| | |

अन्नातील पोषक द्रव्ये टिकवण्यासाठी काय करालं?; जाणून घ्या टिप्स

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल मानवी जीवनशैली एव्हढी बदलली आहे कि, आहार आणि विहाराच्या पद्धती पूर्णपणे बदलून गेल्या आहेत. यात माणसाची जीवनशैली इतकी दगदगीची आणि घाईची झाली आहे कि, अन्नावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून आपण खातो आणि मग काय? आरोग्याची स्वतःहून स्वतःच्या हाताने वाट लावतो. अन्न शिजवण्यासाठी गॅसची मोठी फ्लेम वापरणे, भाज्या व्यवस्थित न धुणे, तेलात पदार्थ शिजवणे या चुकांमुळे अन्नातील पौष्टिकता कमी होते. यामुळे आपण खाल्लेलं अन्न आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेण्यास सक्षम नसते. परिणामी असे अन्न शरीराला पोषण देऊ शकत नाही. परंतु ह्यावर कच्चे अन्न खाणे हा उपाय तर असूच शकत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अन्नातील पोषक द्रव्ये टिकवण्यासाठी काही सोप्प्या टिप्स सांगणार आहोत.

१) मायक्रोवेवमध्ये स्वयंपाक – स्वयंपाक करण्याची सर्वात आधुनिक आणि सोप्पी पद्धत म्हणजे मायक्रोवेवमध्ये स्वयंपाक करणे. कामाला जाणाऱ्या स्त्रियांसाठी मायक्रोवेव्हमध्ये स्वयंपाक करणे वरदानच आहे. अन्नातील पोषक घटकांचा विचार करता मायक्रोवेव्हमध्ये स्वयंपाक करणे फायदेशीर आहे. कमी तापमानात अन्न शिजवलयास ते कमीत कमी वेळात आणि कमी तापमानात शिजवले जाते. यामुळे अन्नातील पोषक घटक टिकून राहण्यास खूप मदत होते.

२) बेकिंग आणि रोस्टिंग – बेकिंग आणि रोस्टिंगदेखील स्वयंपाक करण्याची आधुनिक पद्धत आहे. या दोन्ही प्रकारांमध्ये अन्नातील पोषक घटक काही प्रमाणात टिकून राहतात. पण तरी खूप जास्त तापमानात बराच वेळ अन्न शिजल्यास त्यातील विटामिन बी, विटामिन ए सारखे पोषक घटक ४०% कमी होतात. रोस्टिंगचा उपयोग मुख्यत्वे मांसाहारी पदार्थ करण्यासाठी केला जातो तर बेकिंग पद्धतीने ब्रेड, केक, बिस्किटे इत्यादी पदार्थ बनवले जातात.

३) शॅलो फ्राय/ स्टर फ्राय – शॅलो फ्राय करण्याच्या पद्धती मध्ये तेलाचा वापर कमीत कमी असल्यामुळे पदार्थ चवदार तर होतोच परंतु त्यातील पौष्टिक घटक टिकून राहण्यास मदत होते.

४) अन्न वाफेवर शिजवणे – वाफेवर अन्न शिजवल्यामुळे त्यातील पोषक घटकांचे संरक्षण होते. हिरव्या पालेभाज्या वाफेवर शिजवल्या तर यातील सर्व पोषक घटक टिकून राहतात. वाफेवर शिजवलेल्या अन्नाची चव फार चांगली नसली तरीही अन्नातील पोषक घटक मिळवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे .

५) आंबवलेले पदार्थ – पदार्थ आंबवण्याची म्हणजेच किण्वन करण्याची प्रक्रिया पदार्थांचे पौष्टिक गुणधर्म वाढवण्यास मदत करते. अशा पदार्थांमध्ये विटामिन बी १२ चे प्रमाण सर्वाधिक असते. फर्मेंटेशन म्हणजेच आंबवण्याची प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये इडली, ढोकळा, डोसा इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. असे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात.

० वरील पद्धतींबरोबरच अन्न शिजवताना खालील नियमांचे पालन जरूर करा.

१. अन्न झाकून शिजवा.

२. विशेषतः मांसाहारी पदार्थ शिजवताना सुटणारे पाणी टाकून देऊ नका. त्याचा मांस शिजवताना वापर करा.

३. अन्नपदार्थ उकळून शिजवताना कमी पाणी वापरा.

४. भाज्या चिरण्याआधी धुवा. मात्र चिरल्यानंतर भाज्या धुवू नका.