|

मेनोपॉज म्हणजे काय?; जाणून घ्या लक्षणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मेनोपॉज हा स्त्रीच्या आयुष्यातील एक असा काळ असतो जेव्हा मासिक पाळी थांबते. नैसर्गिक मेनोपॉज तेव्हा येतो जेव्हा ओव्हेरिस (अंडाशय) अंडी सोडत नाही आणि कोणतेही एस्ट्रोजेन तयार करत नाही. या शब्दाचा नेमका आणि सोपा अर्थ काय तर महिलांची शेवटची मासिक पाळी. मेनोपॉज हा एक ग्रीक शब्द आहे. यात मेन म्हणजे मन्थ आणि पॉसिस म्हणजे सिझेशन असा त्याचा अर्थ होतो. कोणती मासिक पाळी ही शेवटची असेल हे कोणालाच सांगता येत नाही. त्यामुळे शेवटच्या मासिक पाळीनंतर १ वर्ष उलटून जातं तेव्हा ‘मेनोपॉज आला’ असं मानलं जातं. हि एक नैसर्गिक गोष्ट आहे. पण ती समजून घेणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊयात मेनोपॉजची कारणे:-

० मेनोपॉजची लक्षणे

१) हार्मोन बदल – मेनोपॉजच्या काळात हार्मोनमध्ये अनेक आणि तीव्र बदल होतात. त्यामुळे चिडचिड वाढते. अशावेळी भरपूर अशक्तपणा जाणवतो. खूप थकवा येतो. बऱ्याचदा हा थकवा इतका तीव्र असल्यामुळे नियमित काम करणंही महिलांना शक्य होत नाही. पण ही अवस्था कोणालाही कळत नाही. सततच्या त्रासामुळे बऱ्याच महिलांची चिडचिड वाढते आणि हार्मोनल बदलामुळे कोणतंही काम करू नये असं वाटतं.

२) निराशा – मेनोपॉज सुरू होतो तेव्हा स्त्रियांच्या मनावर सर्वात जास्त परिणाम होतो. कोणत्याही बाबतीत निराशा येते. त्याशिवाय मन सतत उदास आणि तणावाखाली असल्यासारखे वाटते.

३) तणाव आणि अस्वस्थता – मेनोपॉज दरम्यान तणावग्रस्त आणि अस्वस्थता जाणवते. भावनिक अस्थैर्य हे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे. दरम्यान चित्त अस्थिर आणि अनेको भावनिक बदल होतात. याचा प्रभाव तिच्या वागण्यावर होतो. तिला भावना आवरता येत नाहीत. त्यावेळी आपल्याबरोबर कोणीच नाही अशी भावना तिच्या मनात निर्माण होऊन ती अधिक तणावात जाते.

४) अति घाम येणे – मेनोपॉज दरम्यान काही महिने आधीपासून महिलांना रात्री झोपेत अचानक घाम येतो आणि जीव घाबरा होतो. शिवाय इतका घाम येतो की, त्यामुळे घातलेले कपडे, टॉवेल हे पूर्ण भिजतात. या अनुभवामुळे घाबरून जायला होतं. तसेच रात्री झोपेत अचानक जाग येते आणि झोपही पूर्ण होत नाही. या सगळ्यामुळे स्वभावातील चिडचिड वाढते. तणाव वाढतो.

५) डोकेदुखी – या काळात झोप अपूर्ण राहिल्याने आणि इतर शारीरिक त्रास झाल्याने सतत डोकेदुखी होते. ही सामान्य समस्या आहे. शिवाय डोक्याभोवतीचे स्नायू आवळले गेले तर डोकेदुखी वा मायग्रेनचा त्रास होतो. हे त्रास पाळी यायच्या आधी पूर्वीपासून होत असले तरीही मेनोपॉजमध्ये जास्त प्रमाणात जाणवतात. तसंच दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे सांधेदुखी. मान, खांदा, पाठी आणि इतर स्नायूंमध्येही त्रास होतो.

६) छातीत दुखणे – मेनोपॉजदरम्यान छातीत दुखणे हे एक महत्त्वाचे लक्षण दिसून येते. पोटात सतत गॅस निर्माण झाल्यामुळे छातीत दुखण्याचा त्रास या काळात जास्त जाणवतो. अशा वेळी महिलांना छातीत सतत कळा येतात.

७) पोट फुगणे – मेनोपॉज दरम्यान पोट फुगल्यासारखे वाटते आणि अस्वस्थपणा येतो. पोटात सतत दुखते. गॅस अथवा अॅसिडिटीसारखे आजार उद्भवतात. पोट फुगणे हा एक आजार झाल्यासारखं वाटतं.

८) कमी झोप – मेनोपॉजमध्ये महिलांना रात्री नीट झोप येत नाही. अनेक लक्षणांमुळे झोप बिघडते. शिवाय शरीरावर होत असलेल्या परिणामांमुळे झोप बिघडते. सतत या कुशीवरून त्या कुशीवर होऊनही रात्री झोप येत नाही. त्यामुळे दिवसभर अस्वस्थ वाटते. शिवाय रक्तदाबही या गोष्टीमुळे वाढतो. परिणामी इतर आजार जडतात.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *