|

शरीरावरील पांढरे डाग म्हणजे ‘कोड’ नव्हेत; समजून घ्या कोड म्हणजे काय आणि त्यावरील उपचार

हॅलो आरोग्य ऑनलाईन : शरीरावर पांढरे डाग असलेल्या व्यक्तींना अनेकदा सामाजिक कुचंबणेला सामोरे जावे लागते. बरं त्यामध्ये त्या व्यक्तीची चूक नसताना पण त्याला समाजात वावरताना मोठ्या न्यूनगंडाला सामोरे जावे लागते. सामाजिक अवहेलना वाट्याला येते. एखाद्या मुलीला शरीरावर पांढरे डाग असतील तर तिचे लग्न जुळताना तिच्या आईवडिलांना काय काय दिव्यातून सामोरे जावे लागत असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी!!! डाग संसर्गजन्य असतील की काय, ही निरर्थक भीती यामागे असते. तसेच अंगावर पांढरा डाग आला म्हणजे तो डाग कोडाचा (श्वेतत्वचा) असेल असेही अनेकांना वाटते. यामागोमाग येते त्वचा विद्रुप दिसण्याची भीती. हे डाग लपवण्यासाठी अनेक मंडळी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळतात, मनात न्यूनगंड बाळगू लागतात. पण या आजारावर उपचार नक्कीच आहेत. गरज आहे मनातील भीती काढून टाकण्याची!
त्वचेवर पांढरा डाग दिसला की त्याचा संबंध कुष्ठरोगाशी लावण्याची गल्लत सर्रास केली जाते. कुष्ठरोगात त्वचेवर फिकट पांढरे डाग/ चट्टे उमटतात, परंतु त्याबरोबर रुग्णाला कुष्ठरोगाची इतर लक्षणेही दिसतात- उदा. डागांना संवेदना नसणे. त्यामुळे प्रत्येक वेळी पांढऱ्या डागांचा संबंध कुष्ठरोगाशी लावणे चुकीचे आहे. तसेच त्वचेवरील पांढरा डाग कोडाचा असेल या विचारानेही घाबरून जाणारे अनेक असतात. कुष्ठरोग आणि कोड यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही. तसेच केवळ या दोन कारणांमुळेच त्वचेवर पांढरे डाग पडतात असे नाही. पांढरे डाग येण्याची कारणे अनेक असू शकतात.
उदा. –
* भाजल्यामुळे झालेल्या जखमांचे राहिलेले पांढरे डाग
* रबराच्या/ प्लास्टिकच्या चपला घातल्यामुळे पायावर पडलेले पांढरे डाग. रबर किंवा प्लास्टिकमधील रसायनांमुळे त्वचेला त्रास होण्याची प्रवृत्ती असेल तर असे डाग पडतात.
* महिलांच्या कपाळावर टिकली लावल्यामुळे पडलेले पांढरे डाग. हे डागही टिकली/ बिंदीतील रसायने त्वचेला चालत नसल्यामुळे पडलेले असतात.
* त्वचेवर होणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या बुरशीच्या प्रादुर्भावामुळेही त्वचेवर डाग पडतात. याला बोली भाषेत ‘शिबं’ किंवा ‘सुरमा’ म्हणतात. यात रुग्णाची मान, पाठ, छाती, खांदे या ठिकाणी पांढरे अस्पष्ट डाग दिसू लागतात.
* जन्मत:च काही व्यक्तींच्या त्वचेवर पांढरे तीळ असतात. वय वाढत जाते तसा या तीळांचा आकार काहीसा वाढतो.
* इसब या रोगात त्वचा सतत खाजवल्यामुळे पुढे त्या ठिकाणी पांढरे डाग दिसतात. पायांच्या घोटय़ावर इसब होण्याची प्रवृत्ती अधिक असल्याने रुग्णाच्या घोटय़ावर हे डाग दिसतात.
* इतर काही आजारांसाठी स्टिरॉइड इंजेक्शने घ्यावी लागली किंवा त्वचेवर मलमे लावावी लागली तर त्यांच्या दुष्परिणामांमुळे काहींना त्वचेवर पांढरे डाग पडतात.
