|

वैद्यकीय ऑक्सिजन काय प्रकार आहे; आणि ते कसे तयार केले जाते?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । साधारणपणे पंचवीस ते तीस वर्षापूर्वी भारतात बाटलीबंद पाणी विकायला बिसलेरी कंपनीने सुरवात केली. त्यावेळी त्यांना आपल्या इकडे खुळ्यात काढले होते. काळाचा महिमा बघा आज बाटलीबंद पाण्याचा बिजनेस हा जवळपास 5000 कोटींचा आहे. प्रवासात, दवाखान्यात, घरात पिण्यासाठी सगळीकडे तुम्हाला पाण्याच्या बाटल्या दिसतील. त्याचप्रमाणे हवेत ऑक्सीजन 21 टक्के आहे. बर तो मिळतोही आपणाला फुकट, पण तोच ऑक्सीजन आज विकत घ्यायची वेळ आली आहे माणसावर. यावर काय बोलणार सांगा? भविष्याचा विचार करता आतापासून जर ऑक्सिजन झोन चा धंदा सुरू केला तर त्याला कधीच मरण येणार नाही हे निश्चित. आणि काही मोठ्या शहरात हा नवीन बिजनेस सुरू पण झाला आहे.

आता मुळ मुद्द्यावर येऊयात. एक वर्षापासून कोरोनारूपी महाभयानक असुराने सगळ्या जगाला गिळंकृत करायला सुरवात केली. पण काही दिवसांपूर्वी रुग्णांची कमी झालेली संख्या, लोकांची कोरोनाबद्दल ची कमी झालेली धास्ती त्यामुळे वाढलेली बेफिकीर वृत्ती. कोरोनाच्या नवीन स्ट्रेनने केलेले आक्रमण, यामुळे सद्यस्थितीला हाहाकार माजला आहे.  राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची दुसऱ्या लाटेने सरकार, प्रशासन आणि सामान्य जनता सर्वांचीच झोप उडाली आहे.  पुनः एकदा लॉकडाऊन लावावे लागणार आहे. तशी हालचाल सरकार कडून सुरू झाली आहे. कोरोनामुळे शरीरातील ऑक्सिजन ची पातळी झपाट्याने कमी होते. फुफ्फुसाची क्षमता कमी झाल्यामुळे रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतोय. आरोग्य विभागासाठी ऑक्सिजन मर्यादित स्वरूपात मिळत असतो. पण अचानक एवढी मागणी वाढली आहे की ती पूर्ण करण्यास सध्या ची सिस्टम अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून सरकारने कंबर कसली आहे. मिळेल त्या मार्गाने ऑक्सिजनचा पुरवठा नियमित व्हावा हरतऱ्हेने प्रयत्न चालू आहेत.

आता आपण जाणून घेऊयात की हा वैद्यकीय ऑक्सिजन काय प्रकार आहे, आणि ते कसे तयार केले जाते. व ते रुग्णाला देण्याचे कारण काय. वैद्यकीय ऑक्सिजन हा हवेत असलेल्या ऑक्सिजनला फिल्टर करून तयार केला जातो.  या प्रक्रियेस क्रायोजेनिक डिस्टिलेशन प्रक्रिया असे म्हणतात. हवेत 21% ऑक्सिजन आणि 78% नायट्रोजन असतो. 1% इतर बाकीचे वायु असतात. पहिल्यांदा एयर कॉम्प्रेशन मग त्याचे सेपरेशन केले जाते. त्यामुळे इतर वायु आणि अशुद्ध घटक काढले जातात. व त्यावर प्रचंड दाब देऊन त्याचे लिक्विड मध्ये रूपांतर केले जाते. नंतर ते लिक्विड सिलेंडर मध्ये भरून सप्लाय केले जाते. ही ऑक्सिजन रुग्णालयात विशेषत: श्वसन रुग्णांसाठी वापरली जाते. किंवा ज्या रुग्णांना हृदयविकाराचा झटका, मेंदू रक्तस्त्राव झाला असेल किंवा मोठा अपघात झाला असेल अशा रुग्णांसाठीही याचा उपयोग केला जातो. हे ऑपरेशन इत्यादी प्रक्रियेदरम्यान देखील वापरले जाते.

उद्योग तज्ज्ञांनी सांगितले की 7000 मेट्रिक टनपेक्षा जास्त वैद्यकीय ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता भारतामध्ये आहे. आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स, लिंडे इंडिया, गोयल एमजी गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड, नॅशनल ऑक्सिजन लिमिटेड हे प्रमुख उत्पादक आहेत. यातील सर्वात मोठे आयनॉक्स दररोज 2000 टन उत्पादन करतात.कोरोना कालावधीत त्याचा वापर अनेक पटींनी वाढला आहे. याशिवाय स्टील, पेट्रोलियम इत्यादी उद्योगांमध्येही याचा उपयोग होतो.कोरोना कालावधीत रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना ऑक्सिजनपुरवठा करण्याची गरज लक्षात घेता सध्या सरकारने सर्व उद्योगांना ऑक्सिजन सिलिंडरच्या पुरवठ्यावर बंदी घातली आहे.