| | |

मुलगी वयात येताना तिच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका..,अन्यथा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। एका विशिष्ट वयानंतर प्रत्येक व्यक्तीत बदल होत असतो. हा बदल शारीरिक आणि मानसिक दोन्हीरित्या होतो. पण आजकाल मानवी वृत्ती पाहता अनेक लोक किशोर वयातील मुलांकडे केवळ शारीरिक दृष्ट्या होणाऱ्या बदलांकडे लक्ष देताना दिसतात. यात प्रामुख्याने मुलींच्या आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. बहुतेकदा आपण पाहतो कि वयात येत असलेल्या मुलींना आई म्हणते, ‘‘तू मोठी झालीस, नीट वाग.’’ तर तीच आई इतर वेळी म्हणते, ‘‘तू अजून लहान आहेस, तुला काही समजत नाही.’’ आई-मुलीमधील नाते मैत्रीचे असावे. युवा अवस्थेत पदार्पण करताना मुलींना अनेक समस्या उद्भवतात ज्या समस्यांमधून आई देखील गेलेली असते. तिच्या शरीरातील बदल, मानसिक बदल, सामाजिक बदल हे तिच्या समजुतीप्रमाणे समजवावे. अन्यथा आई आणि मुलगी यांच्यामध्ये एक पोकळी निर्माण होते जी कितीही प्रयत्न केल्यास भरून काढता येत नाही. इतकेच नव्हे तर मुली आपल्या समस्यांसोबत झुरत राहतात आणि आई दुरावते. चला तर जाणून घेऊयात किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक समस्या खालीलप्रमाणे:-

१) वजन कमी वा अधिक असणे – किशोर वयीन मुलींना सडपातळ असणे वा जाड हे दोन्ही सौंदर्यात बाधा आणतात. अशावेळी पालकांनी मुलींच्या आहाराकडे लक्ष द्यावा.
– अश्यावेळी वजन कमी असणाऱ्या मुलींनी दिवसांतून ४ वेळा आहार घ्यावा. तूप, लोणी, तेल, साखर, गूळ, चीज, अंडी, केळी यांचा समावेश असलेला आहार घेतल्यास वजन वाढते.
– तर जास्त वजन असणाऱ्या मुलींनी याउलट करावे. त्यांनी वरील खाद्यवस्तू टाळावे. या मुलींनी सूप, पालेभाज्या, फळभाज्या, सॅलड, संत्रे, मोसंबी, टोण्ड दूध, साखरेशिवाय दूध/चहा, अंड्याचा पांढरा बलक असा आहार घ्या.

२) ओटी पोटात दुखणे – पाळीदरम्यान वा पाळीआधी पोटदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी, उलट्या अशी काही लक्षणे मुलींमध्ये दिसतात. ही प्रकृती आहे. गर्भाशयातील अस्तर विघटित होऊन बाहेर फेकले जाताना गर्भाशयमुखाचे स्नायू शिथिल न झाल्यामुळे ओटीपोटात वेदना होतात.
– मळमळणे, चक्कर येणे असा त्रास मुलींना होत असल्यास त्या घाबरतील. त्यांना हे बदल आत्मसाद करण्यासाठी वेळ द्या. दरम्यान खूपच त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या. पण औषध शक्य तितके कमी घेणे बरे. यासाठी ओटीपोटाला किंवा कंबरेला गरम पाण्याचा शेक द्या.

३) अनियमित पाळी – सर्वसाधारणपणे मुलींना १३’व्या वर्षी पाळी यायला सुरुवात होते. पण काही मुलींना ११’व्यावर्षीसुद्धा पाळी येते. तर काही मुलींना १५’व्या वर्षी पाळी येते. हे स्वाभाविक आहे. पण १०’व्या वर्षापूर्वी पाळी आली वा १६’व्या वर्षांपर्यंत पाळी आली नाही, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
– आनुवंशिकता, हवामान, राहणीमान, सामाजिक स्थिती, स्वास्थ्य यांवर पाळी येण्याचे वय अवलंबून असते. तसेच योनिपटलाला छिद्र नसणे यामुळे पाळी येत नाही. क्षयाची बाधा किंवा पोषणदोष असल्यामुळेही पाळी येत नाही. यातील काहींवर इलाज होतो; तर काहींवर होत नाही.

