| |

अमृतकुंभ वनस्पती ‘गुळवेल’ म्हणजे काय?; जाणून घ्या आरोग्यवर्धक फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गुळवेल हि एक अशी वनस्पती आहे जी प्रामुख्याने घनदाट जंगल, शेतातील चिखल वा डोंगर खोऱ्यांत मिळते. या वनस्पतीची प्रकृती उष्ण आहे. याचे फळ वाटाण्याच्या आकाराचे दिसते. उन्हाळ्यात या वनस्पतीवर लहान लहान पिवळी फुलं येतात. जी नर झाडावर एकत्र फुलतात आणि मादी झाडावर एकट्या स्वरूपात फुलतात. गुळवेलीचे वैज्ञानिक नाव ‘टीनोस्पोरा कार्डिफोलिया’ असं आहे. यामध्ये अनेक आजार बरे करण्याची क्षमता असते. त्यामुळे गुळवेलला अमृताचा दर्जा आहे. या वेलीचे खोड लांब धाग्यांसारखे आणि बोटांएवढे जाड असते. तर त्यावरील साल पातळ असते. या खोडांंवर लहान छिद्र असतात. या वेलीच्या खोडातील आतला भाग चक्राकार दिसतो. वेलीची हिरवीगार मुळे फुटून खाली लोंबतात. तर पानांचा आकार हृदयाकृती आणि रंग हिरवा असतो. या वेलीची पानं हाताला गुळगुळीत लागतात तर देठ लांब असतात.

गुळवेलीचा आयुर्वेदात अमृतकुंभ असा उल्लेख करण्यात आलेला आहे. कारण खरोखरीच आरोग्यासाठी गुळवेल अमृतासमान आहे. कुठल्याही आजारातून उठल्यावर रूग्णाच्या शरीराला पुनरुज्जीवन देण्यासाठी गुळवेल उपयोगी मानली जाते. यासाठी गुळवेलीचा काढा अत्यंत परिणामकारक आहे. तसे पाहाल तर, गुळवेलाचे फायदे व नुकसान दोन्ही असतात. पण आपण आज गुळवेलाचे फायदे जाणून घेणार आहोत.

० गुळवेलीचे फायदे

१) जुन्या तापावर परिणामकारक – साधारण १० ते १५ दिवसांनंतरही ताप कमी होत नसेल तर समजा त्या व्यक्तीला क्रोनिक फिव्हर अर्थात जुना ताप आहे. हा ताप काढण्यासाठी गुळवेलाची फळं आणि पानांचा वापर करून काढा बनवा आणि त्याचे सेवन करा. यामध्ये असणारे अँटिपायरेटिक आणि अँटिमलेरियल गुण तापासून सुटका मिळवून देण्यास मदत करतात. यासाठी गुळवेलाची पावडर कोमट पाण्यात मिसळून पिणेही फायदेशीर ठरते.

२) प्रतिकारशक्तीत वाढ – प्रतिकारशक्ती कमी होणे हे आजारी पडण्याचे मुख्य कारण आहे. यासाठी प्रतिकारशक्ती वाढविणणे अत्यंत गरजेचे आहे. यात गुळवेल अत्यंत लाभदायी आहे असं आयुर्वेदातही सांगण्यात आले आहे. कारण गुळवेलीत इम्यूनोमॉड्युलेटरी नावाचा घटक अधिक असतो. जो प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतो.

३) सुदृढ पचनक्रिया – आजकाल अनेको लोकांना पचनाची समस्या आहेच. तर गुळवेलीचे औषधी गुण पचनक्रियेसंबंधीत समस्या दूर करण्यास मदत करतात. डायरिया आणि जुलाब होत असतील तर त्यासाठीही गुळवेल उत्तम. पचनतंत्र मजबूत करण्यासाठी गुळवेलाचा आधार उत्तम आधार.

४) मधुमेहावर नियंत्रण – गुळवेलीच्या पावडरचे नियमित उपाशीपोटी पाण्यातून सेवन केल्यास, मधुमेह आटोक्यात येण्यास मदत मिळते. त्यामुळे हा उपाय मधुमेहावर उत्तम घरगुती उपाय आहे. शिवाय गुळवेलीतील अँटिहायपरग्लायसेमिक गुण शरीरातील इन्शुलिनची सक्रियता वाढवतात. परिणामी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

५) डेंग्युवर लाभदायक – गुळवेलीत अशी अनेक रसायने आहेत ज्यामुळे इम्यूनमॉड्युलेटरी प्रभाव अधिक जाणवतो. यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांपासून लढण्याची ताकद मिळते. यामध्ये मलेरिया आणि डेंग्यू सारख्या आजारांचे इन्फेक्शन दूर करण्यासाठी गुळवेल मदत करते. त्यामुळे डेंग्युसारख्या आजारात गुळवेल ताप उतरवण्याठी मदत करते.

६) दम्याच्या त्रासापासून आराम – दम्याच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी गुळवेल फायदेशीर मानली जाते. कारण श्वासासंबंधीत समस्या सोडविण्यासाठी आणि दम्याची लक्षणे कमी करण्याची गुळवेलामध्ये प्रबळ क्षमता आहे. यासाठी केवळ याचा रस मधासह मिसळून सेवन करा.

७) डोळ्यांच्या समस्येवर गुणकारी – तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, गुळवेलीतील इम्यनोमॉड्युलेटरी गुण हे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात. यामुळे डोळ्यांची जळजळ, डोळे लाल होणे अथवा डोळ्यांना सूज येणे अशा समस्यांसाठी गुळवेल पावडर रोज पाण्यातून सेवन करावी. यामुळे अश्या समस्यांमधून सुटका होते.

८) यौन इच्छा प्रबळ होते – शारीरिक आरोग्य आणि यौन अर्थात सेक्स करण्याची इच्छा प्रबळ करण्याचे कार्य गुळवेल करते. कारण जेव्हा माणूस शारीरिक स्वरूपात निरोगी असतो तेव्हाच उत्तम संबंध प्रस्थापित करू शकतो. सेक्सची इच्छा वाढवणारे हार्मोन्स काही काळाने कमी होतात. पण गुळवेलात असणाऱ्या इम्यूनोमॉड्युलेटरी अर्थात शरीरात प्रतिकारकशक्ती वाढविणारे गुण असतात, जे इतर रोगांशी लढण्यासह एफ्रडिजीयॅक प्रभावामुळे सेक्सची इच्छा वाढविण्यास मदत करतात.