* सतत घट्ट कपडे वापरल्यामुळे कपडय़ांचे त्वचेला घर्षण होऊन त्वचेवर डाग पडतात. नऊवारी साडी वापरणाऱ्या महिलांना कमरेवर साडी घट्ट बांधल्यामुळे कमरेवर पांढरे डाग पडल्याचे मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. आता आपण फक्त कोडाच्या पांढऱ्या डागांचा विचार करूया.
कोड/ श्वेतत्वचा
आपल्या त्वचेचा रंग कायम तोच राहात नाही. हा रंग दररोज नव्याने तयार होत असतो. पहिला रंग निघूनही जात असतो. रंग तयार करणाऱ्या पेशींना ‘पिगमेंट सेल्स’ किंवा ‘मेलॅनोसाईटस्’ (रंगपेशी) म्हणतात. या पेशी शरीरातील काही अंतर्गत कारणांमुळे नष्ट झाल्या तर त्वचेचा रंग तयार होण्यात अडथळे येतात. अशा प्रकारे त्वचेच्या ज्या भागात रंग तयार होऊ शकत नाही तिथे पांढरा डाग पडतो. हा आजार संसर्गजन्य मुळीच नाही.
रंगपेशी नष्ट होण्याची कारणे खूप गुंतागुंतीची आहेत. अमुक एकाच कारणामुळे रंगपेशी मरतात असे सांगणे कठीण आहे. शरीरावरील पांढऱ्या डागांच्या जागेनुसार कोडाचे वेगवेगळे प्रकार आहेत.
* जनरलाईझ्ड- अंगावर कुठेही येऊ शकणारे कोड, यात दोन्ही हातांवर, दोन्ही पायांवर, गुडघ्यांवर समान म्हणजे सिमेट्रिकल डाग दिसू शकतात.
* युनिव्हर्सल– अंगावरील सर्व त्वचेवरील रंग हळूहळू निघून जातो आणि त्वचा पांढरी दिसू लागते.
* लोकल- अंगावर एखाद्याच ठिकाणी डाग पडतो.
* लिप अँड टिप- ओठांवर आणि हातांच्या बोटांवर पांढरे डाग पडतात.
* सेगमेंटल- शरीराच्या एखाद्या पट्टय़ातच पांढरे डाग पडतात पण ते अंगभर पसरत नाहीत.
पांढरे डाग रुग्णांना वयाच्या कोणत्याही टप्प्यावर येऊ लागतात. त्यासाठी कोणतेही बाह्य़ कारण लागत नाही. लहान बाळापासून अगदी वयस्कर व्यक्तींमध्येही हे डाग दिसू शकतात. पण अधिक रुग्ण तरूण वयातील आढळतात. सुमारे तीस टक्के रुग्णांच्या बाबतीत कोडाचे डाग आनुवांशिक असल्याचे दिसते. पण बऱ्याच रुग्णांना आपल्या घरात कुणाला हा आजार होता का, हे सांगता येत नाही. कारण आपल्याला पांढरे डाग आहेत याची वाच्यता करणे सहसा लोक टाळतात.
कोडाच्या डागांवर अनेक उपचार आहेत. डाग येणे आणि पसरणे थांबवणे हा या उपचारांचा पहिला टप्पा असतो. तर दुसऱ्या टप्प्यात श्वेतत्वचेत पुन्हा रंग आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. डाग कमी प्रमाणात असतील तर त्यावर वरून औषधे लावून, जोडीने पोटात काही औषधे घेऊन डागांची वाढ थांबवता येते. ‘अल्ट्राव्हायोलेट लाईट थेरपी’त विशिष्ट तरंगलांबीच्या अतिनील किरणांचा वापर करून डागांतील रंगपेशींनी पुन्हा काम करावे यासाठी उपचार केले जातात. लहान डागांसाठी लेझर थेरपीचाही वापर केला जातो. डागांवर वरून औषध लावून त्यांना सूर्याचे ऊन देणे ही पद्धतही अनेक वर्षांपासून यशस्वीपणे वापरली जात आहे.
