glaucoma
|

‘काचबिंदू’ म्हणजे काय..?; जाणून घ्या लक्षणे आणि उपचार पद्धती

हॅलो आरोग्य ऑनलाईन। डोळ्याच्या नेत्रगोलातील दाब वाढल्याने डोळ्याच्या ऑप्टिक नर्व्ह म्हणजे डोळ्यापासून मेंदूला जोडणाऱ्या मुख्य मज्जातंतूला हानी पोहोचते. त्यामुळे व्यक्तीची दृष्टी अधू होऊ लागते. डोळ्यांच्या अशा परिस्थितीला ‘काचबिंदू’ म्हणतात. काचबिंदूलाच ‘काला मोती’ असेही म्हणतात. दुर्लक्षित मोतिबिंदू पिकल्यावर डोळ्यात ताण निर्माण होतो. त्यामुळे हा मोतिबिंदू ‘काला मोती’मधे परावर्तित होतो. काचबिंदूची लक्षणे लवकर आढळून येत नाहीत. मात्र, जेव्हा ती आढळून येतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे यास ‘सायलेंट थीफ ऑफ व्हिजन’ असेही म्हणतात.

जर काचबिंदूचे वेळेत निदान झाले नाही तर कायमचे अंधत्व येऊ शकते. चाळीशी पार केलेल्या व्यक्तींना याचा धोका अधिक संभवतो. हा डोळ्यांच्या धोकादायक विकारांपैकी एक आहे. याचे वेळेत निदान न झाल्यास उपचाराअभावी दृष्टी गमावण्याची वेळ येऊ शकते. मात्र, अशा विकाराचे पूर्व निदान झाले तसेच वेळेत आणि नियमित औषधोपचार केले तर दृष्टीचे रक्षण करता येते. काचबिंदूमुळे गेलेली दृष्टी परत मिळविता येत नाही. पण जेवढी दृष्टी शिल्लक आहे त्याची काळजी घेणे अत्यावश्यक असते. या विकाराची चिन्हे आणि लक्षणे इतकी सौम्य असतात की खूप काळापर्यंत निर्देशनातच येत नाहीत. सर्वात पहिली चिन्हे सहसा गौण दृष्टी नष्ट होणे हे आहे. तर आज आपण नेत्रचिकित्सा अधिकारी श्रीयुत पाटील यांनी दिलेली माहिती आपल्यासोबत शेअर करीत आहोत.

० काचबिंदूची लक्षणे

– प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तूंभोवती तेजोमंडल दिसणे.
– दृष्टी नष्ट होणे.
– डोळे लाल होणे.
– अस्पष्ट दिसणे (नवजात मुलांमध्ये).
– खाजवणारे आणि वेदनादायक डोळे.
– अरुंद किंवा अस्पष्ट दृष्टी.
– मळमळ आणि उलटी.

० काचबिंदूची कारणे

अतिरिक्त द्रवामुळे वाढलेला डोळ्याचा दाब हे काचबिंदूचे प्रमुख कारण आहे तसेच कौटुंबिक इतिहास – कोणत्याही पालक किंवा भावंडांना असेल तर वय वाढण्यासोबतच काचबिंदू होण्याची शक्यता जास्त असते.

इतर वैद्यकीय परिस्थिती – जसे लघु दृष्टीक्षेप, दीर्घ दृष्टीक्षेप आणि मधुमेह यामध्ये काचबिंदूचे निदान होण्याची शक्यता जास्त असते.

० काचबिंदूवरील उपचार

काचबिंदूचे निदान झाले की ‘फर्स्ट लाइन ऑफ ट्रीटमेंट’ म्हणून सर्वप्रथम डोळ्यात विशिष्ट प्रकारचे ड्रॉप घालून डोळ्यातील ताण कमी केला जातो. शिवाय औषधोपचार नियमित करावे लागतात आणि लक्षणानुसार औषधोपचारांमध्ये बदल देखील केला जातो. शेवटचा उपचार म्हणून शस्त्रक्रिया करण्याचा सल्लाही डॉक्टर्स देतात. काचबिंदू हे जगभरातील अंधत्वाचे दुसरे सर्वात सामान्य कारण आहे. जागतिक स्तरावर अंदाजित ११.२ दशलक्ष लोकांना काचबिंदू असण्याची शक्यता आहे.