| |

सावधान!!! मेंदूतील वादळ उठलंय अनेकांच्या जीवावर, आपल्या शेजारी आहे का असा रोगी?

हॅलो आरोग्य ऑनलाइन । संध्याकाळचे वातावरण, मावळणारा सूर्य, माणसासहित पक्ष्यांची घरी जायची लागलेली ओढ, सर्वकाही आलबेल पण अचानक काळे ढग दाटून येतात. सुसाट वारे सुरु होते, आणि मोठमोठ्याने पावसाला सुरवात होते आणि मग सगळ्यांची दाणादाण उडते. हे सर्व काही अचानक घडते. अगदी सेम टू सेम अपस्मार या रोगामध्ये असेच होते. मेंदुमध्ये वादळ झाल्यासारखे तेथील संवेदना केंद्रांवरचे नियंत्रण जाते. कधीकधी एखाद्याच अवयवाशी निगडीत असलेल्या नियंत्रण केंद्रावर त्याचा परिणाम होतो. तेव्हा रोगी कधीकधी बरळायला लागतो, अनियंत्रित हातवारे करायला लागतो, त्याचा फक्त हातच हालत राहतो. कोणाला भात खाताना, गरम पाणी डोक्यावर घेताना, लिहिताना, टीव्ही बघताना, वा फक्त झोपेत असे नियंत्रण जाते आणि व्यक्ती थोड्या काळाकरता त्या अवयवावरचे नियंत्रण गमावून बसते. ह्याला reflex epilepsy म्हणतात.

अपस्माराची लक्षणे

पण वर उल्लेखिलेले वादळ संपूर्ण मेंदूत पसरले तर आकडी येण्यासारखी परिस्थिति होते. अपस्माराच्या अशा आजारामध्ये रोग्याला झटका येणे, आकडी येणे, काही अनैच्छिक हालचाली होणे, तोंडातून फेस येणे, मूत्राशय कार्यावरचे नियंत्रण जाऊन अकस्मात लघवी होणे, जीभ दाताखाली येणे, काही काळासाठी शुद्ध जाणे अशा गोष्टी घडून येतात. हा प्रभाव दोन ते पाचच मिनिटे राहणार असतो. लगेच ती व्यक्ती पूर्ववत होत नाही. हळूहळू भानावर येत स्वतःवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न तो रोगी सुरु करतो. त्या दोन ते पाच मिनिटांत घडलेल्या घटनांचे स्मरण नसते. खूप थकवा येतो. अपस्माराचा झटका वर्षातून एकदा वा अनेकदाही येऊ शकतो, वा संपूर्ण आयुष्यात एकदा वा अनेकदा येऊ शकतो; त्याला काही नियम नाही. पण प्रत्येक रोग्याचा एक ठराविक pattern असतो. दोन-तीन महिन्यात कधीतरी एकदा आकडी येणारा माणूस ती तीन-पाच मिनिटं सोडली तर सामान्य माणसाचे आयुष्य नीटपणे जगू शकतो; तो अगदी नॉर्मल असतो. कधीकधी झटके येण्याची संख्या खूप कमी होते तेव्हा डॉक्टर पूर्ण आणि सखोल चाचणी करून त्या रोग्याची औषधे खूप कमी किंवा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतात. थोडक्यात काय तर उच्चरक्तदाब, डायबिटीस इत्यादी रोगांप्रमाणेच या आजाराचे रोगी सुद्धा अन्यथा धडधाकट असतात आणि सामान्य आयुष्य जगू शकतात.

एपिलेप्सी म्हणजे काय?

फिट येणं, आकडी, मिरगी आदी नावांनी अपस्मार हा आजार ओळखला जातो. या आजारावर उपचार शक्य आहेत. औषधांनी तो बरा न झाल्यास शस्त्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे. या आजाराविषयी नीट माहिती घेणं, गैरसमज दूर करणं यातून उपचारांविषयीची जागरुकता वाढेल आणि त्याचा उपयोग रुग्णांना होईल. हा आजार जगभर आढळतो. लोकसंख्येच्या जवळपास एक टक्का, एवढे याचे प्रमाण आहे. या आजारामुळं खेळणं, पोहणं, वाहन चालवणं, रोजगार, शिक्षण, लग्न, सामाजिक प्रतिष्ठा अशा बऱ्याच गोष्टींपासून रुग्ण वंचित राहातो. लहान मुलांमध्ये हा प्रश्न अधिक बिकट आहे. योग्य त्या वयात आणि वेळीच अचूक निदान होऊन उपचार न झाल्यास मेंदूची वाढ व्यवस्थित होत नाही. मतिमंदत्व येतं. याच मुलांवर योग्य वेळी शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार झाले तर ती पूर्णतः सामान्य आयुष्य जगू शकतात.