लग्नाच्या वयातील रुग्णांना शरीराच्या दर्शनी भागात पांढरे डाग असतील तर रुग्ण मुळातच सामाजिक कुचंबणेला सामोरा जात असतो. त्यामुळे उपचारांच्या परिणामांसाठी महिनोंमहिने थांबण्याची अशा रुग्णांची तयारी नसते. डागांवर औषध लावणे, नंतर सूर्यप्रकाशाचा उपचार घेणे या गोष्टी नियमित करणे अनेक जणांना शिक्षण किंवा नोकरी- व्यवसायातील व्यस्ततेमुळे जमत नाही. नियमित उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या डागांमध्ये हळू- हळू रंग परत येताना दिसतो, डाग वाढणेही थांबते. पण डागांमध्ये रंग येण्यासाठी किती काळ वाट पाहावी यालाही मर्यादा आहेत. उपचार घेऊनही डागांमध्ये रंग येतच नसेल तर तिथे रंगपेशी नाहीत हे स्पष्ट होते. डागांमधील रंगपेशी पूर्णपणे नष्ट झाल्या असतील तर वरून कितीही उपचार केले तरी त्या नव्याने तयार होत नसतात. अशा वेळी त्वचा रोपण किंवा पेशी रोपणाचे उपचार करता येतात. मात्र त्वचेवर डाग वाढत असतील किंवा पसरत असतील तर मात्र त्यांची वाढ थांबवल्याशिवाय त्वचा रोपण किंवा पेशी रोपणाचा पर्याय सुचवला जात नाही.
त्वचा रोपण
या उपचारपद्धतीत रुग्णाच्या डागावरील त्वचा काढून त्या जागी शरीराच्या दुसऱ्या भागावरील त्वचा काढून लावली जाते. पण डागांवर त्वचा रोपण करण्याला मर्यादा अनेक आहेत. डाग मोठय़ा आकाराचा असेल तर तेवढय़ाच आकाराचा निरोगी त्वचेचा तुकडा काढून त्या जागी बसवावा लागतो. यात काढलेल्या निरोगी त्वचेच्या भागावरील जखमही मोठी असते. डाग सांध्यावर असेल तर त्वचा रोपण जिकिरीचे होते. हातापायाची बोटे, कोपर, गुडघा, मान या भागांची सतत हालचाल होत असल्याने या ठिकाणच्या डागांवर रोपण केलेली त्वचा हालचालीबरोबर निघून येण्याची शक्यता असते. अशा वेळी बसवलेली त्वचा हलू नये यासाठी त्यावर प्लॅस्टर घालतात. हाडे फ्रॅक्चर झाल्यावर घालतात त्याच प्रकारचे हे प्लॅस्टर असते. कमीत-कमी पंधरा दिवस हे प्लॅस्टर वागवणे कटकटीचे होऊन बसते. गळा, पोट, पाठ या भागांवर प्लॅस्टर घालणेही शक्य नसते. शरीरावरील दोन ठिकाणच्या त्वचेच्या रंगात थोडा फरक असू शकतो. त्यामुळे त्वचेचे केलेले रोपण चिकटवलेल्या पॅचसारखे दिसू शकते. चेहऱ्यासारख्या भागात त्वचेच्या रंगातील सूक्ष्म फरकही लगेच दिसून येत असल्याने अशा ठिकाणी त्वचा रोपण सहसा केले जात नाही.
पेशी रोपण
स्वीडनमधील डॉ. मॅटस् ओलसन या शास्त्रज्ञाने या उपचारपद्धतीचा प्रथम शोध लावला. यात रुग्णाच्याच शरीरावरील त्वचेचा थोडासा तुकडा काढून घेतला जातो आणि त्यावर प्रक्रिया करून त्यातील रंगपेशी वेगळ्या काढल्या जातात. या पेशींमध्ये काही विशिष्ट घटक मिसळून त्याचे द्रावण तयार केले जाते आणि ते डाग आलेल्या त्वचेत सोडले जाते. पेशीरोपण शरीराच्या कोणत्याही भागात करता येते. पेशींचे रोपण त्वचेच्या आत केलेले असल्यामुळे ते टिकावे म्हणून प्लॅस्टरही घालावे लागत नाही. डागांमध्ये रंगपेशी सोडल्यानंतर त्या आपले रंग तयार करण्याचे काम करू लागतात, आणि डागाला मूळ त्वचेसारखा रंग येऊ लागतो. पण ही उपचारपद्धती काहीशी खर्चिक आहे.