Sprouts
| | |

उत्तम आरोग्यासाठी कोणती कडधान्ये खावी?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुदृढ शरीर आणि निरोगी आरोग्यासाठी मोड आलेली कडधान्ये खाणे फायदेशीर मानले जाते. याचे कारण म्हणजे मोड आलेल्या कडधान्यातील पोषक तत्त्वे दुपटीने वाढलेली असतात ज्यांचा शरीराला फायदा होतो. शिवाय कडधान्यांना मोड आल्यामुळे ती हलकी होतात. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये खाणे आणि पचविणे सोप्पे जाते.

Sprouts

पण म्हणून सगळीच कडधान्ये खावी का..? कि मोजकीच कडधान्ये खायची..? कडधान्ये मोड आणून कच्ची खायची कि शिजवून..? असे अनेक प्रश्न अनेकांना पडतात. आता आहाराबाबत एव्हढी शंका असेल तर खाल्ल्यावरही शंकेची पाल चुकचुकायची थोडीच थांबणार आहे. म्हणूनच आज आपण उत्तम आरोग्यासाठी एकतर कोणती कडधान्ये खावी ते जाणून घेणार आहोत. शिवाय ती का आणि कशी खावी तेही जाणून घेऊ. पण त्यासाठी ही माहिती तुम्हाला पूर्ण वाचावी लागेल.

० कोणती कडधान्ये खावी..?

शाकाहारी आहारामध्ये प्रथिनांची पुर्तता प्रामुख्याने कडधान्यातूनच होते. त्यामुळे अशा व्यक्तींच्या आहारात कडधान्यांचा वापर जास्त असतो. पण मित्रांनो सर्व प्रकारची कडधान्य पचायला सारखी नसतात. त्यामुळे कोणते कढधान्य किती खावे आणि आरोग्यदायी फायद्यांसाठी कोणते कडधान्य खावे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Sprouts

यात पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी. त्यानंतर मूग आणि चवळी. तर उडीद, हरभरा, कडु वाल आणि पावटा हे पचायला सर्वात कठीण अशी कडधान्ये आहेत. कडधान्यात भरपूर पोषकतत्व असतात. साधारण १०० ग्रॅम कडधान्यात २५% प्रथिने असतात. यात सोयाबीन अपवाद आहे. कारण साधारण १०० ग्रॅम सोयाबीनमध्ये ४०% प्रथिने असतात.

० कडधान्ये का खावी..?

कडधान्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि फॅट यांची एकत्रित उपलब्धता आहे. त्यामुळे आहारात अनन्य साधारण महत्व आहे. प्रथिनांव्यतिरिक्त कडधान्यांमध्ये ब जीवनसत्वे, खनिजे आणि फॅट भरपूर असते. साधारणपणे १०० ग्रॅम कडधान्यात थायमीन (जीवनसत्व ब-1) रिबोफ्लेविन (जीवनसत्व ब-2) ०.१८ ते ०.२६ मिलीग्रॅम आणि नायसीन २.१ ते २.९ मिलीग्रॅम असते. तर कॅल्शियम ७६ ते २०३ मि.ग्रॅम, लोह ७.३ ते १०.० मि.ग्रॅम, फॉस्फरस ३०० ते ४३३ मि.ग्रॅम या प्रमाणात असते. यासाठीदेखील सोयाबीन अपवाद आहे. कारण त्यामध्ये १८ ते २०% फॅट असते.

० कडधान्ये कशी खावी..?

कढधान्य खाताना एकतर त्यांना मोड आणून खाणे फायदेशीर आहे. कारण यामुळे कडधान्ये हलकी आणि पचायला सोप्पी जातात. शिवाय मोड आलेली कढधान्य खाताना हि हलकी शिजवून वा परतून खावी. यामुळे त्यात साठलेले हानिकारक बॅक्टरीया दूर होतात. परिणामी पचन संस्थेची हानी होत नाही.