|

कोरोनासह निपाहचा कहर; काय आहे निपाह? त्याची लक्षणे कोणती? त्यावर लस उपलब्ध आहे का? लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। इकडे आड तिकडे विहीर अश्या काहीश्या परिस्थिती सध्या अख्ख जग अडकलं आहे. कारण कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय म्हणताना तिसरी येण्याची शक्यता आहे तर याचसोबत आता ‘निपाह’ व्हायरसही थैमान घालू पाहतोय. पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या (NIV) शास्त्रज्ञांना वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये ‘निपाह’ व्हायरस आढळून आला. वटवाघुळांपासून पसरणाऱ्या ‘निपाह’ व्हायरस संसर्गामुळे २०१८ साली केरळ राज्यात १८ लोकांचा मृत्यू झाला होता. तर भारतात आतापर्यंत चार वेळा ‘निपाह’ व्हायरसचा उद्रेक झाल्याची माहिती NIVने दिली आहे.

 • ‘निपाह’ व्हायरस काय आहे?
  WHOकडील जीवघेण्या आजारांच्या यादीत निपाह व्हायरसचा समावेश आहे. तज्ज्ञ म्हणतात, ‘निपाह’ संसर्ग झालेल्या रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता ४० ते ७०% टक्के आहे. WHOच्या माहितीनुसार, निपाह एक झूनॉटिक व्हायरस आहे. याचा संसर्ग झालेल्या काही रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाही. मात्र, काही रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये गंभीर स्वरूपाचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
 • ‘निपाह’ व्हायरस पसरण्याची कारणे कोणती?
  – WHOच्या माहितीनुसार, ‘निपाह’ व्हायरसचा संसर्ग वटवाघूळ आणि डुक्कर यांमुळे होतो. हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला सहज होतो. फ्रूट बॅट्स म्हणजे फळं खाणारी वटवाघूळं ‘निपाह’ व्हायरसचे नैसर्गिक वाहक आहेत. यावर वटवाघूळ संशोधक डॉ. महेश गायकवाड म्हणाले, “निपाह व्हायरस वटवाघुळांच्या लाळेत असतो. वटवाघुळांनी खालेल्ली उष्टी फळं माणसांनी खाल्ल्याने हा व्हायरस शरीरात जातो. त्यामुळे झाडाखाली पडलेली उष्टी फळं खाऊ नयेत.” तर WHOच्या माहितीनुसार, वटवाघूळांची लघवी किंवा लाळेने दुषित झालेली फळं वा फळांचे पदार्थ खाल्याने निपाह व्हायरसचा संसर्ग माणसांना होण्याची शक्यता आहे.
 • ‘निपाह’ संसर्गाची लक्षणं कोणती?
  नानावटी रुग्णालयाचे संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ.राहुल तांबे म्हणाले, ‘ताप, डोकेदुखी, कफ, घसादुखी आणि श्वास घेण्यात अडचण ही निपाह संसर्गाची लक्षणं आहेत. तर अन्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, न्यूमोनिया आणि मेंदूला सूज येण्याची शक्यता असते. निपाहचा विषाणू शरीरात गेल्यावर लक्षणं दिसण्यासाठी ४ ते १४ दिवसांचा कालावधी लागतो. तर RT-PCR टेस्ट करून निपाह संसर्गाचे निदान करता येते.
 • ‘निपाह’ व्हायरसवर लस उपलब्ध आहे का नाही?
  तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ‘निपाह’ व्हायरसवर अद्याप कोणतीही ठोस उपचार पद्धत किंवा लस असे काहीही उपलब्ध नाही. WHOच्या माहितीनुसार, ‘निपाह’ व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर सपोर्टिव्ह केअरच्या मदतीने उपचार करता येतात.

– महाराष्ट्रात मार्च २०२० साली NIVच्या शास्त्रज्ञांना साताऱ्यात ‘निपाह’ व्हायरस आढळून आला. संशोधकांनी जर्नलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरच्या गुहेत देशात आढळणाऱ्या २ प्रजातिची वटवाघूळं पकडली व त्यांच्या रक्ताचे, घशाचे स्वॅब घेतले. त्यातील ३३ वटवाघुळांमध्ये ‘निपाह’ व्हायरसविरोधात अॅन्टीबॉडी तयार झाल्याचे समोर आले. तर एका वटवाघुळात ‘निपाह’ व्हायरस आढळून आला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *