काय आहे बीटा थॅलेसेमिया?; जाणून घ्या लक्षणे व उपचार

हॅलो आरोग्य ऑनलाईन। बीटा थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक व्याधीचा प्रकार आहे. यात आपल्या शरीरातील तांबड्या पेशीत असलेले हिमोग्लोबिन बाधित होते. मुळात हिमोग्लोबिन हे रक्तपेशींतील असे प्रथिन आहे ज्यामुळे प्राणवायू वाहिला जातो. बीटा थॅले‌सेमिया रक्तव्याधी असून त्यातील अनुवांशिक जनुकांच्या प्रभावाने आवश्यकी तितके हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लागणारे रसायन शरीरात तयार होत नाही.

वंशपरंपरेने किंवा अनुवांशिकतेने माता – पित्याकडून जनुकांद्वारे आपल्याला अनेक शारीरिक वैशिष्ट्ये आणि गुणधर्म मिळत असतात. यांचे एका पिढीतून पुढच्या पिढीत सातत्याने वहन होत असते. बीटा थॅलेसेमिया या व्याधीत १ बीट थॅलेसेमिया जनूक आई किंवा वडिलांकडून अपत्यात अर्थात बाळात येते. तर काही वेळा दोघांकडून प्रत्येकी १ जनूक येते. परिणामी होणाऱ्या बाळाला थॅलेसेमियाची व्याधी जन्मतःच जडते.

– बिटा थॅलेसेमिया या व्याधीचे २ प्रकार आहेत.
१) ट्रेटवाहक (मायनर)
२) गंभीर (मेजर).

यातील बिटा थॅलेसेमिया ट्रेट प्रकारात निरोगी व्यक्तीपेक्षा फिक्कट निस्तेज व लहान आकाराच्या तांबड्या रक्तपेशी या व्यक्तीत असल्याचे दिसते. थोड्या प्रमाणात यांच्यात पंडुरोग (अॅनेमिया) असतो. परंतु या प्रकारात सहसा उपचाराची गरज भासत नाही. मात्र या व्यक्तीद्वारे बीटा थॅलेसेमियाचे १ जनूक त्यांच्या मुलांत संक्रमित झाले असता त्या अपत्यास या व्याधीचा त्रास संभवतो.

तर बीटा थॅलेसेमिया गंभीर हि चिंताजनक व्याधी आहे. या व्याधीग्रस्त व्यक्तीच्या शरीरातील प्रत्येक पेशीला जगण्यासाठी प्राणवायूचा योग्य प्रमाणात सतत पुरवठा होणे अत्यावश्यक असते. मात्र प्राणवायू वाहून नेण्यासाठी शरीरातील तांबड्या पेशींत योग्य प्रमाणात हिमोग्लोबिन असणे गरजेचे आहे. परंतु, त्यांच्या शरीरात हिमोग्लोबिन नसल्याने शरीराला गरजेइतका प्राणवायू मिळत नाही. परिणामी या रुग्णाच्या मृत्यूचा धोका असतो.

० मेजर थॅलेसेमियाची लक्षणे – बीटा थॅलेसेमिया मेजरची लक्षणे लहान बाळ अगदी ३ ते ६ महिन्यांचे असल्यापासूनच दिसू लागतात.
– बाळाचे वजन कमी होते
– पोटात अन्न, दूध राहत नाही.
– उलट्या, जुलाब सुरू होतात.
– सहज जंतूसंसर्ग होतो.
– वाढ खुंटते.
– सतत आजारी असल्यासारखे दिसतात.
– निस्तेज, पिंगट होतात.
– हालचाली संथ होतात.
– सध्या सुध्या क्रिया करतेवेळी धाप लागते.
– अशा व्याधीग्रस्तांना जर ठराविक कालांतराने रक्त‌ दिले नाही किंवा पुढीलवेळी रक्त देण्यासाठी वेळ लागला तर तीव्र स्वरूपाचा पंडुरोग (अॅनेमिया) होण्याची शक्यता बळावते.

० उपचार – बीटा थॅलेसेमिया मेजरच्या रुग्णांना जगण्यासाठी नियमित रक्त देण्याची गरज असते. इतकेच नव्हे तर, दर ४ ते ६ आठवड्यांनी त्यांना रक्त मिळायलाच हवे. मात्र, नियमित रक्त न मिळाल्यास हे रुग्ण दगावतात. त्यांना कोणताही जंतु संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे काविळ सारखे आजार होणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी. या रुग्णांना रक्त नियमित मिळाल्यास ते प्रौढावस्थेपर्यंत जगू शकतात. मात्र या व्याधीमुक्त होण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लँट हा एकमेव उपाय आहे.