब जरा गैरसोयीची आणि अनेकदा लाजिरवाणी वाटते. पण आरोग्यविषयक समस्या हि लाजिरवाणी नसू शकते. याचे कारण प्रत्येकालाच आरोग्याशी संबंधित काही ना काही त्रास असतात. ज्यावर योग्य वेळी उपचार घेतल्यास ते नियंत्रणात आणता येतात. माहितीनुसार ओएबी हा आजार जवळपास १४% पुरुषांमध्ये तर १२% महिलांमध्ये दिसून येतोय आणि याचे वेळीच निदान झाल्यास उपचार घेऊन तो नियंत्रणात आणता येतो. परंतु लाजेखातर बहुसंख्य रुग्ण उपचार घेत नसल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. चला तर या आजाराविषयी काही माहिती घेऊया.

० ‘ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर’ म्हणजे काय?
– ‘ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर’ (ओएबी) एक सिंड्रोम म्हणून ओळखले जाते. युरोलॉजिस्ट आणि एंड्रोलॉजिस्ट सांगतात कि, यात अचानक लघवी करण्याची आणि लघवी न थांबणारी गरज निर्माण होते. यामुळे दैनंदिन क्रिया प्रभावित होतात. जसे की – कार्यालयीन काम, सामाजिक क्रिया, व्यायाम आणि झोप. वयानुसार अतिक्रियाशील मूत्राशय संबंधित विविध समस्यांच्या लक्षणांचे प्रमाण वाढते. यामुळे वृद्ध रुग्णांनी त्यांच्या अतिक्रियाशील मूत्राशयाच्या लक्षणांवर डॉक्टरांशी वेळीच चर्चा करणे गरजेचे आहे. परंतु लाजेखातर हे रुग्ण डॉक्टरांशीच काय तर आपल्या माणसांशी बोलणे देखील टाळतात आणि याचा त्रास त्यांना होतो.

० ‘ओएबी’चा त्रास कुणाला होतो?
– ओएबी हा आजार कुणालाही होऊ शकतो . पुरुषांप्रमाणे अगदी स्त्रियांनासुद्धा हा आजार होण्याची शक्यता असते. अतिक्रियाशील मूत्राशयाचा त्रास हा केवळ पुरुषांनाच होतो असे काहीजण सांगतात. मात्र असे काहीही नाही. तर अतिक्रियाशील मूत्राशयाचा त्रास अगदी स्त्रियांनाही होऊ शकतो. वैद्यकीय क्षेत्रात याची एक विशेष नोंद ठेवली जात नाही. मात्र काही अभ्यासांनुसार साधारण १४% पुरुषांमध्ये तर १२% महिलांमध्ये ही समस्या दिसून आली आहे. सामान्यपणे खाली सांगितलेल्या स्त्री व पुरुषांना ओएबी’चा त्रास होतो.

१) रजोनिवृत्तीतून गेलेल्या वृद्ध स्त्रिया आणि प्रोस्टेट समस्या असलेले वृद्ध पुरुष यांना ‘ओएबी’ होण्याची शक्यता अधिक असते.

२) मेंदू किंवा पाठीचा कणा प्रभावित करणारे रोग असलेल्या लोकांना, जसे की ‘स्ट्रोक’ व ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’ (एमएस) यांनादेखील याचा त्रास होतो.

० तज्ञ काय सांगतात ?
– वय वाढणे हा केवळ एक घटक आहे. मात्र सर्व लोकांना वयानुसार अतिक्रियाशील मूत्राशयाचा त्रास होत नाही. म्हणून हा वृद्धत्वाचा सामान्य भाग मानला जाऊ नये असे तज्ञ सांगतात.

० ‘ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर’ आजाराची प्रमुख लक्षणे:-

१) लघवीची इच्छा पुढे ढकलण्यात असमर्थता जाणवणे.

२) शौचालयात पोहोचण्यापूर्वी लघवीची गळती होणे.

ही ‘ओएबी’ची प्रमुख लक्षणे आहेत. सुरुवातीला हि लक्षणे सौम्य असली तरी कालांतराने ती गंभीर स्वरूपात त्रासदायक होतात. यामुळे झोपेवर, शरीरावर व मनावर याचा प्रभाव पडतो.

० ‘ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर’ टाळण्यासाठी काय कराल?
– सर्वप्रथम अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. यानंतर डॉक्टर खालील उपचार करतील.

१) तोंडावाटे औषधे शरीरात सोडणे.

२) इंजेक्शनच्या साहाय्याने औषध देणे.

३) मूत्राशयाशी संबंधित नसांना विद्युत उत्तेजन देणे.

४) काही प्रकरणात शस्त्रक्रिया करणे.

– याशिवाय तुम्ही दैनंदिन जीवनशैलीत बदल केल्यास फायदा होईल. जसे कि,

५) नियमित व्यायाम

६) चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये टाळणे.

७) मसालेदार पदार्थ आहारातून वगळणे.