४) पांंढरी धुपणी (श्वेतप्रदर) – योनीद्वारे पांढरा स्राव जाणे म्हणजे श्वेतप्रदर. आपल्या नाकातोंडात ओलावा असतो तसा योनीतही ओलावा असतो. मासिक पाळीच्या मध्यावर, मासिक पाळी येण्यापूर्वी वा येऊन गेल्यावर हा ओलावा वाढतो. पण योनिद्वारातून सतत पांढरा स्राव होत असल्यास श्वेतप्रदर मानावे. बहुतांशी अस्वच्छतेमुळे श्वेतप्रदराचा विकार होतो.
– गुदद्वार धुतलेले पाणी योनिद्वारावर आल्यासही असा स्राव होतो. योनीतून पांढरा फेसाळ स्राव येऊन त्या भागाला खाज सुटणे वा दुर्गंधी येणे असे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. शिवाय एकपेशी जीवाणूंचा संसर्ग वा बुरशीचा संसर्ग झाल्यास हा त्रास होतो. (कामभावना उद्दीपित झाल्यानेही योनीतून स्राव येतो)

५) मुरमे – इस्ट्रोजेन संप्रेरकामुळे त्वचा जाड होते आणि त्वचेतील रंध्रे बुजतात. त्यामुळे आतील सीबम नावाचा स्राव बाहेर येऊ शकत नाही. त्यातच जंतूचा संसर्ग झाला की मुरमे येतात.
– मुरमे नखाने फोडू नयेत. तसे केल्यास चेहऱ्यावर कायमचे व्रण राहतात. मुरमांचा त्रास कमी करण्यासाठी दिवसातून २-३ वेळा स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. चेहऱ्याला गरम पाण्याचा शेक द्या. आहारात पालेभाज्या, फळे, दूध, डाळी, कडधान्ये यांचा समावेश करा. चॉकलेट, आइस्क्रीम, मिठाई, तूप, लोणी, तेल खाणे टाळा.

६) स्तन – वयात आल्यावर स्तन वाढणे ही नैसर्गिक बाब असते. पण काही मुली यामुळे ओशाळतात. म्हणून जे निसर्गाने दिले आहे ते मान्य करावे हे आईंनी मुलींना समजवावे. दरम्यान, आपले स्तन लहान असले तर मुलींना काळजी वाटते. तसेच स्तन मोठे असले तरीही काळजी वाटते.
– तर मुलींनो स्तनाविषयी न्यूनगंड नसावा. स्त्रीला आपले स्तन हे आपल्या सौंदर्याचे एक अंग वाटत असले तरी निसर्गाचा हेतू वेगळा असतो. स्त्रीच्या गर्भाशयात वाढणारे मूल प्रसवल्यानंतर त्या नवजात अर्भकाचे पोषण मातेच्या दुधावर व्हावे, म्हणून निसर्गाने स्तनांचे वरदान दिलेले असते.

७) अकाली मातृत्व – एखादा मुलगा वा पुरुष प्रेमाचे नाटक करून मुलीशी शारीरिक संबंध ठेवतो आणि ती गर्भार झाल्यास हात वर करतो. कधीकधी अज्ञानापोटी मुलगी गर्भार राहते. कारण, एका संभोगामुळे गर्भधारणा होते हे तिला माहीत नसते. याचा परिणाम विवाहपूर्वीचे मातृत्व. आजही हि स्थिती कलंकित मानली जाते. यामुळे आता त्यासाठी गर्भपाताची सोय आहे. मात्र तरी २० आठवड्यांहून अधिक मुदतीचा गर्भ असल्यास गर्भपातास कायद्यान्वये परवानगी नाही.
– म्हणून, घरातून मानसिक ताण आणि ओझं निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. मुलांना विश्वासाने आपलं करा. महत्त्वाचे म्हणजे असा प्रसंग उद्भवू न देण्यासाठी आपल्या मुलींना भक्कम बनवा. कोणत्याही मुलाने शरीरसंबंधासाठी गळ घातली तर मुलीने ठामपणे नकार द्यावा, कारण गर्भारपणाची जबाबदारी व त्यातून निर्माण होणारे दु:ख तिलाच भोगावे लागते.